पटकथाकार ग. रा. कामत यांचा जन्म १२ मार्च १९२३ रोजी अलिबाग जवळील सरी या गावी झाला.
ग.रा.कामत हे ‘ग.रा.’ या नावानेच प्रसिद्ध होते. कामत रुईया महाविद्यालयात शिकत असताना थोर संशोधक व अभ्यासक न.र.फाटक यांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांच्या साहित्यिक व संपादकीय गुणांना वेगळे वळण मिळाले. मराठी भाषेतील सुवर्णपदक मिळवण्याचा मानही त्याना प्राप्त झाला. त्यांचा पुढील प्रवास मात्र कलाटणी घेणारा ठरला.
व्यासंगी संपादक श्री. पु. भागवत हे त्यांचे समकालीन स्नेही. ग. दि. माडगूळकर हे ही ग.रा.कामत कामत यांचे गुरू. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी कामत यांनी माडगूळकर यांचे सहाय्यक लेखक म्हणून काम पाहिले होते. अतिशय तल्लख अशी स्मरणशक्ति,अफाट वाचन हे त्यांचे गुणविशेष होते. ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या संपादकीय विभागात ग.रा.कामत यांनी उपसंपादक म्हणून काही काळ नोकरी केली होती.
ग.रा कामत यांनी गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी लेखन केले होते. नवसाहित्य या शब्दाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी व हिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे कथालेखन कामत यांनी केले होते. मराठीपेक्षा कामत यांनी हिंदीत जास्त काम केले. राज खोसला यांच्या अनेक चित्रपटांसाठी कथा व पटकथा लेखन कामत यांनी केले होते. हिंदीत गाजलेल्या ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कच्चे धागे’, ‘काला पानी’, दो रास्ते’, ‘पुकार’, ‘बसेरा’, ‘मनचली’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘मेरा साया’ आदी चित्रपटांचे कथालेखन कामत यांनी केले होते.
‘मौज’ आणि सत्यकथा’ या मासिकांचे संपादकीय कामही त्यांनी पाहिले होते. ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्नी होत. ग.रा.कामत यांचे निधन ६ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply