नवीन लेखन...

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ…!

जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. येणाऱ्या अडचणींवर कोणता उपाय करायचा हा सल्ला देखील तो आपलेपणाने मालकाला वेळोवेळी देत असतो.अलका अॅडव्हर्टायझिंगची कामं करीत असताना, एका बिल्डरच्या जाहिरातीसाठी माॅडेल हवी होती. नाटकांची डिझाईन, फोटोग्राफी करताना बॅकस्टेजची कामं करणाऱ्या गुरवची तोंडओळख झाली होती. त्यावेळी तो सांगत असे, कधी माॅडेलची गरज लागल्यास मला सांगा. या कामाच्या निमित्ताने त्याला आम्ही आॅफिसवर बोलावले.

गुरव हा शिडशिडीत बांध्याचा पस्तीशीचा ‘तरुण’ होता. मागे वळलेले कुरळे केस. भव्य कपाळावर लाल कुंकवाचा ओढलेला उभा नाम. गालावर वाढलेली थोडी दाढी, धारदार नाक, अंगात इन केलेला फुलांच्या डिझाईनचा फुलशर्ट, कमरेवर पट्याने आवळलेली चेक्सची फुलपॅन्ट. पायात शिवून घेतलेल्या चपला. तो आॅफिसवर आला आणि त्याची अखंड बडबड सुरु झाली. त्यानेच माॅडेल म्हणून सिने अभिनेत्री रजनी चव्हाणचे नाव आम्हाला सुचविले.

त्याने रजनीताईंना कामाविषयी कल्पना दिली. ठरलेल्या दिवशी मी त्यांच्या शुक्रवार पेठेतील घरी जाऊन कामाचा दिवस नक्की केला. फोटो काढण्याच्या दिवशी गुरव मेकअप किट व कपडेपटासह रजनीताईंना घेऊन रिक्षाने हजर झाला. आम्ही तिघेही मित्राच्या बंगल्यावर गेलो. गुरवने मेकअप कम असिस्टंटची ताईंची जबाबदारी उत्साहाने पार पाडली. फोटोसेशन झालं. पेमेंट दिलं. जाहिरात पेपरमध्ये झळकली.

गुरव वरचेवर येऊन भेटत होता. कधी माॅडेलची गरज लागल्यास मला सांगा, याची आठवण करून देत होता. वर्षभरात पुन्हा एका जाहिरातीसाठी पूर्वी केलेल्या फोटोसेशन मधील एक फोटो आम्ही वापरला. पेपरमध्ये आलेली जाहिरात पाहून गुरव आमच्यासमोर ‘दत्त’ म्हणून येऊन उभा राहिला व रजनीताईंनी बोलावलं आहे, असा निरोप दिला. रजनीताईंना या नवीन जाहिरातीचे पुन्हा पेमेंट केल्यावर गुरव ‘शांत’ झाला.

मध्यंतरी बरीच वर्षे निघून गेली. गुरव मंडईच्या बाजूला गेल्यावर तुळशीबागेतील गर्दीत त्याच ‘गेटअप’मध्ये हमखास दिसायचा. तुळशीबागेतील एका खेळण्याच्या दुकानात तो कामाला लागला होता. मला पाहिल्यावर त्याने जवळ बोलावलं व बोलू लागला, “आपलंच दुकान आहे नावडकर, कधी खेळणी घ्यायची असतील तर नक्की या. तुमच्यासाठी ‘जमवून’ देईन.’

१९९६ साली दादा कोंडके यांच्या ‘वाजवू का’चे काम करताना इंगवलीमध्ये गुरवची पुन्हा भेट झाली. आता तो सिने अभिनेत्री उषा चव्हाण यांचा असिस्टंट मेकअपमन म्हणून काम करीत होता. मध्यंतरी उलटलेल्या दहा वर्षांनंतरही त्याच्या वेशभूषेत काहीही फरक नव्हता. युनिटमधील लाईटमन, स्पाॅटबाॅय, सेटींग विभागातील कामगार असे सर्वजण गुरवची नेहमी चेष्टामस्करी करायचे. सकाळी नाष्ट्याला, दुपारच्या जेवणाला त्याची भेट होत असे. रात्री मात्र तो ‘ब्रम्हानंदी’ असे. तीन महिने शुटींग चालू होतं. गुरव सावलीसारखा उषाताईंसोबत असायचा. शुटींग संपलं. चित्रपट प्रदर्शित झाला. प्रिमियरला गुरव ताईंसोबत दिसला तो शेवटचाच..
आता ‘वाजवू का’ चित्रपट प्रदर्शित होऊनही तेवीस वर्षे झाली. मला गुरव पुन्हा कुठेही दिसला नाही. कदाचित, आता तो थकला असेल, डोक्यावरील केस अजून विरळ झाले असतील, डोळ्यांवर चष्मा आला असेल, मात्र कपाळावरील लाल कुंकवाचा टिळा मात्र तसाच ठसठशीत असेल…
© – सुरेश नावडकर ११-४-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..