या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे.
या सीमाभिंती एखाद्याला दुखावतील पण ती त्यांची समस्या असते. कोणाही घुसणाऱ्याला तुम्ही अडवलं नाही तर अंततोगत्वा तुमची दुखावले जाण्याची शक्यता बळावते. या भिंतींबगैर तुम्ही स्वतःचा अधिक्षेप करून घेऊ शकता आणि ही हानी कदाचित अधिक त्रासदायक ठरू शकते.
कार्यस्थळावर अशा सीमाभिंतींची पदोपदी गरज भासते आणि त्या रेषा सर्वानींच आखून घेणे गरजेचे असते. शक्तिमान/अधिकारशाहीचा पुरेपूर दुरुपयोग करून घेणारे व्यवस्थापक पदोपदी आढळतात. ते आधी तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतात आणि जर कोपराने खणता येण्यासारखं मऊ दिसून आलं तर वेळप्रसंगी कोणत्याही मर्यादा ओलांडून तुम्हाला जमीनदोस्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ही सवय कोणालाही लागण्याआधीच आपण शांतपणे पहिल्या पावलावरच अशी लक्ष्मणरेषा त्यांच्या दृष्टीस आणून देणे भलेपणाचे ठरते. अन्यथा उशीर होऊन पश्चात्तापाची पाळी येते.नोकरी गमावण्याची वैश्विक भीती आपल्याला तात्कालिक गप्प करू शकते, पण या जमिनीवर आत्मसन्मानाचा बळी जातो. दुसरी नोकरी मिळू शकते पण हातातून निसटलेला आत्मसन्मान “आतून ” गंज लागण्याची शक्यता वाढवितो.
इतरांसाठी या सीमाभिंती कदाचित मर्यादा असतील पण स्वतःसाठी त्या चौकटीतील मर्यादित स्वातंत्र्य ठरत असतात. त्या रक्षण करतात, सजग करतात. जे स्वतःभोवती सीमाभिंती बांधत नाहीत त्यांनाच कदाचित तुमच्या सीमाभिंतींबाबत आक्षेप असू शकतो.
गंमत म्हणजे कोणे एकेकाळी आम्हीं प्रशिक्षणा दरम्यान म्हणायचो- ” विटांचा वापर करून पूल बांधा, भिंती नकोत. कारण भिंती आपल्यामध्ये दुरावा निर्माण करतात आणि पूल आपल्याला सेतू बनून सांधतात.” वयाच्या या टप्प्यावर आता कळतंय पूल आणि भिंती दोन्हींची माणसांना सारखीच गरज असते. फक्त ते बांधकाम कोणत्या नात्यात करायचे आणि कितपत पक्के असावे हा तारतम्याचा भाग असतो.
सकाळी सकाळी “संज्या छाया ” नाटकाच्या लेखकाचे मनोगत पेप्रात वाचले- ” साठीनंतर /सेवानिवृत्तीनंतर वाढीव २०-३० वर्षांचे काय करायचे असा प्रश्न पडलेल्यांसाठी हे नाटक आहे म्हणे !”
उत्सुकता होतीच,आता ते बघायलाच हवे असे असोशीने वाटतेय- सीमाभिंतींचे नवे रुपडे अंगी बाणवता येईल का?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply