डॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह (Dr Vladimir Demikhov)
सोव्हिएत युनियन (जेव्हा रशियन प्रजासत्ताक अखंड सोव्हिएत युनियनचा हिस्सा होते) मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद होते. त्यांनी श्वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपण तर केलेच पण एका श्वानमस्तकाचे प्रत्यारोपणही केले. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले.
त्यांच्या या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला.
डॉ. डेमीखॉव्ह यांनी ‘ट्रान्सप्लॅन्टोलॉजी’ ह्या शब्दाला जनकत्व दिले. १९६० मध्ये ‘एक्सपिरिमेंटल ट्रान्सप्लॅन्टेशन ऑफ व्हायटल ऑर्गन्स’ (महत्त्वाच्या अवयवांचे प्रायोगिक प्रत्यारोपण) हा प्रबंध त्यांनी सादर करून पी.एच.डी. ची पदवी मिळविली. त्यांनी प्रबंध सादर केल्यानंतर कितीतरी वर्षेपर्यंत या विषयावर इतके सुंदर विवेचनात्मक दुसरे साहित्यच उपलब्ध नव्हते. जगातील पहिले मानवी हृदय-प्रत्यारोपण करणारे शल्यविशारद डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड, डॉ. डेमीखॉव्हयांना आपले गुरू मानीत असत. १९६० व १९६३ मध्ये (१९६७ साली पहिले हृदय-प्रत्यारोपण करण्यापूर्वी) अशा दोन वेळेला डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी डॉ. डेमीखॉव्ह यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली होती.
१८ जुलै १९१६ रोजी मॉस्को येथे जन्मलेल्या या शल्यविशारदाने शल्यचिकित्सेमध्ये सातत्याने संशोधन करून काही प्रक्रिया विकसित केल्या.
१९४० मध्ये मॉस्को विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी तेथेच फिजिऑलॉजी विभागात कामाला सुरुवात केली.
१९४६ साल त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे वर्ष ठरले. ऑगस्ट १९४६ मध्ये ते लियाशी विवाहबद्ध झाले व ५२ वर्षांच्या सहजीवनाची सुरुवात झाली. १६ जुलै १९४७ रोजी त्यांच्या कन्येचा ओल्गाचा जन्म झाला.
१९४६ साल महत्त्वाचे ठरले त्याचे अजूनही एक कारण घडले, ते म्हणजे १९४६ साली हृदय व फुफ्फुसाचे श्वानांमध्ये केलेले यशस्वी प्रत्यारोपण. यांसाठी त्यांनी स्वतः विकसित केलेल्या‘अवयव सुरक्षित ठेवणार्या प्रणाली’चा वापर केला व जलद शस्त्रक्रिया केली. ३० जून १९४६ रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर श्वान साडेनऊ तास जिवंत राहिला. डॉ. डेमीखॉव्हयांनी केलेल्याया शस्त्रक्रियेचे महत्त्व म्हणजे, सस्तन प्राण्यावर करण्यात आलेला प्रत्यारोपणाचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता.
१९४७ ते १९५५ पर्यंत मॉस्को येथील इन्स्टीट्यूट ऑफ सर्जरी मध्ये डॉ. डेमीखॉव्ह यांनी विविध प्रयोग करून पाहिले. १९५० मध्ये सोव्हिएत आरोग्य मंत्रालयाच्या एका समितीने असा अहवाल दिला की डॉ. डेमीखॉव्ह यांचे काम अयोग्य व थोडेसे अनितीकारकच असून त्यांनी त्यांचे ‘शस्त्रक्रियाविषयक’ प्रयोग करण्याचे काम’ ताबडतोब थांबविले पाहिजे.
डॉ. डेमीखॉव्ह यांच्या सुदैवाने अलेक्झांडर विश्नेव्हस्की या संस्थेचे संचालक होते. तसेच ते सोव्हिएत लष्कराचे सर्जन-इन-चार्ज (प्रमुख शल्यचिकित्सक) होते. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी शक्य होते. त्याचा उपयोग करून त्यांनी काही काळ डॉ. डेमीखॉव्ह यांच्या संशोधनाला संरक्षण दिले. १९५५ पासून १९६० पर्यंत डॉ. डेमीखॉव्ह मॉस्कोमधीलच सेकेनोव्ह मेडिकल इन्स्टीट्यूट येथे तर १९६० पासून १९८६ पर्यंत स्क्लीफोसोव्हस्की इमर्जन्सी इन्स्टीट्यूट येथे कार्यरत राहिले. डॉ. डेमीखॉव्ह श्वानांवर प्रयोग करीत असत. त्यांनी २९ जुलै १९५३ रोजी एका श्वानावर पहिली यशस्वी ‘कॉरोनरी बायपास शस्त्रक्रिया’ केली. त्यांनी शस्त्रक्रिया केलेले चार श्वान शस्त्रक्रियेपश्चात दोन वर्षांहून अधिक काळ जगले. त्यानंतर त्यांनी माकडे व मृत मानवी शरिरांवर प्रयोग केले. ज्या काळात डॉ. डेमीखॉव्ह यांनी ही शस्त्रक्रिया केली तेव्हा अशी शस्त्रक्रिया होऊ शकते यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या कार्याची ‘अव्यवहार्य व अतर्क्य’ अशीच संभावना करण्यात आली. परंतु लेनिनग्राड, रशिया येथील डॉ. कोलेसॉव्ह यांना त्यात तथ्य जाणवले. त्यांनी या शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक प्रयोग केले. २५ फेब्रुवारी १९६४ ते ९ मे १९६७ या काळात डॉ. कोलेसॉव्ह संचालित शल्यचिकित्साविभाग ही संपूर्ण पृथ्वीतलावरील एकच अशी जागा होती की जेथे ‘बायपास’ची शस्त्रक्रिया होत होती. डॉ. कोलेसॉव्हनी त्यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध शोधनिबंधांमध्ये डॉ. डेमीखॉव्ह यांच्या कार्याचा सन्मानाने उल्लेख केला, इतकेच नव्हे तर या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे असल्याचे त्यांना श्रेयही दिले.
शीतयुद्धाच्या कालावधीत डॉ. डेमीखॉव्ह क्वचितच रशियाच्या बाहेर जात. १९५८ मध्ये पूर्व जर्मनीतील (पूर्व जर्मनी तेव्हा रशियाच्या बाजूने होता) लिपझिग शहरात डॉ. डेमीखॉव्ह यांनी प्रायोगिक प्रत्यारोपणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर त्यांचे काम अधिकांशाने समोर आले. १६ सप्टेंबर १९६० रोजी स्वीडन येथील ‘रॉयल सायंटिफिक सोसायटी ऑफउप्पसला’चे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. त्याच वर्षी मॉस्को येथे त्यांच्या संशोधन निबंधाचे प्रकाशन करण्यात आले. रशियन भाषेतील या निबंधाचे त्यानंतर इंग्रजी, जर्मन व स्पॅनिशमध्ये भाषांतर करण्यात आले. १९६२ मध्ये न्यूयॉर्क येथे, १९६३ मध्ये बर्लिन येथे व १९६७ मध्ये माद्रिद येथे त्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘इन्ट्राथोरॅसिक ट्रान्सप्लॅन्टेशन’ यावर भाष्य करणारे हे जगातील पहिलेच पुस्तक. इंग्रजी भाषेतील प्रकाशनानंतर एका वर्षानंतर जेम्स हार्डी यांनी मानवी फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केले. जगभरातील शल्यचिकित्सक डॉ. डेमीखॉव्ह यांच्या भेटीस उत्सुक होते. पण फारच थोड्या जणांना ती संधी प्राप्त झाली. १९६२ साली डॉ. बर्नार्ड यांनी पर्यटक म्हणून मॉस्कोचा दौरा केला तेव्हा ते डॉ. डेमीखॉव्ह यांना भेटले.
१९८९च्या एप्रिल महिन्यात ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर हार्ट अॅण्ड लंग ट्रान्सप्लान्टेशन’ तर्फे ‘इन्ट्राथोरॅसिक ट्रान्सप्लॅन्टेशन व कृत्रीम हृदय’ यातील भरीव कामगिरीसाठी डॉ. डेमीखॉव्ह यांना पहिला ‘पायोनिअर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सोसायटीच्या म्युनिक, जर्मनी येथील वार्षिक सभेत डॉ. डेमीखॉव्ह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
डॉ. डेमीखॉव्ह यांचे कार्य अतुलनीयच आहे. हृदयशस्त्रक्रिया व प्रत्यारोपण यासंदर्भातील त्यांचे काम पथदर्शी आहे. परंतु एकाच श्वानावर दुसरे मस्तक प्रत्यारोपित करून त्यांनी दोन डोकी असलेला श्वान समोर आणला यामुळे ते अधिक चर्चेत राहिले. या त्यांच्या प्रयोगानंतर डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनीही तसाच प्रयोग करून पाहिला.
डेमीखॉव्हचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेले.एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणीच पितृछत्र हरपले. परंतु त्यांच्या आईने जिद्द सोडली नाही. स्वतः अल्पशिक्षित असूनही तिने तीनही अपत्यांना उच्चशिक्षण दिले. १९३४ मध्ये डेमीखॉव्ह यांनी मॉस्को विद्यापीठात जीवशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला तेव्हा प्रवेश होतांनाच अडचण आली. विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेतेवेळी पांढरा शर्ट व टाय घातलेले स्वतःचे छायाचित्र द्यावे लागत असे. डेमिखॉव्हकडे पांढरा शर्ट व टाय नव्हता व विकत घ्यावयास लागणारे पैसे देखील नव्हते. एका छायाचित्रकाराला त्यांची दया आली. त्याने डेमीखॉव्हच्या छायाचित्राला शर्ट व टायचा साज चढविला आणि त्यांची अडचण दूर केली. इतक्या कठीण परिस्थितीतून सुरुवात करून डेमीखॉव्ह त्यांच्या क्षेत्रात अत्त्युच्च पदावर पोहोचले.
वृद्धापकाळी अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा विकार जडला त्यामुळे १९६० मधील त्यांच्या शोधनिबंधावर त्यांना अधिक काम करावयाचे होते ते काम अपूर्ण राहिले. १९९८च्या एप्रिल महिन्यात ते न्यूमोनियाने आजारी झाले. अर्धांगवायूने परावलंबित्व आले होते. ११ जुलै १९९८ला त्यांची पत्नी लिया यांचे निधन झाले. त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. २२ नोव्हेंबर १९९८ रोजी मॉस्को शहराच्या बाहेरील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
— डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे
Leave a Reply