नवीन लेखन...

सेकंड इंजिनियर

सकाळी साडे सात वाजता जकार्ता हुन निघालेली क्रू चेंज बोट साडे दहा वाजता जहाजाच्या जवळ येऊन पोचली होती. जवळपास 100 km अंतर कापून खोल समुद्रात उभ्या असलेल्या आमच्या जहाजावर यायला फक्त तीन तास लागले होते.

जहाजावर असलेल्या फक्त पाच भारतीय अधिकाऱ्यांशी ओळख करून झाल्यावर मला स्पेअर केबिन मध्ये सामान घेऊन पाठवले. ट्रेनी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक ऑफिसर दोघेही केबिन पर्यंत आले होते. बोटीतून सगळ्यांची आणि सामानाची चढ उतार करता करता अकरा वाजले होते. त्या दोघांनी साडे अकरा वाजता मेस रूम मध्ये जेवायला यायला सांगितलं आणि ते निघून गेले. पहिल्यांदाच एवढ्या जुन्या जहाजावर आलो होतो, जहाज माझ्या वयापेक्षा जास्त जुने होते तसेच जहाजावर लिफ्ट सुद्धा होती. केबिन मध्ये जाण्यासाठी जेव्हा लिफ्ट मध्ये पहिल्यांदा घुसलो तेव्हा एवढ्या जुन्या जहाजावरील लिफ्ट मध्ये जाताना पोटात भीतीचा गोळा आला होता.

चीफ इंजिनियर आणि मी ज्याला रिलीव्ह करायला आलो होतो तो सेकंड इंजिनियर दोघेही गोव्याचे ख्रिस्चन होते. कॅप्टन हिमाचल प्रदेशचा, इलेक्ट्रिकल ऑफिसर तामिळनाडू आणि केरळ बॉर्डरवरचा तर ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर वसई चा ख्रिस्चन पोरगा होता त्याची भाषा मराठीच होती.

मेस रूम मध्ये जेवायला गेलो तर बासमती राईस, डाळ, चिकन करी आणि छोले होते, एक इंडोनेशीयन कुक पाच भारतीय अधिकाऱ्यांना जेवण बनविण्यासाठी होता तर जहाजावरील इतर इंडोनेशीयन खलाशी आणि अधिकाऱ्यांना वेगळा कुक, नाईट साठी आणखीन एक तिसरा कुक आणि स्टीवर्ड वगैरे. या जहाजावर नेहमीपेक्षा जास्त क्रू होता कॅटरिंग आणि हाऊस किपींग चे कंत्राट दिले असल्याने त्यात रूम क्लिनिंग, कपडे धुवून इस्त्री करून पुन्हा केबिन मध्ये आणून देण्याची सोय कॅटरिंग आणि हाऊस किपींग मध्ये होती.

एरवी प्रत्येक जहाजावर वॉशिंग मशीन, ड्रायर रूम असतं पण तिथं कपडे स्वतःच मशीन मध्ये धुवावे लागतात, या जहाजावर सगळा हॉटेल सारखा कारभार होता. दोन वेळेला ताजी फळं कट करून प्लास्टिक रॅप करून केबिन मध्ये आणून ठेवली जात होती.

दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले. जाणारा सेकंड इंजिनियर एक एक करून सगळ्या मशीनरी आणि पंप दाखवत होता, कंट्रोल रूम बघूनच मला घाम फुटला होता. लांब लचक स्विचबोर्ड आणि त्यावरील अनेक स्टार्टर आणि स्विच तसेच इंजिन कंट्रोल पॅनल वरील शेकडो इंडिकेटर आणि प्रेशर गेज. दीड तास राउंड मारला पण डोक्यात काही घुसत नव्हते. असं वाटत होते पहिल्यांदाच एखाद्या जहाजावर आलो की काय, कधीही न बघितलेल्या मशीनरी बघायला मिळाल्या होत्या.

यापूर्वीच्या सगळ्या जहाजांवर डिझेल किंवा हेवी ऑइल वर चालणारे जनरेटर होते. कंट्रोल रूम मध्ये जनरेटर चालू करायचे फक्त एक बटण दाबले की, खाली जनरेटर चालू व्हायचा आवाज यायचा आणि जनरेटर ऑटोमॅटिकली लोड वर यायचा. म्हणजे एक जनरेटर चालू असताना जेव्हा जास्त इलेक्ट्रिक पॉवरची गरज असायची तेव्हा लोड वाढेल म्हणून दुसरा जनरेटर सुरु करायचा की मग दोन्ही जनरेटर वर अर्धा अर्धा इलेक्ट्रिक पॉवरचा लोड शेअर केला जायचा. हे सर्व ऑटोमॅटिकली व्हायचं एखादा जनरेटर असं लोड शेअर करण्यासाठी सुरु नाही झाला तर ऑटोमॅटिकली काही सेकंद गेल्यावर तिसरा जनरेटर सुरु व्हायचा. कधी कधी तर अचानक लोड वाढला तरीसुद्धा स्टॅन्ड बाय जनरेटर ऑटोमॅटिकली सुरु व्हायचा. क्वचित जर जनरेटर ऑटोमॅटिकली सुरु झाला नाही तरच प्रत्यक्ष जनरेटर जवळ जाऊन कंट्रोल रूम मधून का चालू झाला नाही ते शोधायचे आणि चालू करून पुन्हा लोड वर घ्यायला लागायचे.

या जहाजावर जनरेटर ऐवजी स्टीम वर चालणारे दोन टर्बो अल्टरनेटर आणि डिझेल वर चालणारा एकच इमर्जन्सी जनरेटर होता. स्टीम साठी एक मोठा बॉयलर होता जहाजाची संपूर्ण मशीनरी, इलेक्ट्रिक पॉवर आणि पंप हे सगळे एका बॉयलर मधून निघणाऱ्या स्टीम वर चालणारे होते. यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या पॉवर सिस्टीम आणि मशीनरी वर काम केले नव्हते.

चीफ इंजिनियर पंचावन्न वर्षाचा होता ज्याने वयाच्या अठराव्या वर्षपासून शिपिंग मध्ये जहाजावर काम करायला सुरुवात केली होती, याच जहाजावर तो थर्ड इंजिनियर म्हणून पंधरा वर्षांपूर्वी जॉईन झाला होता आणि तेव्हापासून फक्त एकदा हे जहाज सोडून कंपनीच्याच दुसऱ्या एका जहाजावर तीन महिने करून आला होता. मागील पंधरा वर्षे प्रत्येक वर्षातील सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ या एकाच जहाजावर घालवलेल्या चीफ इंजिनियरच्या हाताखाली काम करण्याचे वेगळेच दडपण आले होते.

दुसऱ्या दिवशी जहाजावर असलेले क्रूड ऑइल म्हणजेच कार्गो दुसऱ्या जहाजावर द्यायचा होता त्यासाठी कार्गो पंप आणि इतर मशीनरी कशा चालू करायच्या ते सगळं जुना सेकंड इंजिनियर दाखवत होता, पण डोक्यात काही जात नव्हतं, तो नेईल तिथं त्याच्या मागे जाऊन हा व्हाल्व खोल हा पंप चालू कर असं सगळं बघून मान हलवत होतो बस.

रविवारी इतर जहाजांवर असते तशी बिर्याणी या जहाजावर सुद्धा होती. पण सकाळी टी ब्रेक सुरु असताना बॉयलर मध्ये प्रॉब्लेम झाला मग पुढील चार तास स्टीम वर चालणारे टर्बो अल्टरनेटर बंद आणि पुन्हा चालू करण्यात गेले. त्या चार तासात सगळेजण काय करतायत आणि कसं करतायत काही कळत नव्हतं, सेकंड इंजिनियर जिथं जाईल त्याच्या मागे मागे मी आपला फिरत होतो. एकदाच सगळं सेटल झाले आणि आम्ही अडीच तीन वाजता बिर्याणी खाऊन संडे ची सुट्टी घेतली. पुढल्या दिवशी जुना सेकंड इंजिनियर सकाळी पाच वाजता जहाजावरून एका स्पेशल बोट ने समोर दिसणाऱ्या एका लहानशा बेटावर जाणार होता. त्या बेटावर ऑइल कंपनीचा गॅस पॉवर प्लांट आहे आणि तिथं जवळपास अडीचशे कामगार आणि खलाशी राहण्याची व्यवस्था आहे तिथून आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी जाकार्ता साठी बोट निघते, शुक्रवारी आमच्या जहाजावर येणाऱ्या बोट नी मी आलो होतो तर दोन दिवस हॅन्ड ओव्हर साठी वेळ देऊन जुन्या सेकंड इंजिनियरला सोमवारी पाठवले गेले. एक डे रूम त्यामध्येच ऑफिस, टीव्ही, म्युझिक सिस्टिम, फ्रिज लागूनच वेगळी बेडरूम आणि मोठं बाथरूम अशी दोन खोल्या असलेल्या सेकंड इंजिनियरच्या प्रशस्त केबिन मध्ये सामान शिफ्ट केले.

पुढल्या शुक्रवारी गोव्याचाच आणि ख्रिश्चन असलेला नवीन चीफ इंजिनियर जॉईन होणार होता आणि जहाजावर असणारा पंचावन्न वर्षीय चीफ इंजिनियर पुढल्या सोमवारी घरी जाणार होता. पुढील आठ दिवस चीफ इंजिनियर स्वतः मला सोबत नेऊन क्रू कडून काय काय कामे करून घ्यायचीत ते दाखवायचा आणि सांगायचा, डरने का बिलकुल नय धीरे धीरे सब समझ मे आयेंगा, आराम से काम करने का. कोई भी अपने माँ के पेट से सिख के नय आता तुम भी सिख लेंगा, टेन्शन लो मत. चीफ इंजिनियरचे असे बोलणे ऐकून सुरवातीला आलेले दडपण कमी व्हायचे.

शुक्रवारी नवीन चीफ इंजिनियर जॉईन झाला त्याने यापूर्वी चार वेळा या जहाजावर काम केले होते पण माझ्यासारखा नवखा आणि नवीन सेकंड इंजिनियर बघून तो स्वतःच दडपणाखाली दिसत होता.

तस बघितलं तर प्रत्येक जहाजावर गेल्यावर पहिले आठ ते दहा दिवस डोकं आणि मन पूर्णपणे ब्लँक असतं. ब्राझील मध्ये पहिल्या जहाजावर गेल्यावर, आयला कुठं येऊन फसलो आपण अशी अवस्था प्रत्येक जहाजावर प्रत्येक वेळी होत असते. जहाज जॉईन केल्यावर कुठल्या कुठं आलो आता बस झाले यापुढे पुन्हा जहाजावर यायचे नाही, शिपिंग सोडून द्यायचे असा विचार घोळत राहतो.

जसं जसे दिवस जातात तसतसं कामात रूळत जातो आणि बघता बघता कॉन्ट्रॅक्ट संपून जातो. फोर्थ आणि थर्ड इंजिनियर असताना पाच किंवा सहा महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असायचे पण सेकंड इंजिनियर झाल्यावर तीनच महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होते तरीसुद्धा जॉईन झाल्या दिवसापासून तीन महिनेसुद्धा तीन वर्षांसारखे लांबलचक वाटायला लागले होते.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर.

B.E.(mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..