आपण जसे आपल्या पहिल्या ‘ इनिंग ‘ कडे ,- म्हणजे शिक्षण , नौकरी -व्यवसाय , लग्न – या कडे जसे लक्ष देतो तसे आपल्या ‘ सेकंड इनिंग ‘ कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य . या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते . ‘वेळ आल्यावर पाहू ‘ ‘ आत्ताच काय घाई आहे ?’ म्हणून टाळून देतो .
मीही तेच केले . अचानक दोन वर्ष मुदत -पूर्व निवृत्ती घेणे भाग पडले , अन माझे काय चुकले हे लक्षात आले . पण तोवर वेळ पुढे सरकली होती ! मला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले , त्यातील बऱ्याचश्या , पूर्व नियोजन केले असतेतर ,कमी किंवा सौम्य झाल्या असत्या असे आता वाटतंय . काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटतात , म्हणून हा लेखन प्रपंच .
‘ राहायला घर आहे , गाठीला चार पैसे आहेत , खायला पेन्शन आहे . आणि काय पाहिजे म्हातारपणी ?’ खरे आहे आर्थिक तरतूज आपण सर्वजणच करतो . ती गरजेची आहेच . पण शारीरिक आणि मानसिक ‘तयारी ‘ हि तितकीच महत्वाची असते . मला हे अंमळ उशिराच समजले . तोवर एक बायपास , एक अँजिओप्लास्टी पदरी पडली होती ! बोनस मध्ये बी. पी. !
उत्तम शरीर प्रकृती एक ‘असेट ‘ असते . रिटायर्ड लाईफ साठी सुद्धा . या मुळे अनेक गोष्टी तुमच्या पक्षात रहातात . जसे म्हातारपणी तुम्हाला इतरांवर विसंबून राहावं लागत नाही . प्रवास ,तीर्थ यात्रा . उल्हासात करता येतात . माझे एक जेष्ठ मित्र आहेत , वय साधारण सत्तरीच्या आसपास , गेल्या पाच वर्षात निम्मा जगप्रवास एन्जॉय केलाय , सी -डायविंग सह ! प्रकृतीची साथ नसती तर हे शक्य झाले नसते ! उत्तमप्रकृतीच्या जोरावर उद्योग धंदा , समाजकार्य करता येते . तुम्ही आधार मागणाऱ्यात नव्हे तर देणाऱ्यात असता .
निरोगी प्रकृती एक दिवसात मिळत नाही . येथे पूर्व नियोजन गरजेचे असते . व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता या कात्रीत बरेच जण केव्हा अडकतात हे त्यांनाच काळात नाही . (व्यसनात दारूचा खुप वरचा नम्बर लागतो . हल्ली दारू सोशल ड्रिंक झालीय ! स्टेट्स सिम्बॉल ! न पिणारा ‘मागास ‘ ठरतोय ! ). कुठल्याही व्यसनाचा ताण तरुणशरीर सहन करू शकते . पण त्यापासून होणाऱ्या हानी मुळे उतार वयात गम्भीर आजारांना आमंत्रण मिळते . तेव्हा वाटते आपण फक्त रोज सकाळी दोन कि.मी. चा वॉक केला असतात तर ……. किंवा वेळीच सिगारेट सोडली असती तर …… पण उशीर झालेला असतो . असो . ‘ आरोग्य ,व्यसन आणि पुनर्वसन ‘ या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे . येथे फक्त उत्तम आरोग्य या ‘ असेट ‘ चे शेअर्स घेण्यास लागलीच सुरवात करा इतकेच . योगा , प्राणायाम , जिम , पायी फिरणे जे जे शक्य असेल ते ते करण्याकडे कल असू द्या . याचे खात्रीशीर आणि फायदेशीर ‘रिटर्न्स ‘ नक्की मिळतील .
निवृत्ती नंतर येणारे सर्वातमोठे संकट रिकामा वेळ ! अक्षरशहा हा प्रचंड असतो .! हा वेळ रविवारच्या सुटी सारखा हवा हवासा वाटणारा नसतो . ती एक निर्जीव पोकळी असते ! न भरून निघणारी ! हि पोकळी भरून काढण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे ,छंद !
‘छंदानं विषयी ‘ नावाचे एक नितांत सुंदर पुस्तक डॉ . अनिल अवचट यांनी लिहलंय . एखादी व्यक्ती स्वतः चे छंद कसे जोपासते , त्यासाठी किती कष्ट घेते , कसा वेळ काढते ते हे पुस्तक वाचून कळेल . अहो छंद तरी किती , स्वयंपाक , ओरोगामि , बासरी , लाकडी कोरीवकाम , चित्रकला ,……… बापरे विचारू नका . निवृत्त होणाऱ्यांना ज्ञानेश्वरी , गीता , दासबोध या पेक्षा असले एखादे पुस्तक प्रेझेन्ट देणे योग्य होईल असे मला वाटते . एकंदर सांगण्याचा मुद्दा असा कि एखादा छंद जोपासा . पेपर वाचणे , टीव्ही पाहणे , नेट वर काही बाही पहात टाइम पास , करणे या पेक्षा काही नवीन शिकण्या कडे कल असू द्या . कारण नवीन शिकण्याने मेंदू वापरात रहातो , ‘विस्मरणा ‘ सारखे आजार दूर रहातात . इंटर नेट मुळे खूप काही घरबसल्या शिकता येते . चित्र कला , शिवणकाम , गिटार , ग्लास पैंटिंग , विणकाम भरपूर पर्याय आहेत . कुठलीही एखादी कला जरूर शिका . सर्व कलांमध्ये एक समान धागा असतो , लय आणि तल्लीनता , आणि कलेतली तल्लीनता हि प्रत्यक्ष ‘समाधी ‘ असते ! हा अनुभव घेऊन पहा . दहा मिनिटे एकाजागी मी न बसणार , पेंटिंग करताना तीन तीन तास एका जागी स्थिर असतो ! अन मला वेळेचे भान नसते ! माझा अनुभव तुम्हाला सांगतोय .
तुम्ही म्हणाल ‘ अरे मी आता पन्नाशी पार केलीय , आता कसली कला शिकतोय ? असल्या गोष्टी लहानपणीच शिकाव्या लागतात ! ‘ तुम्हाला सांगतो काही शिकायला वय लागतनाही . आईच्या पोटात असल्या पासून ते मरेपर्यंत काहीही शिकता येते . त्याला वय नाहीतर आवड असावी लागते . रवींद्रनाथ टागोर उत्तम चित्रकार होते . हि कला त्यांनी उत्तर वयातच आत्मसात केली . लांब कशाला माझेच उदाहरण देतो , (आत्मप्रवढीचा दोष स्वीकारून ) मी बरी चित्र काढतो असे पहाणारे म्हणतात , मी हि कला निवृत्ती नन्तर सुरवात करून शिकतोय .
एखाद्या विषयात -कलेत अशक्यप्राय वाटणारी प्रगती करण्यासाठी एक फण्डा तुम्हाला सांगतो ! फक्त दोनच गोष्टी करायच्या , एक आवश्यक ती सर्व सामग्री जमवायची आणि या सामुग्रीतून शक्य ते सर्व करायचे , यात मात्र बिल्कुक कसूर नको . या दोन गोष्टी सातत्याने केल्या कि तुम्हीच पाहाल, एके काळी ,अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही आत्मविश्वासाने करत आहेत !
‘ आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो . उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण घ्या . पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा . पण एव्हड्यावरच थांबू नका . साहित्य , चित्र ,संगीत , नाट्य , शिल्प , खेळ यातील एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा . पोटापाण्याचे उद्योग तुम्हाला जगवील . पण कलेशी केलेली मैत्री तुम्हास का जगायचं हे सांगून जाईल .’ —- हे उदगार आहेत आपल्या लाडक्या पु. ल. देशपांड्यांचे . तेव्हा –काम नाही काडीचं ,अन फुरसद नाही घडीची — असली अवस्था टाळायची असेल तर ‘कलेचा ‘ प्रस्ताव आहे . पहा विचार करा .
आपले उरलेले आयुष्य समाधानात जावे असे सर्वानाच वाटत असते . सकारात्मक दृष्टिकोन , किमान गरजा , आणि किमान अपेक्षा या गोष्टी समाधानाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात . नौकरीत असाल तर खुर्ची गेलेली असते . तिला चिटकलेला मानसन्मान हि तिच्या सोबतच जातो . त्याची अपेक्षा फोल ठरते . ‘अरे याला मी किती मदत केली होती ! अन हा आता साधी ओळखही दाखवत नाही ‘ हे शल्य बोचले तरी खरे असते . त्याला त्याचा कामासाठी नवा ‘साहेब ‘ मिळालेला असतो ! मनावरचे ओझे कमी करून घ्यायची सवय करून घ्यावी लागते . मनावरचा ताण कमी करण्यासाठी ‘क्षमा ‘ हे प्रभावी शस्त्र आहे . आपल्या दृष्टीने आपल्यावर अन्याय करणारे अनेक गुन्हेगार असतात . अन्याय सहन केलेले मन बदला घेण्यासाठी संधी शोधात असते , आणि संधी मिळाली तरी मनाचे समाधान होत नाही . पुन्हा ‘ये दिल मांगे मोर ‘ असतेच ! यावर उपाय एकच सर्वाना माफ करून टाकणे !
प्रामाणिकपणे सांगायचे तर या ‘गुन्हेगारांच्या ‘ यादीत आपण स्वतः हि असतो ! एखाद्या चुकीच्या निर्णया साठी मनाला खात असतो /स्वतःला दोषी समजत असतो ! तुम्हाला गम्मत म्हणून सांगतो माझ्या ‘क्षमे ‘च्या यादीत टॉप ला ‘मी’च होतो आणि दोन नंबरला कोण होत ठाऊक आहे ? प्रत्यक्ष ‘परमात्मा ‘! माणसापेक्षा मी अन्यायासाठी खूपदा देवालाच मी दोष दिला होता ! मग काय ? इतरांन सोबत स्वःताला आणि देवाला पण माफ करून मोकळा झालो ! क्षमा करणे हे इतरां साठी नाहीतर स्वतःसाठी गरजेचे असते , हे कृपया ध्यानात असुद्या .
जात -जात एक महत्वाची गोष्ट . आजवर आपण खूप जणांवर प्रेम केलाय . तसेच स्वतःवर हि करा . प्रेम करणे खूप सोपे असते . पण वयाच्या या टप्यावर या पेक्षाहि एक अवघड गोष्ट अंगिकारायची असते , द्वेष न करण्याची ! हे जमले तर उतार वयातले वरदान ठरेल !
आपला उत्तरार्ध सुखा -समाधानाचा जावा म्हणून थोडे मन मोकळे केले .’ उपदेशाचे डोस ‘ पाजणे हा हेतू नाही . आनंदाने , नियोजनपूर्वक , येणाऱ्या जेष्ठत्वाला सामोरे जा . आपल्या ‘सेकंड इनिंग ‘ला शुभेच्छा !
माझ्या प्रमाणे तुम्हालाही मंगेश पाडगावकरांची हि कविता आवडेल .
‘ सांगा कस जगायचं ?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत .
तुम्हीच सांगा कस जगायचं ?
डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ?
ऊन ऊन घास तुमच्या साठी वाढतच ना ?
दुवा देत हसायचं कि शाप देत बसायचं …..
काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसत ,
दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असत ,
प्रकाशात उडायचं कि काळोखात कुढायचं
तुम्हीच सांगा कस जगायचं ?’
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye