शालान्त परीक्षेत ८९% आणि बारावीत ८५% गुण मिळवलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला २००२ साली व्यावसाईक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला असता. विज्ञान विषयातील कुठल्याही पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन पुढे त्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या पण त्यावेळी जास्त होती. अशा वेळी धोपट मार्ग सोडून ठाणे शहरातील एक मुलगी दापोलीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश घेते ही विशेष गोष्ट होती.
सीमा हर्डिकर हि मुलगीच अशी विशेष होती. सीमाचे बालपण ठाण्याजवळील येउरच्या जंगलात गेले. १९८०-१९९० दशकात येऊरचा ठाण्याशी संपर्क आजच्या एवढा नव्हता. पुढे खाली शास्त्री नगरला राहायला आल्यावर घरापुढे मोठी बाग होती. आई आणि काकाबरोबर बागकाम करताना अपोआप बागेतील फुले, झाडे याबद्दल तिला प्रेम आणि आवड निर्माण झाली.
सरस्वती सेकंडरी स्कूल मध्ये सहावीत असताना वर्गातील इतर मैत्रिणींबरोबर तिने प्रथम राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भाग घेतला होता. त्यांचा विषय होता ‘ठाण्यातील मध्यवस्तीत असलेल्या तांबे हॉस्पिटल परिसरातील ध्वनी प्रदूषण’. आठवीत असताना त्यांच्या गटाचा विषय होता ‘मधल्या सुट्टीतील डबा’. हे दोन्ही प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले होते. प्रकल्पाच्या वेळी प्रत्यक्ष फिल्डवर्क करताना अनेक तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ या मुलांना मिळाला होता. मुख्य म्हणजे अशा फिल्डवर्कची आवड निर्माण झाली होती. अकरावी बारावीत असताना हरियालीच्या सिंगवीसर, डॉं. पेजावर आणि इतर सभासदांबरोबर येऊरचे जंगल, निसर्गशिक्षण या भूमिकेतून फिरणे सुरु झाले. या निसर्ग भ्रमंतीतून वनस्पतीशास्त्राबद्दलची जिज्ञासा सीमाच्या मनात रुजू लागली.
शालेय वयातील संशोधनाचे संस्कार आणि निसर्गाबद्दलची आवड बरोबर घेऊनच सीमाने शेतकी शास्त्रातील पदवी अभ्याक्रम सुरु केला. सीमाचे दोन्ही आजी आजोबा कोकणातलेच. वडिलांनी माळ रानावर आंब्यांची लागवड केलेली. त्यामुळे कोकणातील मातीशी तिचे नाते जोडलेले होते. सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला.
उच्च शिक्षणासाठी सीमाने संशोधनाच्या माध्यमातून एम.एस.सी. करण्यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपल्या एम.एस.सी.च्या अभ्यासक्रमा साठी तिने उद्यान विद्या विभाग (Horticulture) हा विषय निवडला. यासाठी तिने डॉ.काटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्ल्याडीओलस ची लागवड हा विषय निवडला. वर्षभर मित्र मैत्रिणीच्या साह्याने स्वतःच्या देखरेखीखाली रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने वाढ करून त्याची नियमितपणे नोंद ठेवली. वर्षाखेरीस जेव्हा फुले बहरली तेव्हा तिच्या मित्र मैत्रिणींना तिला फुलनदेवी हा किताब दिला. त्या वर्षी राहुरी कृषी विद्यापीठातून एम.एस.सी.ला ती पहिली आली होती.
या पुढे ती पीएच.डी ला प्रवेश घेईल अशी सर्व साधारणपणे अपेक्षा होती. सीमाने इथे पण सर्वांचा अपेक्षा भंग केला. पीएच.डी चा अभ्यासक्रम तिला संकुचित आणि पुस्तकी वाटला. एमएससी करीत असताना तिने पुण्यातील नामांकित आघारकर संशोधन संस्था आणि निसर्गसेवक यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला फिल्ड बॉटनीचा प्राथमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. या अभ्याक्रमाच्या दरम्यान एकंदरीतच तिला निसर्ग आणि विशेषतः वनस्पतीशास्त्राचे आकर्षण वाटू लागले.
निसर्गाच्या मोकळ्या विशाल प्रयोग शाळेत फिल्डवर्क करीत पुढे शिकण्याचा तिने निर्धार केला. साहजिकच फिल्ड बॉटनीचा एकवर्षाचा प्रगत अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. या दोन्ही कोर्सच्या निमित्ताने तिचा वनस्पती शास्त्राचा पुस्तकी आणि प्रत्यक्ष अनुभव असा दोन्ही अभ्यास झाला. विदर्भातील नागझिरा, नवेगाव बांध, गोंदिया मधील जंगले, तेथील झाडे वनस्पती, वेली, या बरोबरच तळ्याकाठची परीसंस्था यांचा अभ्यास झाला. त्याबरोबरच महाराष्ट्रातील माळराने, पठार, अभयारण्ये, पाणथळ जागा, समुद्रकिनारे अशा विविध भौगोलिक प्रदेशातील परीसंस्था या सर्वांचाच तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास करता आला. हि सर्व भ्रमंती करताना पक्षी निरीक्षण हा छंद स्वाभाविकपणे जपला जातो. पक्षीशास्त्राची शास्त्रोक्त ओळख व्हावी म्हणून सीमाने या विषयाचापण प्रमाणपत्र अभ्याक्रम पूर्ण केला.
या सर्व उद्योगाबरोबर सीमाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषेदेच्या कामात पूर्णपणे वाहून घेतले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात आदिवासी बाल विज्ञान परिषदेसाठी शिक्षक विद्यार्थी कार्यशाळेत ती गेली सहा वर्ष नियमितपणे मार्दर्शन करीत आहे. मागील वर्षी जिज्ञासा ट्रस्टने बावीस ग्रामीण जिल्ह्यातून दोन हजार कि.मी ची गणित यात्रा काढली होती. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी सीमाने प्रकल्प अधिकारी म्हणून समर्थपणे पेलली.
सीमाच्या या अनेक क्षेत्रातील भटकंतीचे श्रेय तिचा जीवनातील जोडीदार सुबोधला आहे. एका यशस्वी बाईच्या मागे एक पुरुषसुद्धा असू शकतो हे सुबोधने सिध्द करून दाखवले आहे. सुबोधच्या साथीने सीमाने आत्ता निसर्ग शास्त्राचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्यावतीने वयस्कर आणि तरुण आशा दोन्ही वयोगटातील निसर्ग प्रेमींसाठी ‘फिल्ड बॉटनी एन्ड बियोंड’ नावाचा कोर्स आयोजित केला आहे. मार्च ते मे अखेरीपर्यंत फक्त वीक एंडला घेतल्या जाणाऱ्या या कोर्समध्ये बारा फिल्ड व्हिझिटचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वनस्पती शास्त्रातील जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शक म्हणून यायचे मान्य केले आहे. सीमाची आता पर्यंतची वाटचाल बघता ती या नवीन उपक्रमात यशस्वी होईल यात शंका नाही. नुसता पुस्तकी अभ्यास पूर्ण करून पैशाच्या हिशोबात आणि घड्याळ्याच्या काट्यात अडकून पडण्यापेक्षा आपले आयुष्य अधिक सहज आणि सुंदरपणे जगता येते हे सीमाने आजच्या पिढीला दाखवून दिले आहे.
— सुरेंद्र दिघे.
Leave a Reply