आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच छत्रपतींचा अश्र्वारूढ एकसंध ‘पुतळा’ बनवणारे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर यांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ रोजी रायगड जिल्ह्यातील सासवणे येथे झाला.
त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले.
मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर ‘लंडन रॉयल अॅतकेडमी’मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, ‘स्टोन क्रशिंग’ ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते परतले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय सरकारने १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. नानासाहेब करमरकर यांचे निधन १३ जून १९६७ रोजी झाले.
करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील ‘करमरकर शिल्पालया’ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply