नवीन लेखन...

स्कॉच… फक्त दर्दी लोकांसाठी

स्कॉटलंड यार्ड पोलिस आणि स्कॉच एवढ्या दोनच गोष्टींसाठी मला स्कॉटलंड माहितीये. न पाहिलेल्या स्कॉटलंडचा मी तहहयात ऋणी आहे. मोरावळा आणि स्कॉच जितकी जुनी होत जाते तितकी ती चविष्ट होत जाते.

स्कॉच म्हणजे मधुबाला. क्वॉलीटी अशी की क्वांटीटीची गरज नाही. अत्यंत कठोर परिश्रमानंतर स्कॉच बनवतात तिकडे. प्रत्येक कंपनीचे पाणी घ्यायचे झरे ठरलेले आहेत असं वाचलंय. एक घोट घेऊन ती स्कॉच कुठल्या झऱ्याच्या पाण्यापासून तयार झाली आहे असं सांगणारे व्यासंगी लोक आहेत तिकडे.

हे म्हणजे कॉलेजात शंभर फुटावरून पुसट दिसणाऱ्या पाठमोऱ्या मुलीची डिव्हीजन, आत्ता कुठे चाललीये, डावी उजवीकडे कोण कोण आहे असा तपशील देऊ शकणाऱ्या महाभागाच्या व्यासंगाच्या तोडीचं आहे.

स्टीलच्या ग्लासमधून घ्यायची वारुणी ही नव्हे, हे म्हणजे मधुबाला जात्याच सुंदर आहे म्हणून तिला प्लास्टिक जरीची दीडशे रुपये किमतीची लालभडक साडी नेसवण्यासारखं आहे. तिचा मान तिला द्यायलाच हवा.

तिचा तो गोल्डन यलो कलर कट ग्लास मधे ओतल्यावर बघत रहावा नुसता. तळापासून संथ लयीत वरती येणारी मोहरीच्या आकाराच्या बुडबुड्यांची रांग, ग्लासच्या बाहेर जमा होऊ लागलेलं धुकं अनिमिष नेत्रांनी बघत रहावं. मला कायम तो फ़्रौस्टेड ग्लास बघितला की “एक लडकी भिगी भागीसी…” मधुबाला आठवते. थंड स्पर्शाची, आत ज्वालामुखी बाळगणारी..!

स्कॉच निष्कपटी आहे, आरपार दिसतं ग्लासातून. त्यातून बघताना तुम्ही ठरवायचं कुठल्या आठवणींची रांग समोरून न्यायची ते. दु:ख, ताण वगैरे विसरण्याच्या नावाखाली व्यसन म्हणून प्राशन करण्याचा हा मद्यार्क नव्हे.

स्कॉच हा धांदलीचा विषयच नाही. माहौल पाहिजे. स्नेहभोजनाची गर्दी इथे कामाची नाही. चारजण म्हणजे सुद्धा गर्दीच ती. एकमेकांचे चेहरे स्पष्टं दिसतायेत एवढा पुरेसा उजेड….

तोंडात टाकायला जीभ चुरचुरेल अशी लसणाची तिखट शेव, खारे काजू, तळलेला बांगडा, सुरमईचा तुकडा, शिंगाड्याच्या पिठातले तपकिरी दाणे, चिजलिंगची मुठीनी खायला बिस्किटे, एवढंच पुरेसं आहे.

राजकारण, अनुपस्थित व्यक्ती, वैयक्तिक दु:खं, अडचणी, व्यवहारीक कटकटी, सामाजिक विकास यावर बोलायची ही वेळ नव्हे.

मस्तं गाणी, संगीत, नविन काहीतरी वाचलेलं, ग्रेस, आरती प्रभू, सुरेश भट, महेश एलकुंचवार, जीए, बाकीबाब, वगैरे वगैरे आठवावं, सांगावं, ऐकावं.

उद्या सुट्टी आहे, थोडी शिरशिरी आल्यासारखं वाटू लागलंय, गर्भारबाई सारखं शरीर आळसावत चाललंय, पाय ताणले जातायेत, ग्लास खाली ठेवून परत उचलायला कष्ट पडतील म्हणून तो तसाच हातात धरून त्याच्यावर माया माया केली जातीये. बास, यापेक्षा काही नाही लागत वेगळं स्वर्गात चक्कर मारायला.

स्कॉच जिभेवरून पोटात जाते तो अनुभवण्याचा विषय आहे. आळवून म्हटलेल्या ठुमरीचा मजा, बेगम अख्तरच्या “जाने क्यू आज तेरे नामपे रोना आया…” चा दर्द, हुरहूर, तलतची “शामे गमकी कसम…”ची कंपनं, सैगलचं “बाबुल मोरा…”, किशोरचं “ये क्या हुआ…”, मुकेशचं “कही दूर जब…” त्यात वस्तीला आहेत.

तिचा घोट कसा जीभ मखमली लॅमिनेट करून जातो. तो थंड प्रवाह इच्छित स्थळी पोचेपर्यंत गळ्यातून मिनिएचर मोरपिसं फिरवत जातो. न चावणाऱ्या गोड काळ्या मुंग्या गुदगुल्या करत नखशिखांत फिरतात.

दोनचार आवर्तनं झाली की तुम्हांला नील आर्मस्ट्राँग झाल्यासारखं वाटू शकतं. तुम्ही चंद्रावर उतरला आहात, चंद्रावरचं काळं कुत्रं सुद्धा तिथे नाहीये, वजनरहित अवस्था, तरंगणं चालू डायरेक्ट. एवढी स्वस्तातली चांद्रसफर इस्रोच्याही आवाक्याबाहेरची आहे.

डोक्याला मस्तं मुंग्या आल्या की थांबावं, असोशीने संपवायच्या मागे लागू नये, बाटलीत राहिली म्हणून ती वाया जात नाही, नासत नाही, चव, रंग बदलत नाही. सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या दुनियेत ही स्कॉच मात्र ईमान राखून आहे.

— Received on WhatsApp 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on स्कॉच… फक्त दर्दी लोकांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..