फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती. दुपारी माझा बारा वाजता वॉच संपल्यावर थर्ड मेट आणि मी जेवण करून शोर लिव्हवर जाणार होतो. साडेबारा वाजता जहाजावरुन खाली उतरलो. जहाजाच्या बाजूला असणाऱ्या एका जेट्टीवर हेलिपॅड होते. स्पेनच्या नेव्हिचे हेलिकॉप्टर एकसारखं तिथून उडायचं आणि जिब्राल्टरच्या सामुद्र धूनीवर टेहळणी करून परत यायचं. आणखी एका जेट्टीवरून रोरो फेरी बोट सर्व्हिस चालू होती, एका मोठ्या बोटीत ट्रक, बस, कार, टुरिस्ट आणि बरीचशी स्थानिक लोकं इकडून तिकडे ये जा करत होती. जिब्राल्टर चा खडक म्हणजे एक मोठा डोंगर आणि ज्याच्या पायथ्याशी ब्रिटिशांनी वसवलेले एक छोटेसे बंदर तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला स्पेनची सीमा समुद्राच्या पलीकडे सुध्दा स्पेनचा भूभाग. जवळच स्पेन मधील अल्जेसिरास बंदर. याच अल्जेसिरास बंदरामधून स्युटा बंदरासाठी रोरो फेरी बोट दर दोन ते तीन तासाने चालू असते. जिब्राल्टर आणि स्यूटा हे टूरिस्ट डेस्टिनेशन असल्याने इथे पर्यटकांची खूप गर्दी आणि वर्दळ असते.
आम्ही जहाजावरुन खाली उतरल्यावर जेट्टिवरून चालत चालत निघालो होतो. जेट्टीच्या कंपाऊंड वॉल वर बसलेले काही आफ्रिकन तरुण आमच्याकडे कुतूहलाने बघताना दिसले. जातांना सोबत कॅप्टन ने पासपोर्ट न्यायला सांगितले होते. स्युटा पोर्टच्या पण तिन्ही बाजुला समुद्र असल्याने तिन्ही बाजूला स्वच्छ आणि सुंदर बीचेस होते. जेट्टी बाहेर पडल्यावर थेट शहरच सुरू होत असल्याने बस किंवा टॅक्सी ऐवजी चालतच फिरायला सुरवात केली. सुंदर आणि आकर्षक फुलांनी आणि हिरव्यागार झाडांनी रस्त्याचे डीव्हायडर सजलेले होते. मोठं मोठे आणि मोकळे रुंद रस्ते आणि लहान मोठी दुकाने तसेच छोटे मोठे शॉपिंग मॉल बघत बघता एका मोठ्या मॉल मध्ये गेलो. या मॉल मध्ये स्पॅनिश वाईन आणि दारूच्या सेक्शन मध्ये केवढ्यातरी ब्रँड आणि प्रकारच्या रंगीबेरंगी वाईन आणि बॉटल्स चे प्रकार बघताना नवल वाटले. मग चॉकलेट्स वगैरे घेऊन बाहेर पडलो. एक लहानशी टेकडी चढायला सुरुवात केली तर दोन पोलिस आडवे आले मग त्यांना शिप क्रु आहोत असे सांगितल्यावर त्यांनी पासपोर्ट बघायला मागितले आणि पुढे जाऊ दिले. टेकडीवर चढून गेल्यावर स्युटा शहराच्या तिन्ही बाजूला असलेला समुद्र आणि समुद्रात निमुळता होत गेलेला भाग दिसत होता. दगडी बांधकाम केलेले चर्च, सुंदर बिचेस आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले रस्ते यामुळेच स्युटा एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून युरोपभर फेमस होते. टेकडी उतरून खाली बीचवर गेलो दुपारी तीन वाजून गेले होते तरीपण उन्हाचा त्रास वगैरे जाणवत नव्हता, बीचवर पांढरी स्वच्छ वाळू होती समुद्राचे पाणीसुद्धा अतिशय नितळ आणि स्वच्छ होते बरेचसे पर्यटक पाण्यात पोहत होते कोणी लाटांवर सर्फिंग करत होते तर कोणी सन बाथ घेत होते. आम्ही पण पाण्यात पोहण्याच्या तयारीने आलो होतो, त्यामुळे पाण्यात उतरलो पण थंडगार पाण्यामुळे काही मिनिटातच बाहेर आलो आणि जहाजावर जायला परत निघालो. जहाजावर परत येत असताना पुन्हा कंपाऊंड वॉल वर बसलेले तेच आफ्रिकन तरुण आढळून आले. आम्हाला पासपोर्ट विचारणारे पोलीस भेटले तसे या आफ्रिकन तरुणांना कोणी भेटले नसतील का अशी शंका सुध्दा मनात आली. जहाजाच्या गँगवे वर सतत कोणाची ना कोणाची ड्युटी असल्याने जहाजावर कोणालाही चढता येणे शक्य नव्हते. रात्री नऊच्या सुमारास कार्गो संपला आणि दोन तासाने जहाज निघाले सुध्दा. चीफ इंजिनियर इंजिन कंट्रोल रूम मध्येच होता अकरा वाजले होते मी इंजिनचा स्पीड वाढत असल्याने कुलिंग वॉटर टेंपरेचर आणि बाकी मशीनरी सेट करत होतो तेवढ्यात ब्रिजवरून कॅप्टन चा फोन आला. कॅप्टन सांगू लागला की दिवसभर पाच आफ्रिकन जहजाच्या आजूबाजूला घुटमळत होते त्यांच्यावर नजर ठेवून होतो पण जहाज निघताना फक्त तिघेच जण दिसले दुसरे दोघे जहाजावर पाठीमागच्या बाजूने दोराच्या सहाय्याने वगैरे चढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीफ इंजिनियर ने सांगितले आपण सर्च ऑपरेशन करून खात्री करून घेऊया कारण मोरोक्को आणि आफ्रिकन देशातील बरेचसे तरुण यूरोप मध्ये अनधिकृतपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. जहाजावर दोर फेकून अंधारात चढतात आणि युरोपियन पोर्ट येईपर्यंत लपून बसतात . रात्री सव्वा अकरा वाजता जनरल अलार्म वाजवून सगळ्यांना मस्टर स्टेशन वर बोलाविण्यात आले आणि जवळजवळ दीड तास जहाजावरील प्रत्येक भागात कोणी लपून बसले आहे का त्याचा शोध घेतला गेला. शोध घेणारे खलाशी आणि अधिकारी जीव मुठीत धरून जहाजाचा एक एक काना कोपरा शोधत होते कारण उंच आणि धिप्पाड आफ्रिकन लोकं जर काही हत्यारे घेऊन चढले असतील तर त्यांना शोधणाऱ्यावर हल्ला करतील ही भीती प्रत्येकाला वाटत होती. पण सुदैवाने कोणीही सापडून आले नाही. तरीपण रात्रभर प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता की दिवसभर पाच जण होते त्यातले दोघं जण नेमके जहाज निघताना अचानक कुठे आणि कसे काय गायब झाले. कॅप्टन सह बऱ्याच जणांनी त्यांना पाहिले होते आणि त्यांच्यावर नजर सुध्दा ठेवून होते. पण दिव्यांचा उजेड चुकवून काही क्षणात काळ्याकुट्ट अंधारात पाचपैकी ते दोघं काळेकुट्ट आफ्रिकन पटकन कुठे आणि कसे दिसेनासे झाले ते कोणच्याही लक्षात आले नाही, पण यामुळे दिवसभर कार्गो ऑपरेशन करून दमलेले सगळे जण पुन्हा सुट्टी झाल्यावर रात्री दोन अडीच तास सर्च ऑपरेशन साठी जमा झाले होते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर,
B.E.(mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply