जुन्या मराठी पंगतीतील नैवेद्य आणि चित्राहुती मागील विज्ञान ! ( भाग ३ )
पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. या शिवाय घरात काशाचे किंवा ऐपतीनुसार चांदीचे ताट, वाटी, फुलपात्र वापरले जाई. अनेक ठिकाणी कल्हई न लावलेली पितळी ताट – वाटी वापरली जात असे. छोट्या पंगतीत प्रत्येक पानाभोवती किंवा मोठ्या पंगतीत पूर्ण एका बाजूच्या पानांभोवती एकत्रितपणे रांगोळी काढली जाई. त्यात हळद-पिंजर असे रंग भरले जात. अगदी सार्वजनिक जेवणावळीतही दर ५ / ६ पानांनंतर ( बटाट्याच्या तुकड्यामध्ये) उदबत्ती लावली जाई. घरातील किंवा घरगुती पंगतीत पानाखाली पाण्याने चौकोनी ( पितृकार्यामध्ये गोल ) मंडल काढले जाई. या पाण्याच्या मंडलामुळे, पदार्थ न वाढलेले केळीचे पान किंवा पत्रावळ, वाऱ्याने न उडता जमिनीला चिकटून राही. भात हा पानावरील सर्वात गरम पदार्थ बरोबर या मंडलावरील भागात वाढला जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.
जेवणाचे पान हे मातीच्या / सारवलेल्या जमिनीवर वाढले जात असे. अन्नाच्या वासामुळे पानाभोवती आजूबाजूनी कीटक जमा होत असत. हे कीटक, पानाभोवती फिरवलेल्या पाण्याची रेषा ओलांडून येऊ शकत नसत. ते या पानाभोवती पाण्याच्या रेषेबाहेरून फिरून चित्राहुतींपर्यंत पोचून त्या खात असत. जर रांगोळी काढलेली असेल तर रांगोळी आणि हळदकुंकू यांची वस्त्रगाळ पावडर ( पितृकार्यामध्ये भस्म ) प्राण्यांच्या त्वचेला सहन होत नसल्याने ते रांगोळी सहसा ओलांडत नाहीत. हळद ( तेव्हा हळदीपासूनच बनणारे कुंकूही ) ही सौम्य जंतुनाशकही आहे. पंगतीत लावलेल्या उदबत्त्यांचा धुरामुळे आणि वासामुळे उडणारे कीटक कमी होत. जेवायला सुरुवात करण्याआधी एका भांड्यात पाणी ठेवून तुळशीपत्राने पूर्ण पंगतभर ” पात्रप्रोक्षण ” करण्यात येई. पाण्याचे तुषार आणि तुळशीचा वास यामुळे तेथे घोंगावणारे / उडणारे कीटकही दूर पळत असत. या अन्नेच्छुक कीटकांना ठार न मारता त्यांची केलेली ही व्यवस्था लक्षात घेण्यासारखी आहे.!
जेवण वाढताना विशिष्ट ते पद्धतीने वाढले जाई. जेवणारी मंडळी पानांवर ( आसनावर ) बसल्यानंतर एकेक पदार्थ वाढला जाई. आज अनेक ठिकाणी पानात पदार्थ पडला रे पडला की खायला सुरुवात केली जाते. पूर्वी सर्व पदार्थ वाढून झाल्यावर / नैवेद्य दाखवून झाल्यावर / यजमानाने आवाहन केल्यावरच जेवायला सुरुवात केली जाई. वाढल्या जाणाऱ्या एकेक पदार्थाबरोबर – त्याच्या वासागणिक जेवणाऱ्याचा जठराग्नी प्रदीप्त होत असे आणि उदबत्त्यांचा सुगंधामुळे मन प्रसन्न होत असे. अशा तऱ्हेने जेवण्याची मानसिक तयारी पूर्ण होई. त्यामुळे ” ऍपेटायझर आणि स्टार्टर ” ची गरजच भासत नसे.
आज पूर्णपणे बदललेल्या जीवन शैलीत या सर्व गोष्टी शक्य नसल्या तरी जेव्हा एखाद्या कार्यपरत्वे नैवेद्य / चित्राहुती / प्रोक्षण आदी गोष्टी करताना हे लक्षात ठेऊन त्या अधिक डोळसपणे करता येतील.
— मकरंद करंदीकर.
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा).
जर चित्राहुती आणि पाणी फिरवण्याचे कारण हे आहे तर मग पाणी फिरवणे आणि चित्राहुती घालणे सर्वांनीच केला पाहिजे अगदी मुंज न झालेल्या मुलांनी सुद्धा किंवा स्त्रियांनी सुद्धा
धन्यवाद. फारंच छान माहिती दिलीत तुम्ही काका. मला कित्येक वर्षे एक प्रश्न सतावतो आहे. तुम्हाला त्याचे उत्तर देता आले तर मी तुमचा ऋणी राहीन. लहान असताना काही पंगतींमध्ये प्रत्येक पानाशी सव्वा रुपया दक्षिणा ठेवण्यात आली होती. त्याकाळी आईला विचारले असता तिने सांगितले होते की कृतज्ञता भावातून असं करण्याचा प्रघात आहे. ती असेही म्हणाली होती की पुर्वी असे नेहमी असायचे पण आमच्या पर्यंत येता येता हे करणे कालबाह्य झाले.
तर या बद्दल काही माहिती देता येईल का तुम्हाला?