” वंदे जननी, भारत धरणी
सस्य श्यामला प्यारी ”
४७ वर्षांनी हे शालागीत एकस्वरात म्हणण्याचा थरार कसा असेल? तेही बालपणीच्या तुकडीत उभे राहून-हात जोडलेले, डोळे मिटलेले! त्यानंतर ठणठणीत घंटा !!
सुधीर मोघेंच्या गीताच्या ओळी –
” एकाच या जन्मी जणू , फिरुनी नवी जन्मेन मी ! ”
खऱ्या अर्थाने लागू पडतात शाळा-महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यांना ! आजपर्यंत भुसावळ, सोलापूर मधील शाळेच्या आणि सांगलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मिळून किमान १५ स्नेहमेळाव्यानंतर दरवेळी मी सुधीर मोघेंच्या या ओळींनुसार फिरुनी नवीन जन्मलोय.
ज्यांनी वर्गात शिकविण्या बरोबरच बाह्य जगात जगण्याच्या जाणिवा जागृत केल्या आहेत अशा गुरुजनांचा आजही लाभणारा सहवास, त्यांची आस्था आणि प्रेम अशावेळी टॉनिक असते. एक काळाचा एकसंध तुकडा वाटून घेतलेले मित्र सर्व विसरायला लावणारे असतात.
शाळेची दुरावस्था खिन्न करणारी असते-पण ते क्षणिक. कारण दुरावस्था इमारती, फर्निचरची होत असते – अपरिहार्य निसर्ग नियमानुसार पण संस्था वाढत्या वयानुसार तितकीच प्रगल्भ, समंजस होत जाते. काळाचे वेढे कोणाला चुकले आहेत- शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या एकत्रित घालविलेल्या कालखंडाला?
पण आठवणींना वय नसते. त्या ४७ वर्षांनीही ताज्या टवटवीत असतात आणि मनामनांमधे जिवंत असतात.
फक्त त्या निखाऱ्यांवर साठलेली राख फुंकणीने फुंकर मारून झटकली की सहवासांचे निखारे धडाडून प्रज्वलित होतात. मधल्या काळाच्या पाटीला पुसून टाकतात. स्नेहमेळावे म्हणजे अशी फुंकणी असते- निखाऱ्यांना रसरशीत करणारी.
शाळेत आपल्या स्मृती जपलेल्या असतात- Souvenir of my school life या काव्यरूप नांवाने ! असाच एक शाळेने जपून ठेवलेला तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचा
७२-७३ चा फोटो हाती लागला-आम्हांला घडविणाऱ्यांचा !
फिरुनी नवा जन्म झाला !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply