नवीन लेखन...

सेकंड ओपीनियन

साधारणपणे एखादी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला किंवा एखाद्या दुर्धर व्याधीचे निदान झाल्यावर ‘सेकंड ओपीनियन घेतलं का?’ हे शब्द आपल्या कानी पडतात. सेकंड ओपीनियन म्हणजे एखाद्या निर्णयाबद्दल त्या क्षेत्रातल्या अन्य एका तज्ज्ञाचे मत घेणे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असतेच असे नाही; शिवाय कित्येकदा अशा सल्ल्याने काही नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. याकरताच वैद्यकीय क्षेत्रात तरी या सेकंड ओपीनियनला अनन्यसाधारण महत्व आहे.

Physician आणि Surgeon हे भेद आयुर्वेदाने सर्वप्रथम जगाला सांगितले आहेत. जेथे फिजिशियनचे काम नाही तिथे ‘तत्र धान्वन्तरीयाणाम् अधिकार:।’ असे स्पष्टपणे सांगून रुग्ण सर्जनकडे सोपवण्याची पद्धत चरकसंहितेत वारंवार आढळते. फार कशाला? मूळव्याध असता कोणत्या अवस्थेत औषधे द्यावी आणि कधी शस्त्रकर्म करावे याचेही स्पष्ट निर्देश सापडतात जे आजही शतशः उपयुक्त आहेत. मात्र ‘जो scalpel ला हात लावण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो तो उत्तम सर्जन’ ही व्याख्याच आजकाल बदलत चालली आहे. अन्य पर्याय पडताळून न पाहता धडधड शस्त्रक्रिया करण्याचे निर्णय घेतले जातात हे दृश्य सर्रास दिसते. आपल्या शरीरातले अवयव म्हणजे काही चायनीज माल नव्हे की तिथे आपण ‘वापरा आणि फेकून द्या’ या तत्वाने वागावे!! प्रत्येक अवयवाचे काहीएक कार्य असते. हो; अगदी अपेंडिक्सचेसुद्धा. नसते तर त्याला आपल्या शरीरात जागा दिली गेली असती का? चांगले न खेळणाऱ्या खेळाडूला कुरवाळत बसायला आपले शरीर म्हणजे क्रिकेट टीम नव्हे. उपयोग नसता तर हकालपट्टी निश्चित होती. आधुनिक वैद्यक आजही प्रगती करत आहे; ज्या मेसेन्टरी नामक पोटातील एका भागाला केवळ आवरण असे समजले जात होते तो एक प्रत्यक्षात एक स्वतंत्र अवयव आहे असा शोध अगदी नजीकच्या काळातला आहे. यापूर्वी त्याकडे फक्त अवयव जोडणारा पूल म्हणून पाहिले जात होते.

शास्त्र कितीही प्रगत झाले असले आणि ‘झटपट’ शस्त्रक्रिया होत असला तरी त्यांनंतर आपल्या शरीराला पूर्वपदावर येण्यासाठी कष्ट लागत असतात याचा जणू आम्हाला विसर पडला असावा अशा पद्धतीने आम्ही वागत असतो. याकरताच एकदम शस्त्रक्रियेचा निर्णय न घेता सेकंड ओपीनियन महत्वाचं आहे. त्यातही हे मत आयुर्वेदाचं घ्या असं मी आवर्जून सुचवेन. पित्ताशय, गर्भाशय, गुडघे अशा कित्येक शस्त्रक्रिया आयुर्वेदीय उपचारांनी टाळता येतात हा आजवरचा अनुभव आहे. एका शास्त्राची मर्यादा ही दुसऱ्याचे बलस्थान असू शकते. आधुनिक वैद्यकात जिथे शस्त्रक्रिया हाच मार्ग असतो तिथेही आयुर्वेद अनेक पर्याय खुले करत असतो. यात कोणाला दूषण देणे हा हेतू नसून रुग्णाचे हित हे महत्वाचे आहे. स्वतःवर शस्त्रक्रिया करवून घेणे कोणाला बरं आवडेल? अगदीच नाईलाजाशिवाय ती शक्य तिथे टाळता आलेलीच बरी. आयुर्वेदीय उपचारांत असे करणे शक्य आहे हेच अनेकांना माहिती नसल्याने हा लेखनप्रपंच. यापुढे शस्त्रक्रियेचा सल्ला मिळाला की ‘सेकंड ओपीनियन’ मात्र आवर्जून आयुर्वेदाचेच घ्या!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

7 January 2017

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..