शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचा जन्म ४ एप्रिल १९२९ रोजी झाला.
आकर्षक सजावटीच्या माध्यमातून सहा दशकांहून अधिक काळ पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभव प्राप्त करून देणारे कलाकार, गणेश मंडळांची सजावट करणाऱ्यांपासून ते नामवंत चित्रकार अशी कलाकारांची मांदियाळी घडविणारे महागुरू, पुण्यातील पहिली देखणी अशी फायबर ग्लासमधील महागणेश मूर्ती घडविणारे कसबी मूर्तिकार-शिल्पकार, मध्यंतरीच्या काळामध्ये हिडीसतेकडे झुकणाऱ्या उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय सजावट स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवाला विधायकतेच्या मार्गावर आणणारे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय श्रीधर ऊर्फ डी. एस. खटावकर हे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
शालेय शिक्षण घेत असताना खटावकर यांचे हात हे मातीमध्येच गुंतलेले असायचे. नाना वाडा शाळेमध्ये असताना बालवयातील दत्तात्रयाने १९४२ च्या ‘चले जाव’ लढय़ातही खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळेच राष्ट्रभक्तीचे झालेले संस्कार हे पुढे देवभक्ती आणि समाजभक्तीमध्ये प्रतिबींत झाले. कला शिक्षक म्हणून दोन ठिकाणी काम केल्यानंतर ते १९६३ मध्ये अभिनव कला महाविद्यालयामध्ये रुजू झाले. ड्रॉइंग आणि पेंटिंग, उपयोजित कला, आर्ट टीचर्स डिप्लोमा, विविध छंद वर्ग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करताना खटावकर हे स्वत:ही समृद्ध होत गेले आणि त्यांच्या ज्ञानाने सलग २५ वर्षे सध्या कला क्षेत्रात नावाजलेले कलाकार विद्यार्थीही घडले. पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे. अनेक वर्षे ते मंडळाचे अध्यक्ष होते. एवढेच नव्हे तर, शताब्दी पार केलेल्या पुण्यातील अनेक गणेश मंडळांसाठी त्यांनी सजावट आणि विसर्जन मिरवणुकीचे चित्ररथ करण्यामध्ये दिलेले योगदान अजूनही गणेशभक्तांच्या स्मरणात आहे. साधी राहणी आणि ज्ञानदान यामध्येच जीवन व्यतीत केलेल्या खटावकर सरांनी आपल्या करडय़ा शिस्तीने अभिनव कला महाविद्यालयातील नाठाळ मुलांनाही सरळ केले. पुण्यामध्ये गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील आरोपींना केवळ खटावकर यांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळेच फाशीची शिक्षा झाली होती. लौकिकार्थाने ते मार्च १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले तरी जीवनाच्या अखेपर्यंत कार्यरतच राहिले.
दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचे निधन २३ जानेवारी २०१६ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply