हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲन्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला.
पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स करुन घ्यायची आहेत.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले.
इनामदारांनी वयाची साठी गाठलेली होती. उंची व तब्येतीने सर्वसाधारणच असलेले, डाय न करता चंदेरी केस मागे वळवलेले, सावळ्या रंगाचे, सिगारेट ओढून काळवंडलेल्या ओठांचे, इनशर्ट केलेला फुलशर्ट, खाली डार्क रंगाची पॅन्ट व पायात चपला घातलेले इनामदार आयुष्यातील अनेक दुःख पचवलेल्या हताश चेहऱ्याने ऑफिसमध्ये येऊन बसायचे.
इनामदार सायकलवरून यायचे. आल्यावर थोडा दम खाऊन पाणी पिऊन मगच बोलू लागायचे. ते रहायला होते, सिंहगड रोडला. घरी पत्नी, एक मुलगा व त्याची पत्नी असे चौकोनी कुटुंब होतं. त्यांची पत्नी दहावी पर्यंतच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायची. पत्नी शिकवणी घेताना मुलांकडून शब्दांचे शुद्ध उच्चार घोकून घेत असे, तरीदेखील मुलं ‘वाॅटर’ असा उच्चार करण्या ऐवजी ‘वाटर’च म्हणत असत. असे त्यांचे अनेक किस्से इनामदारांनी आम्हाला ऐकवले.
केमिकल कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर इनामदार विविध सेंट तयार करुन, आकर्षक छोट्या बाटल्यांमध्ये ते सेंट भरुन त्यांची विक्री करीत होते. सेंट तयार करणे व त्यांचे पॅकींग करण्याचे काम ते दत्तवाडीतील एका ओळखीच्या कुटुंबाकडे करीत असत. त्या कुटुंबातील एक पंधरा वर्षांचा मुलगा ‘भावड्या’ व त्याची मोठी बहीण ‘गुड्डी’ हे दोघेही इनामदारांना मदत करीत. त्याबद्दल त्यांनी दिलेल्या मोबदल्यातून दोघांच्याही शिक्षणाला हातभार लागत असे.
सेंटची नावं देखील टिपिकल असायची. चार्ली, पाॅण्डस, शिरीन, ब्रुट, लिली, इत्यादी. स्टिकर्सची ऑर्डर प्रत्येकी शंभर नगांची असायची. ते स्टिकर्स दिल्यानंतर दुसरेच दिवशी इनामदार आम्हाला सेंटच्या बाटल्या दाखवायला आणायचे. मग प्रत्येक सेंटचा स्प्रे हातावर, शर्टवर मारायचे. त्या सगळ्या वासांच्या सरमिसळीने एक वेगळाच सुगंध जाणवू लागत असे. अशावेळी दुसरा कोणी आमच्याकडे माणूस बसलेला असेल तर त्यालाही ‘प्रसाद’ मिळत असे. तो जर पटलाच तर इनामदारांच्या एक दोन सेंटची रोखीने विक्री होत असे.
सेंटची विक्री होऊन पैसे खिशात आले की, इनामदार खूष होऊन आम्हाला चहासाठी ‘चण्डीश्वर’ अमृततुल्यमध्ये घेऊन जायचे. सायकल स्टॅण्डवर उभी करुन आम्ही पायऱ्या चढून बाकड्यावर बसत असू. तीन चहाची ऑर्डर दिल्यावर चहा येईपर्यंत इनामदारांची सिगारेट ओढून झालेली असे. चहा घेण्याच्या आधी व घेतल्यानंतर त्यांना पाणी पिण्याची सवय होती. टेबलावर पाण्याचा ग्लास नसेल तर ते पोऱ्याला ‘वाटर’ असं मोठ्या आवाजात सांगून पाणी मागवत. चहा पिऊन झाल्यावर तोंडातील चहाचा चिकटपणा घालविण्यासाठी पुन्हा पाणी पिऊन घेत. मग ते मंडईच्या दिशेने व आम्ही ऑफिसवर परतत असू. त्या दिवशी घरी गेल्यानंतर घरचे स्वतःहून विचारायचे, ‘आज ऑफिसवर ‘सेंटेड मॅन’ आला होता का?’
दोन वर्षे आम्ही इनामदारांची स्टिकर्स करीत होतो. ते आल्यानंतर आमच्या गप्पा होत असत. नंतर इनामदार आलेच नाहीत. खूप दिवसांनी एका संध्याकाळी इनामदार, मुलगा व सुनबाईंसह अवतरले. त्यांनी सेंटचा व्यवसाय बंद करुन ‘कोकण मेवा’ची विक्री सुरु केल्याचे सांगितले. आम्हा दोघांना हापूस आमरसाच्या दोन बाटल्या त्यांनी भेट दिल्या. चहा, गप्पा झाल्या. त्यानंतर इनामदारांची पुनर्भेट काही झाली नाही. त्यांना केलेला फोन देखील अनरिचेबल लागू लागला. ‘भावड्या’ आणि ‘गुड्डी’ चं पुढे काय झालं, याची काही एक कल्पना नाही.
आपल्या जीवनात अशी कित्येक माणसं काही काळासाठी आपल्याबरोबर राहतात, पुढे त्यांची गाडी दुसऱ्या रुळावर गेल्याने ते आपल्याला दिसेनासे होतात… त्यांच्या सहवासातील तो आठवणींचा ‘सुगंध’ मात्र दीर्घकाळ आपल्या अंगावर दरवळत राहतो….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-९-२०.
Leave a Reply