नवीन लेखन...

सेकंड हँड

“बंड्या”! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा …

तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं. त्यानंतर शक्य तोपर्यत शाळेचा गणवेश – दप्तर सुद्धा त्याचंच वापरावं लागलं. वाढत्या वयात मुलांना कपडे काही महिन्यातच तोकडे व्हायला लागतात . त्यामुळे अगदी टाकून ही देववत नाहीत आणि घरी धाकटा मुलगा असल्याने त्यानी घातले की त्यालाही ते नवीन मिळाल्याचा आनंद. त्यावेळेस असे चांगले पण आपल्याला न होणारे कपडे ज्यांना ते कपडे बसतील अशा जवळच्या परिवारातल्या इतर मुलांना देण्याची प्रथा होतीच. त्यामुळे अशा कपड्यांचा प्रवास त्या त्या वयातल्या चुलत-मावस-आत्ये वगैरे भावंडात होत होत शेवटी ते फाटून पायपुसणं होईपर्यंत व्हायचा. दरवर्षी बंड्याची शाळेची पुस्तकं सुद्धा त्याच्यापेक्षा एक वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका मामे बहिणीकडून यायची. या न त्या कारणांनी बंड्याच्या नशिबी नेहमी जुन्या , वापरलेल्या वस्तूच यायच्या… कायम … “सेकंड हँड”..आणि ही गोष्ट आता इतकी जगजाहीर होती की आजूबाजूच्या मित्र मंडळींनी तर त्याला “सेकंड हँड बंड्या” असंच नाव ठेवलं होतं. सुरवातीला वाईट वाटायचं त्याला. पण आता त्यालाही अशा “सेकंड हँड” वस्तू वापरायची आणि लोकांच्या चिडवण्याची सवय झाली होती. तो काही मनाला लावून घ्यायचा नाही. पण या सगळ्यामुळे आधीच अबोल असणारा बंड्या अजूनच अलिप्त रहायला लागला. आणि हळूहळू “”शामळू””. इतर टग्या मुलांच्या भाषेत थोडा “चम्या” झाला होता. आजूबाजूला राहणाऱ्या त्या सगळ्या मुलांना यथेच्छ चिडवायला , टिंगल टवाळी करायला हा “सेकंड हँड” बंड्या म्हणजे नेहमीचंच “गिऱ्हाईक.” लहानपणापासून मोठा होईपर्यंत हा सगळा त्रास त्यांनी मुकाटपणे सहन केला.

“सेकंड हँड बंड्या , सेकंड हँड बंड्या”… म्हणत सगळ्यांनी त्याची कितीही खिल्ली उडवली तरीही “बंड्याचा फंडा” असा होता की, “वस्तू टाकून देण्यापेक्षा त्याचा पुरेपूर वापर होत असेल आणि विनाकारण होणारा खर्चही टाळला जाऊन दोन पैसे वाचत असतील तर मग “सेकंड हँड” वस्तू वापरण्यात काय गैर आहे?” हे कायम “सेकंड हँड” वस्तू वापरणं त्याच्या इतकं अंगवळणी पडलं होतं की तो नवीन वस्तू मिळत असेल तरी जुन्याचा पर्याय निवडायचा . कॉलेज मध्ये असताना चपला खराब झाल्या तर स्वतः नवीन घ्यायच्या ऐवजी बाबांना नवीन चपला घ्यायला लावल्या आणि तो बाबांच्या वापरू लागला. मोबाईल घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी भावाचा जुना फोन घेतला आणि त्याला नवीन.. नोकरी लागल्यावर स्कूटर घ्यायला जितके कमी पडतील तेवढे वरचे पैसे द्यायला वडील तयार असूनही स्वतःची आर्थिक मर्यादा लक्षात घेत “सेकंड हँड स्कूटर” घेतली . भाऊ स्कॉलरशिप मिळवून परदेशी शिकायला जायच्या आधी त्याला सगळ्या गोष्टी नवीन देऊन हा त्याचे जीन्स – टी शर्ट आनंदानी वापरू लागला . थोड्या घाबरट स्वभावामुळे गाडी चालवायला शिकलाच नाही कधी. पण नोकरी चांगली स्थिरस्थावर झाल्यावर कसाबसा धीर चेपत कार घेण्याचा निर्णय घेतला एकदाचा. आताशा चार पैसे राखून होता बंड्या. पण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकण्यापासून तयारी असल्याने हात बसेपर्यंत उगाच नवीन गाडीची वाट लागायला नको. म्हणून पहिली वहिली गाडी घेतली ती सुद्धा अखेर …….“सेकंड हँड”!

या अशा सगळ्या वागण्यामुळे आणि स्वभावामुळे “सेकंड हँड बंड्या” हे लेबल त्याला अधिकाधिक घट्ट चिकटंत गेलं … आणि इतक्या वर्षांनी सुद्धा तो आजूबाजूला राहणाऱ्या ,अम्या , मन्या, पक्या , सम्या आणि इतर सगळ्याच “स्मार्ट” मुलांसाठी टिकेचा आणि थट्टेचा विषय होताच होता. कधी कधी बंड्याची घुसमट व्हायची ,कधी राग यायचा , पण “जाऊ दे , हे सगळे आपलेच मित्र आहेत , अगदी लहानपणापासूनचे… त्यांच्यावर काय रागवायचं “ असा विचार करत एकटाच शांत बसून रहायचा आणि सगळं सोडून देत पुन्हा पूर्ववत व्हायचा …..

अशाच एका रविवारी दुपारी धडड धाड आवाज आला म्हणून बंड्या बाहेर आला तर जिन्याजवळ मन्या विव्हळत आडवा पडला होता . पाय सटकून जिन्यावरून गडगडत खाली आला होता . जबर लागलं होतं … रक्तही वहात होतं … बंड्यानी ताबडतोब त्याला एका मित्राच्या मदतीनी आपल्या गाडीत घातलं आणि जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेलं . डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेत आणलं म्हणून मन्या थोडक्यात बचावला होता… पण एक सर्जरी करावी लागणार होती आणि त्यासाठी तात्काळ B-ve गटाच्या रक्ताची गरज होती . या दुर्मिळ ग्रुपचं रक्त त्वरित मिळणं कठीणच होतं पण योगायोग असा की बंड्याचाही ब्लड ग्रुप तोच होता….रक्ताची गरज आहे हे समजताच बंड्यानी क्षणाचाही विचार न करता होकार दिला … बंड्यानी रक्तदान केलं आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. …. ३-४ दिवसांनी मन्याला स्पेशल रूम मध्ये हलवलं तेव्हा बंड्या आणि बाकीचे मित्र त्याला भेटायला गेले . बंड्याला बघून मन्याला एकदम गहिवरून आलं .
“मित्रा … तुला “सेकंड हँड बंड्या” म्हणत आम्ही इतके वर्ष तुला छळलं , चिडवलं पण आज तुझ्या त्या“सेकंड हँड” गाडीतून लवकर आल्यामुळे माझ्यावर वेळेत उपचार सुरु झाले .तुझ्या रक्तदानामुळे मी वाचलो. तुझ्याकडून घेतलेलं ते “सेकंड हँड रक्त” माझं शरीर आज वापरतंय म्हणून मी जिवंत आहे रे आज !! …. खरंच आम्हाला माफ कर रे बंड्या !” तू कसलाही राग मनात न बाळगता मैत्री निभावलीस !! “अरे काय मन्या ?? … तू पण ना … आता लवकर बरा हो… घरी ये !!“…

इतक्यात दारावर टकटक करत एक नर्स आत शिरली आणि बंड्या जवळ काही पेपर देत म्हणाली “ “सर इकडे तुमची एक सही राहिली आहे !! ” असं म्हणून बंड्याची सही घेऊन ती निघून गेली. मन्यानी विचारलं .. “ काय रे ? कसला फॉर्म होता तो?“काही नाही रे. माझ्या देहदान आणि अवयव दानाचा फॉर्म भरून दिला होता काल मी त्यावर चुकून एक सही राहिली होती!” “देहदान? अरे असा काय निर्णय घेतलास? आणि इतका मोठा निर्णय तू असा तडकाफडकी?”

“अरे! आज वर कायम जुन्या वस्तू वापरत आलेल्या मला कसली या निर्णयाची खंत! उलट जुनी वस्तू चांगली असेल तर टाकून देण्यापेक्षा कोणाला तरी त्याचा उपयौग झाला तर चांगलंच आहे की? उद्या जर माझ्या पश्चात माझे “सेकंड हँड” डोळे वापरून कोणाला “दृष्टी” मिळणार असेल , माझे इतर “सेकंड हँड” अवयव वापरून कोणाला “जीवनदान” मिळणार असेल आणि अगदीच काही नाही तर मरणोत्तर माझी “अचेतन” अशी “सेकंड हँड” बॉडी वापरून, त्याचा अभ्यास करून काही मेडिकलच्या विद्यार्थांच्या ज्ञानात-मनात “नवचेतना” निर्माण होणार असेल तर त्याचा आज जिवंतपणी मला नक्कीच आनंद आहे.”

बंड्याचा हा दृष्टीकोन , त्याचे हे शब्द ऐकताना मन्या सकट तिथे उपस्थित सगळ्या मित्रांच्या अंगावर काटा आला , काळजात चर्रर्र झालं आणि, डोळ्यात आपसूकच पाणी आलं. ज्या बंड्याला आपण इतके वर्ष हिणवलं , त्याच्यापुढे आज स्वतःच खूप खुजे असल्यासारखं वाटू लागलं. “सेकंड हँड” या काहीश्या नकारात्मक छटा असलेल्या शब्दाला त्यानी त्याच्या या “फर्स्ट हँड” विचारांनी सकारात्मकतेच्या अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवलं होतं. ज्या so called “स्मार्ट” मुलांनी त्याला आजवर “चम्या , बुळ्या, बावळट ठरवलं होतं तो बंड्या आज आपल्या कृतीनी खराखुरा “स्मार्ट” ठरला होता.

बंड्यासारखा सच्चा मित्र मिळाला म्हणून सगळे स्वतःला भाग्यवान समजतात आता … बंड्याला आजही सगळे मित्र “सेकंड हँड बंड्या” असंच म्हणतात पण आता थट्टेनी ,चेष्टेनी नाही तर …आदरानी …. अभिमानानी….. सलाम ठोकत… हाक मारतात …. “सेकंड हँड बंड्या” !!!!

© क्षितिज दाते.
ठाणे. “

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..