नवीन लेखन...

कोकणातील कातळशिल्पे

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेकडचा सह्याद्री पर्वत ह्या दोघांच्या मध्ये असणारा भाग हा कोंकण म्हणून ओळखला जातो. हीच महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक आणि खाद्यासंस्कृतीने संपन्न अशी आहे. एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या भागात असणारे नितळ समुद्र किनारे, जंगलं, मंदिरे आणि इतर अनेक गोष्टींसोबतच ह्या भागाचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक कालखंडाबाबतचे विविध पुरावे आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याच्या आधी बांधले गेलेले अनेक किल्ले जसे की सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा, सुवर्णदुर्ग, पूर्णगड इत्यादी आणि त्याच्याही आधी बांधल्या गेलेल्या विविध लेणी ज्या साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या ते 7-8 व्या शतकापर्यंत अशा स्वरूपात दिसतात. परंतु त्याच्या आधीच्या कालखंडाचे कोणतेच पुरावे मोठ्या प्रमाणावर समोर आले नव्हते. पुरातत्त्वीय भाषेत त्याला dark age असे म्हणतात.

भौगोलिकदृष्ट्या जरी हा प्रदेश एक सारखा दिसत असला तरी भूशास्त्रीय जडणघडणीनुसार या भागाचे अजून 3-4 विभाग करता येतात. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड जिल्हा ह्या भागाचा भूप्रदेश मुख्यतः बेसाल्ट दगडाचा म्हणजेच काळ्या पाषाणाचा आहे आणि दक्षिण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमधील भूप्रदेश हा मुख्यत्वे जांभ्या दगडाचा असून त्याचा विस्तार अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा, कारवार करत केरळपर्यंत दिसतो. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड प्रामुख्याने दक्षिण कोकणात किनाऱ्या जवळच्या पठारांच्या माथ्यावर आढळून येतो. ह्या जांभ्या दगडाच्या कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ असे म्हणतात. तर ही सगळी प्रस्तावना द्यायचे मूळ कारण म्हणजे हा जांभा दगड ज्याला भूगर्भीय भाषेत laterite असे म्हणतात तो गेली अनेक वर्ष पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाची अशी अश्मयुगीन अनेक रहस्य दडवून बसला आहे.

अश्मयुगात शिकार करून पोट भरणारा माणूस हळूहळू एके ठिकाणी राहून साधारणपणे आतापासून 12,000 वर्षांपूर्वी  स्थिर जीवन जगू लागला होता. शिकार करण्यासाठी त्याच्याकडे असणारी दगडी हत्यारे आता जास्त विकसित झाल्यामुळे शिकार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ खूप कमी झाला होता त्या उरलेल्या वेळेचा वापर त्याने व्यक्त होण्यासाठी केला म्हणजेच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, तो बघत असलेले प्राणी, त्याचं स्वतःच जीवन याबाबतच्या गोष्टी तो चित्र रूपात दगडी भिंतींवर अथवा जमिनीवर कोरून किंवा रंगवून काढू लागला होता. ह्या कलेच्या प्रकाराला पुरातत्वशास्त्राच्या भाषेत Rock art किंवा भित्ती चित्र/ खोदचित्र असे म्हटले जाते. रंगवलेल्या चित्रांना pictogtraph आणि खरवडून काढलेल्या चित्रांना petroglyph असे म्हटले जाते. कलेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा गणला जातो. ही अशा प्रकारची चित्र जगभरात अंटार्क्टिका खंड सोडल्यास सगळीकडे सापडतात.

गेल्या काही वर्षात कोकणात अशा प्रकारच्या जमिनीवर निर्माण केलेल्या गूढ आणि अगम्य अशा खोदचित्ररचना हजारोंच्या संख्येने आढळून येत आहेत स्थानिक भाषेत त्याला ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. मानवी उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यातील कालखंडावर प्रकाश टाकणाऱ्या अत्यंत बहुमोल अशा या खोदचित्र रचनांमध्ये लहान आकारच्या खळग्यापासून अगदी चौकोन त्रिकोण आणि अनेक गूढ अगम्य अशा प्राण्यांच्या पक्ष्यांच्या चित्ररचनांचा समावेश होतो. परंतु कोकणातल्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने प्रचंड मोठी आहेत, आणि आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जवळपास 350 किलोमीटर एवढ्या प्रदेशात, विविध ठिकाणी पसरलेली आहेत. ह्या चित्रांमध्ये एक शिंगी गेंडा, हत्ती, वाघ, पाणघोडा, सोबतच अनेक पक्ष्यांची चित्रेसुद्धा कोरून ठेवली आहेत जे आता कोकणात अस्तित्वात नाहीत. ह्या चित्रांचा कालखंड सांगणे फारच अवघड आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा संशोधन चालू आहे. गेल्या शतकात साधारणपणे 1990 च्या आसपास रत्नागिरी गणपतीपुळे ह्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाच्या वेळी पहिल्यांदा एक चित्ररचना लोकांच्या नजरे समोर आली, त्यानंतर पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. श्रीकांत प्रधान, प्रा. गोगटे आणि डॉ. प्रबोध शिरवळकर ह्यांनी काही नवीन ठिकाणे शोधून काढली आणि तो अभ्यास जगासमोर मांडला. डॉ. अनिता राणे, डॉ. दाउद दळवी, प्रा. प्र .के. घाणेकर, डॉ. रवींद्र लाड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी असणारे श्री. सतीश लळीत ह्यांनी काही नवीन ठिकाणी संशोधन केले. कातळ शिल्पांचा शोध आणि संरक्षणाबाबत महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रत्नागिरी येथे असलेल्या ‘निसर्गयात्री संस्थे‘च्या सदस्यांनी म्हणजेच सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई ह्या त्रयीने. 2014 सालापासून ह्यांनी कातळशिल्पांच्या शोधाबरोबर त्याचे पुरातत्वीय महत्त्व स्थानिक लोकात पटवून दिले आणि संरक्षणाचे काम ही हाती घेतले. 2017 सालापासून ह्या अगम्य ठेव्याला कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनसुद्धा कामी लागले आहे. निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि महाराष्ट्र शासन आता एकत्रित ह्या गूढ आणि अगम्य विषयावर संशोधनात्मक आणि संरक्षणाचे काम करीत आहेत. ह्या उत्साही अभ्यासकांनी विभागाच्या सोबतीत आतापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावात 102 ठिकाणी जवळपास 1500 हून जास्त शिल्परचना शोधून काढल्या आहेत ही सर्व कातळशिल्प महत्त्वाची असून त्याची महसूलविषयक कागदपत्रांची पूर्तता करून ती राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करावीत यासाठीचे प्रयत्न चालू आहेत.

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. ह्याचा पाठपुरावा प्रथमत: राज्य पुरातत्त्व विभाग आणि मग केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण ह्यांच्यामार्फत झाला. पुढील काळात ह्यातील एखादी जरी जागा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केली तर त्याचा कोकणातल्या पर्यटनावर फार मोठा परिणाम होईल. भारतात एकूण पर्यटनापैकी जवळपास 50% पर्यटन हे ऐतिहासिक आणि वारसास्थळांच्या ठिकाणी केले जाते. कोकणात आधीच धार्मिक आणि निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालू आहे सोबतीला ह्याची भर पडली तर स्थानिकांना रोजगार मिळेलच सोबत स्थानिक पदार्थ, चालीरिती परंपरा, जीवनशैली ह्यांची सुद्धा जपणूक होऊन आर्थिक प्राबल्य निर्माण होईल.

कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. माणसाच्या उत्क्रांतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर निर्माण झालेली कला आणि तिचा इतिहास आपल्याकडे दडून बसला आहे जो जगासमोर आणणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत आम्ही पाऊलपुढे टाकले आहे. आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम पुढे न्यायचे आहे.

भारतात विशेषतः कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवगड तालुक्यात आणि तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 50 ठिकाणी अशी कातळचित्रे आढळतात. रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यात 42 गावांमधून 850 कातळशिल्पे-चित्रे सापडली आहेत.

रत्नागिरी जिल्हा : जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी-गोवडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इत्यादी. जिल्ह्यात 490हून अधिक कातळशिल्पे आढळतात.

राजापूर तालुका : देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेंडे, कोतापूर, खानवली, देवीहतोळ, नाचण  इत्यादी. राजापूर तालुक्यात 290 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.

लांजा तालूका : भडे, हरुचे, रुण, खानावली, रावारी, लोवगण इत्यादी या तालुक्यात 70 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.

देवगड तालुका : वाघोटन, बापर्डे.

गोवा : उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळ, कुडोपी.

सिंधुदुर्ग जिल्हा : सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणी सापडली आहेत. कुडोपी, वाघोटन आणि हिवाळे येथे कातळ-शिल्पे आढळून येतात. कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील समुद्र किनाऱ्यापासून पूर्व दिशेला 25 किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे 150 किलोमीटर अंतरात आणि 3700 चौरस किलोमीटर गावांमधील परिसरात कातळ चित्रे शोध संशोधन कार्य सुरु आहे. या कातळ शिल्प-चित्रांचा काळ मध्य अश्म युगीन म्हणजे इसवी सन पूर्व 10000 (दहा हजार वर्षे) असावा सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यातील विविध ठिकाणी जांभा पाषाणावर चित्रे,नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात.

चवा : मुंबई-गोवा महामार्गावरून गणपतीपुळ्याकडे  जाणाऱ्या  रस्त्यावर चवा गाव आहे. तेथील कातळशिल्पात तीन मानव आणि तीन प्राणी कोरण्यात आले आहेत. मानवाची धड विरहीत असून दोन्ही हात पसरलेले आहेत. दुसऱ्या मानवाच्या हातात फुलासारखा आकार दिसतो, तर तिसऱ्यात मानवाच्या बाजूला अस्वलासारखा प्राणी दिसतो.

दावूद :  येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमितीय रचना आहेत. गेंड्याचा कान आणि शिंग उठून दिसतात. या चित्रात गेंड्याचे अस्तित्व विस्मयकारक आहे कारण हा प्राणी कोकणात आता आढळत नाही. या आकृतीचा आकार 4 मीटर बाय 3 मीटर आहे. काही प्राणी माकड व कोल्ह्यासारखे दिसतात.

जांभरुण : या ठिकाणी मात्र 25 मीटर बाय 25 मीटर क्षेत्रफळात जवळपास 50 आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी 8 मानवाकृत्या  तर इतर जलचर प्राणी आणि चतुष्पाद प्राण्यांचे आकार आहेत.

कोळंब : रत्नागिरी शहरापासून राजापूर सागरी मार्गावर 7 कि.मी. अंतरावर आहे. येथे 10 प्राणी आणि मानवाकृती आहेत. मानवाकृतीचा आकार मोठा असून इतर प्राणी प्राण्यांच्या प्रत्यक्ष आकाराएव्हढे आहेत. यातील हरणाची आकृती लक्षवेधी आहे. या हरणाला दुहेरी शिंगे, वळलेली शेपटी, उघडेतोंड इत्यादी बारकाव कोरलेले आहे.

कापडगांव : हे ठिकाण रत्नागिरीपासून 20 कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ आहेत. इथल्या चित्र समूहात मानव, कासव, मानवी पावले आणि काही भौमितीय आकृत्या कोरलेल्या आहेत.

कशेळी : हे स्थळ थोडे दुर्गम भागात असून रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर गावखडी-गावडेवाडी बसस्टॉप पासून पाऊल वाटेने जावे लागते. दोन्हीकडून हे 40 कि.मी. अंतरावर आहे. इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळ-शिल्प असावं. इथल्या हत्तीची आकृती 18 मीटर बाय 13 मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या अकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंगरे, पक्षी, मोर यांसारख्या 70/80 प्राणी व पक्षी यांच्या आकृत्या आहेत.

देवीहसोळ : येथे जाण्यासाठी पावस-आडिवरे मार्गे भूगावाकडून पुढे देवी हसोळला पोचता येते. येथील आर्यादुर्गा मंदिराजवळ कातळ-शिल्पे आहेत. इथली चित्रे खरोखरच अनाकलनीय आहेत कारण आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्या कुठलाही प्राणी, पक्षी किंवा मीनवी आकृत्या नाहीत.

बारसू : राजापूर-आडिवरे रस्त्यावर बारसू हे गाव आहे. रत्नागिरीपासून 60 कि.मी.वर असून इथे दोन वाघांच्या मध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहेत.  माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोर सुध्दा आहेत. माणसाच्या छातीवर योनी सदृश्य आकृती दिसून येते.

उक्षी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याजवळ उक्षी गावात 6 मीटर बाय 6 मीटर आकाराचे हत्तीचा कातळ शिल्प आहे. हत्ती हा अतिशय देखणा असून त्याचा भव्य कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे कोरलेले आहेत.

प्रागैतिहासिक गूढ आकृत्या – निवळीफाटा निवळी फाट्यापासून गणपतीपुळ्याकडे जाताना साधारण 800 ते 900 मीटरवर डाव्या बाजूस नारळाची झाडे दिसतात त्या झाडांच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूस जमीनीवर काळ्या कातळावर काही गूढ आकृत्या कोरलेल्या दिसतात. चौरस आकारातील ह्या आकृत्या नेमक्या कशाच्या आहेत, त्या केव्हा कोरल्या गेल्या, त्याचा उद्देश काय यावर काहीच संशोधन झालेले नाही. कोरलेल्या एकसारख्या वााकार रेषा, आयत, त्रिकोण, अर्धवर्तुळ, उभ्या-आडव्या पट्ट्या, अशा आकृ्त्या आपणाला संभ्रमात टाकतात. तसेच काही मीटर पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूस काळ्या कातळात खोदलेली विहीर आहे. तिला पायऱ्या खोदलेल्या असून त्याची रचना, वैशिष्ट्यपूर्ण आकार पाहाण्याजोगा आहे.

राजापूरच्या कातळावरही तब्बल 14 किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासा, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती आढळल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्पे हा आजही मोठे गूढ आहे. ह्या आकृत्या कोणी आणि कधी खोदल्या असाव्यात याची नेमकी कोणालाही कालगणना आजतरी उपलब्ध नाही. एप्रिल-मे महिन्यात कातळावरचे सर्व गवत वाळल्यावर त्यावरील संबंधित आकृत्या दिसतात. कोकणातील जांभा दगडाचा विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती कोरली गेली आहेत. कोकणातील आदिमानवाच्या अश्मयुगातील कालखंडातील ही कातळ-शिल्पे राज्य संरक्षित स्मारके होणार आहेत. आणि भविष्यात जागतिक पातळीवर संरक्षित वारसास्थळ म्हणून मान्यता पावतील. या अमोल कातळशिल्पामुळे कोकणच्या पर्यटनाला वेगळीच दिशा आणि भरीव चालना मिळेल. कातळशिल्पांसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर केला असून, त्या अंतर्गत त्यांच्या जतन संवर्धनाची योजना अंमलात येणार आहेत. कोकणवासीयांनी देखील या जागतिक स्तरावरच्या अमूल्य ठेव्याची जाण  ठेवून त्याच्या संरक्षण करावे.

-ॠत्विज आपटे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

1 Comment on कोकणातील कातळशिल्पे

  1. वीर, तालुका चिपळूण येथेही राक्षसमोडा येथे कातळशिल्पे आहेत त्याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..