जगण्याची साधी सोप्पी तत्वे – १११
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक १२
निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ५
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
काही जणांना वाटेल हा सगळा तात्विक भाग इथे कशाला ? यात आयुर्वेद कुठे आला ? हीच तर गंमत आहे. आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे.
आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !
आपले पुढचे सूत्र आहे सत्यवचन. केवळ नेहेमी खरं बोलावे, एवढाच सिमीत अर्थ नाही, तर नेहेमी खर वागावं. मुखवट्याशिवाय. जे आत तेच बाहेर. पण
सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयात् ….
जे ऐकायला, पहायला प्रिय वाटणारं असेल अशा भाषेत किंवा अशा आविर्भावात असावं. आणखी एका शब्दात सांगायचं झाल्यास कृष्णासारखं असावं. कृष्णा सारखं बोलावं.
कृष्ण आयुष्यात कधीही खरं बोलला नाही, असं आपणाला वाटतं. पण आफळेबुवांच्या एका किर्तनात एक गोष्ट सांगितलेली लक्षात आहे. अश्वत्थाम्याने अभिमन्युची बायको उत्तरेच्या गर्भावर, जी पाशवी शक्ती सोडली होती, ज्या शक्तीमुळे पांडवांचा वंश संपणार होता, त्या गर्भाचे रक्षण करण्यासाठी कृष्णांनी आपली सत्यपर वृत्तीचे मोल पणाला लावले होते. कृष्ण संकल्प करताहेत, “जर मी माझ्या आयुष्यात कधीही युद्धातून पाठ दाखवून पळून गेलो नसेन, आणि आयुष्यात कधीही खोटं बोललो नसेन तर उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहील.” नेहेमीच खोटं बोलण्यात पटाईत असणारा कृष्ण, आणि “रणछोडदास” हे बिरूद स्विकारणाऱ्या कृष्णाकडून या संकल्पाची सत्यता सर्वाना पटली. उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहिला.
मग कृष्ण जे खोटं बोलला ते, सर्व खरं समोर यावं यासाठी होतं. सत्य प्रस्थापित होण्यासाठी होतं. त्याचा त्यामागील हेतु महत्त्वाचा होता. नारदमुनीदेखील सत्यपर होण्यासाठी वारंवार युक्त्या वापरत होते. नारदमुनी, श्रीकृष्ण खोटं बोलले, म्हणून आम्ही पण त्यांचा खोटं बोलण्याचा आदर्श ठेवणार असा सोयीस्कर अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.??
शेवटी महत्त्वाचे काय आहे ? सर्वांचा उत्कर्ष व्हावा, दुःखी कुणी असू नये. कंस असो वा रावण जे असत्य आहे, चुकीचे आहे, ते प्रस्थापित होऊ नये, यासाठी सत्यपर होणे महत्त्वाचे आहे. मी एका टीपेत असे म्हटले होते, की अंतरी राम, बाह्यतः कृष्ण असावे. यात कोणतेही राजकारण नाही. कृपया याची नोंद घ्यावी. राम आणि कृष्ण या मानवी व्यक्ती म्हणून अभ्यासण्यापेक्षा तत्व म्हणून जरूर अभ्यासावीत.
सत्यपर होण्याचा, सत्य वागण्याचा एक महत्वाचा व्यावहारिक फायदा असा, की ते कधीही लक्षात ठेवावे लागत नाही. खोटं बोललेलं आजन्म लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे मेंदुचा बराचसा भाग अन्य लक्षात ठेवण्याच्या कामासाठी वापरता येऊ शकतो.
आरोग्यासाठी, जगण्यासाठी, हे पण आवश्यक आहे.आपण बाहेरून जसा विचार करतो, तसं आतून वागलो नाही तर शरीर आणि मन यामधे योग्य तो समन्वय होत नाही आणि रोगांची निर्मिती होते.
सत्य समन्वय साधणे, हे रोग न होण्यासाठी महत्त्वाचे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
३१.०७.२०१७
आजची आरोग्यटीप
Leave a Reply