१९७० च्या दशकाच्या अखेरची ही गोष्ट. ” ड्युटी ऑफिसर ” म्हणून मी मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात बसलेला असताना रात्री ११.०० च्या सुमारास सोळा अठरा वर्ष वयाचे दोन तरुण पोलिस ठाण्यात अचानक धापा टाकत समोर उभे ठाकले. त्यांचा अवतार पाहून चार्जरूममधील आम्ही सर्वजण ताडकन उभेच राहिलो.
” अरे ! क्या हो क्या गया है ? कहाँसे आये हो ? ” धाऊन धाऊन उर फुटल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ” नाम क्या है तुम्हारा ? ”
” मैं लच्छमन और, और ये.. ये शत्रुघन ”
त्यापैकी एकाने उत्तर दिले.
शत्रुघ्न अखंड रडत होता.
आम्ही सर्वांनी महत्प्रयासाने हसू दाबून ठेवले .
कुर्ला पोलिस स्टेशनच्या हद्दीच्या उत्तरेकडील भागाला लागूनच घाटकोपर पोलिस ठाण्याची त्यावेळची हद्द होती. तिथे मुकंद आयर्न अँड स्टील हा मोठा कारखाना वसलेला होता. सुमारे सात ते आठ हजार कामगार असलेल्या त्या कारखान्यात बव्हतांशी कामगार ओरिसा राज्यातील उडिया भाषिक होते. या सगळया समाजाची वस्ती सिमेंटच्या पक्क्या चाळींमध्ये मुकंद कंपनीच्या समोर असलेल्या नाझ हॉटेलच्या मागच्या गल्लीत वसलेली होती. ही वस्ती कुर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असे.
अत्यंत एकोप्याने राहणाऱ्या या समाजात गणपती उत्सवात प्रचंड चैतन्य संचारलेले असायचे. गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापूर्वी पर्यंत रोज रात्री त्यांच्या वस्तीत उडिया भाषेतील विविध कार्यक्रम आयोजित केले जात असत. त्यात प्रामुख्याने नाटकांचे प्रयोग जास्त. सर्व नाटके पौराणिक कथांवर आधारलेली. नाटकातील स्त्रियांच्या भूमिका मात्र पुरुषच करत . आणि अशा भूमिका करण्यासाठी ओरिसाहून चांगली रक्कम मोजून नामांकित अशी ” नट मंडळी ” खास आणली जात.
त्या काळी लाऊडस्पीकर वापरावर वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. त्यामुळे ही नाटके किंवा इतर कार्यक्रम रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास सुरू होऊन पहाटे कितीही वाजता संपत असत. तेव्हाचे गणपती उत्सवाचे दिवस म्हणजे पोलिसांसाठी दहा दिवस पूर्ण जाग्रणाचा काळ .
त्या वस्तीत रंगात आलेल्या अशाच एका नाटकाच्या चालू प्रयोगाच्या ठिकाणापासून ही दोन पात्रं पोलिस स्टेशन पर्यंत कुठेही न थांबता पळत आली होती.
मुकुट नसले तरी दोघांच्याही डोक्यावर मानेपर्यंत रुळणाऱ्या केसांचे टोप. चेहरे मेकअप ने थापलेले आणि त्यावरून घामाचे ओघळ वाहील्याने गालावर चर पडलेले.भुवया रंगवलेल्या , रडताना डोळे चोळल्यामुळे काजळ डोळ्यांभोवती पसरलेले . कमरेला पितांबर . खांद्यावर उत्तरीय नसली तरी , दोघांच्याही खांद्यावर सोनेरी रंगाच्या कागदाचे वेष्टण चिकटवलेली धनुष्य आणि पाठीवर भाते. भात्यात बाण नव्हते. धावत असताना बहुदा बाण रस्त्यावर पडले असावेत.
” कहाँसे आये हो दौडते यहाँ तक ?” या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. कारण बाहेरील राज्यातून आलेल्या त्यांना इथल्या परिसराची काहीही माहिती नव्हती. यांच्या नाटकाचा कार्यक्रम त्या ठराविक गणेशोत्सव मंडळाचा असावा असा अंदाज केला आणि पोलिस ठाण्याच्या. ” गोपनीय विभागा ” च्या स्टाफ कडून त्याबाबत लगेच खात्रीही झाली.
पोलिस ठाण्यापासून ते ठिकाण जवळ नव्हते. ही रडत असलेली दोन पात्रं प्रचंड घाबरलेली , दमलेली होती . दोघेही नेमके काय झाले हे सांगू शकण्याच्या अवस्थेत नव्हते . नाटकाच्या ठिकाणी काहीतरी गडबड झाली आहे हे नक्की कळत होते.
काही वेळात मात्र ” शत्रुघ्न” पुटपुटला ” सीता को भगाके लेके गये l ”
” कौन लेके गया? ” या प्रश्नाला पुन्हा उत्तर नाही.
काहीतरी मोठी गडबड आणि तीही गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात झाली आहे हे कळल्यावर गप्प बसून भागणार नव्हते.
त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे एक हवालदार बंदोबस्ताला होतेच. त्यांचा मुद्दामहून पोलिस ठाण्यात फोन आला नव्हता. त्यावरून प्रकरण फार गंभीर नसावे असाही आमचा कयास होता. मात्र नाटक बंद पडले म्हणजे काहीतरी गोंधळ झाला असणार हे उघड होते.
त्या काळी landline telephone शिवाय संपर्काचे दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्या वस्तीपासून फार लांब नसलेल्या प्रीमिअर ऑटोमोबाइल्स कंपनीच्या सिक्युरिटी ऑफिसला मी फोन करून त्यांच्या प्रवेशद्वाराशी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हवालदारांना फोनवर बोलावून घेतले. तेही याबाबत अनभिज्ञ होते. त्यांच्यापैकी एखादा पोलिस हवालदार ताबडतोब नाझ हॉटेलच्या मागच्या उडिया वस्तीत मी पाठवायला सांगितलें . त्याप्रमाणे एक जण सायकल वरून लगेच रवाना झाला . मीसुद्धा पोलिस स्टेशन डायरीमधे नोंद करून एका हवालदारासह हातातील कामं बाजूला सारून , चेहेऱ्यांचा रंग उडालेल्या लच्छमन आणि शत्रुघ्न ला बरोबर घेऊन जीपने रवाना झालो. साधारण दहा बारा मिनिटात मी तिथे पोहोचलो असेन.
चाळींच्या मधल्या भागात एका मोकळ्या पटांगणवजा जागेत नेहमीच्या जागी स्टेज उभारलेले होते. स्टेजवर एक दोन विजेचे दिवे आणि पेट्रोमॅक्सच्या प्रकाशाचा झगमगाट . स्टेजला पुढे किंवा बाजूला पडदे नव्हते . फक्त मागच्या बाजूला एक मोठा लांबलचक पडदा . त्यावर अरण्य रंगवलेले . बहुदा किष्किंधा नगरी परिसर असावा . कारण सर्वांग काळे केलेले , मागे कमरेला उभारलेल्या शेपट्या खोचलेले वानरांचे काम करणारे दोघे एकमेकांना खेटून स्टेजवर एका बाजूला खाली पाय सोडून बसले होते . सुग्रीव आणि वाली असावेत. त्यानी वानरांचे मुखवटे आपण हेल्मेट धरतो तसे हातात धरलेले होते. पूर्ण अंग काळे रंगवलेले आणि त्यावर मेकअप न केलेले त्यांचे गव्हाळ चेहेरे . त्यामुळे ते दोघेही खऱ्या वानरांपेक्षा मजेशीर दिसत होते .
स्टेजला दोन्ही बाजूने उतरण्यासाठी पायऱ्या होत्या . पटांगणात एक मोठे जाजम आणि दोन बाबूंना एक लांब दोरी बांधून त्या दोरीला मधोमध एक मिणमिणत्या प्रकाशाचा बल्ब टांगलेला . अशी एकूण व्यवस्था. प्रेक्षकांतील पुरुष मंडळी घोळक्या घोळक्याने उभी राहून त्यांच्या भाषेत मोठ्यामोठ्याने बोलत होती. स्त्री प्रेक्षक मात्र मांडीवरच्या मुलांना दामटवत जाजमावर बसून होत्या.
पोलिस आलेत म्हटल्यावर काही जण मागे सरले तर काहींनी पोलिसांच्या भोवती गराडा घालून एकाच वेळी बोलू लागले. तो गोंधळ शमवून पुढे स्टेज कडे गेलो. सुग्रीव आणि वालीने उठून मला सलाम केला. त्यांच्या अवताराकडे पाहून आलेले हसू मी कसेबसे दाबले. एव्हाना आमच्या बरोबर आलेल्या लच्छमन आणि शत्रुघ्न यांना धीर आला होता . ते मोठ्या आवाजात वाली आणि सुग्रिवशी त्यांच्या भाषेत बोलत होते. आता त्यांच्या तोंडावर भाव मात्र फुशारकीचा.” पाहिले का कसे आम्ही पोलिसांना घेऊन आलो ? ” असा .
तेथे अगोदर बंदोबस्ताला असलेले एक आणि नंतर सायकल वरून पोचलेले असे दोघे हवालदार तेथील संबंधितांची नांवे आणि पत्ते लिहून घेत होते. नंतर करावयाच्या डायरी नोंदींसाठी या गोष्टी आवश्यक असतात. तिथे गेल्यावर कळले की नाटक चालू असताना सीतेचे काम करणाऱ्या नटाला मधेच कोणतातरी दुसरा गट तेथून जबरदस्तीने घेऊन गेला होता . त्यामुळे नाटक बंद पडले होते . नेमके काय झाले हे एक दोघाना विचारले परंतु आधीच लाजरे बुजरे असलेले ते लोक पोलीसांनी विचारपूस सुरू करताच दूर जाऊ लागले. स्टेजच्या मागे एका खुर्चीवर धोतर सदऱ्यातील मध्यम उंचीचे एक गोरेपान वयस्क गृहस्थ बसले होते. केस मानेपर्यंत रुळणारे ,कपाळावर मोठ्ठा गोल टिळा आणि गळ्यात फुलांचा हार. फार फार विमनस्क चेहेरा करून ते बसले होते . तिथे होऊ घातलेल्या नाटकाचे हे दिग्दर्शक आणि सूत्रधार. ” भयंकर , अति भयंकर ” असे बोलत खाली घातलेली मान ते सतत हलवत होते. त्यांच्या शेंडीची गाठ मानेच्या हालचाली बरोबर कधी या कानावर तर कधी दुसऱ्या कानावर आदळत होती..
त्यांना हाक मारून विचारलं , ” पंडितजी , क्या हुवा क्या है ? ”
त्यावर मान वर न करता ते स्वगत म्हणाल्या सारखे बोलत राहिले .
” पुरी उम्र रामलीला करते करते व्यतित हुई , किंतु ऐसी भयंकर वारदात जिंदगिमे पहली बार देखनेका दुर्भाग्य आज प्राप्त हुवा l ” आणि बरंच काही बोलत होते.
तेवढ्यात आमच्या नवले हवालदारांनी त्यांना , ” ऐसे पुटपुटो मत. जो कुच है वो सब के सब साबको पष्ट बोलो ” असं हिंदीमधे परंतु मराठी चालीत सांगितले. पोलिसी खाक्यापेक्षा आमच्या नवले हवालदारांच्या हिंदीमुळे काही आरोपीं काकुळतीला आल्याचे मी पूर्वी अनुभवले होते .त्यामुळेही असेल . पंडितजीं पटकन उभे राहिले आणि जे काही घडलं होतं त्याची समग्र माहिती देऊ लागले. पंडितजी ओरिसाचे . अनेक पौराणिक नाटके त्यांनी लिहिली होती. रामायण, महाभारतातील प्रवेशांचे लिखाण आणि दिग्दर्शन त्यांचा हातखंडा. त्यांची स्वतःची ओरिसामधे नाटक पार्टी होती. दर वर्षी गणपती उत्सवाच्या आधी एक महिना ते मुंबईत त्यांची पार्टी घेऊन येत असत. मात्र सर्व पात्रांना घेऊन मुंबईत येणे ही खर्चिक बाब असल्याने ते ठराविक पात्रांना घेऊन मुंबईत येत आणि दुय्यम भूमिका करण्यासाठी स्थानिक हौशी कलाकारांना नाटकात सहभागी करून घेत असत. इथला प्रयोग ज्या नाटकाचा होता त्यातील राम, हनुमान , भरत , शत्रुघ्न , सुग्रीव , वाली या भूमिका करणाऱ्या कलाकारांना घेऊन पंडितजी ओरिसाहून आले होते. मात्र त्यांच्या नेहमीच्या ताफ्यातील सीतेचे काम करणारा नट पंडितजींना काहीतरी कारण सांगून दीड महिना अगोदरच मुंबईत दाखल झाला होता. पंडितजी आल्यावर एक महिन्याच्या रिहर्सल नंतर इथले नाटक उभे राहिले होते . आज नाटक सुरू होऊन अर्ध्या पाऊणतासाने रंगात आले असताना अचानक बाहेरून आलेले तिन उडिया भाषिक तरुण जण स्टेजच्या डाव्या विंगेमध्ये गेले आणि आपल्या एन्ट्रीची वाट पाहत बसलेल्या सीतेशी भांडू लागले. इतकेच नव्हे तर तिला तेथून खेचून घेऊन जाऊ लागले. बाजूलाच असलेल्या आणि या प्रकाराने स्तंभित झालेल्या लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांनी पुढे होऊन तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे काही चालले नाही .सीतेनेही काही क्षण दु्बळा विरोध केला परंतु आपले काही चालणार नाही याचा अंदाज आल्याने ती त्यांच्याबरोबर तशीच सीतेच्या वेषात झप झप चालत गेली. प्रेक्षकांच्या बाजूबाजूने मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या गल्ली मधे उभ्या करून ठेवलेल्या टॅक्सीतून ते तिला घेऊन गेले. हे सगळे काही मिनिटांत घडले .
गल्लीतून कमी वेगात जाणाऱ्या टॅक्सीमागे लक्ष्मण आणि शत्रुघ्न ओरडत धावले. मात्र मुख्य रस्ता येताच टॅक्सी थांबली . त्यातून उतरलेल्या दोघांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न दोघानाही एक एक रट्टा मारून त्यांनाही टॅक्सीतून घेऊन जाऊ असे धमकावले . त्यांच्या पासून सोडवून घेऊन घाबरल्यामुळे ते पोलिस ठाण्याचा पत्ता पळता पळता विचारत आमच्या समोर येऊन थडकले होते .
स्टेजवरच्या पात्रांना विंगेत काय झाले ते काही नीटसे कळलेले नव्हते . काही प्रेक्षकांनी अचानक उभे राहून आपापसात बोलायला का सुरुवात केली याची त्यांना कल्पना येईना . स्टेजवरच्या प्रखर दिव्यांचे झोत चहेऱ्यावर पडत असल्यानेही असेल , त्यांना सीतेचे अपहरण नीट दिसले नव्हते .
स्टेजच्या उजव्या विंगेत प्रॉम्पटिंग करण्यासाठी बसलेले पंडितजी प्रेक्षकांना दिसू नये अशा बेताने बसले होते. त्यांनाही काय झाले याची चटकन कल्पना आली नव्हती. मात्र प्रेक्षकांमध्ये झालेला थोडा गलबला आणि स्टेजवरील पात्रांची चलबिचल यामुळे ते आपल्या अडोश्या मागून बाहेर आले आणि जे घडले होते ते ऐकल्यावर एका खुर्चीवर जाऊन जे बसले ते आम्ही येईपर्यंत उठले नाहीत .
सीतेच्या पार्टीला जबरदस्तीने घेऊन जाणारे उडिया भाषिक होते. त्यांच्या धमक्या देतानाच्या संवादात नटकाचाच संदर्भ येत होता अशी माहिती आम्ही काही मिनिटातच मिळवली. तिथे प्रत्यक्षदर्शी आणि सूत्रधार पंडितजी यांच्याशी बोलताना, नाटकात हनुमानाचे काम करणारा नट मेकअपसह आमच्या बाजुला उभा राहून उडिया भाषेत मधे मधे बोलून व्यत्यय आणत होता. त्यामुळे त्रासून नवले हवालदारांनी त्याला ” ए मारुती , तुम जरा उधर जाके चुपचाप बैठो ” अशी तंबी दिली. त्याला ” ए मारुती ” अशी हाक मारल्याने व्यथित झालेल्या पंडितजीनी किंचित रागाने ” मारुती नही , उनको हनुमानजी से संबोधित करो ” असे हवालदारांना सुनावले. सीतेच्या पार्टीने त्या जबरदस्तीने नेणाऱ्या लोकांना आपण पैसे परत करतो असेही सांगितल्याचे ” भरत आणि शत्रुघ्न ” यांनी ऐकले होते. परंतु ते लोक काही ऐकायला तयार नव्हते. मुकाट्याने बरोबर चल नाहीतर तुलाच पोलिस केस मधे अडकवतो असाही दम सीतेला त्यांनी दिला होता.
सीतेच्या पार्टीने दुसऱ्या ठिकाणी नाटक करायचे कबूल करून आगाऊ पैसे घेतले परंतु आयत्यावेळी फसवले अशी अटकळ मी बांधली आणि नेमके तसेच झाल्याचे नंतर कळले पण सीतेला नेले असेल कुठे? ….
उडिया भाषिक लोकांच्या वस्त्या मुंबईभर पसरलेल्या. सगळ्या वस्त्यात विविध कार्यक्रम आयोजित केलेले असणार हे निश्चित होते . सीतेला भर खेळातून उचलून नेले म्हणजे जिथे रामलीला खेळ आयोजित केला असेल अशाच ठिकाणी हेही नक्की. पण ते ठिकाण तातडीने शोधणार कसे! इथला प्रेक्षकवर्ग सुध्दा थोडा बिथरलेल्या अवस्थेत. त्यांची एकीकडे समजूत घालत सीतेला लवकरात लवकर परत आणून इथला खेळ सुरू करण्याचे आश्वासन देऊन आम्ही शांत केले.
हे असे परप्रांतीय मुंबईभर विखुरले असले तरी यांची प्रांतिक ज्ञाती मंडळे आणि त्यांच्या शाखा त्यांच्या वस्त्या वस्त्यांत उभ्या असतात. त्यांचा आपापसात नियमित संपर्क असतो आणि त्यांच्या सभाही होतात. एखाद्या वस्तीत समारंभ असला तर परस्परांना निमंत्रण असते. हे लक्षात घेऊन इथल्या वस्तीतील मुखियाशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला. तो इसम आसपास असणे स्वाभाविक होते परंतु तो कुठेच सापडेना. शेवटी तेथील एका चाळीतील त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडत नाहीत हे पाहून आम्ही पोलिस आलो आहोत असे सुनावले. त्या नंतर तिन चार मिनिटांनी एका मध्यमवयीन स्त्रीने दरवाजा उघडला. आणि काही विचारायच्या आधीच तिचे यजमान घरात नसल्याचे सांगितले. दरवाजा उघडायला लागलेला इतका वेळ आणि त्या बाईचे न विचारताच तुटक बोलणे पाहून मला थोडा संशय आला. दरवाज्याच्या आत मोजडी सारख्या पुरुषी वाहाणांचा एक जोड मला दिसला. हे कोणाचे असे तिला दरडावून विचारताच ती निरुत्तर झाली आणि वरच्या माळ्यावर लपून बसलेले आणि एका फटीतून आतापर्यंत खाली काय चालले आहे हे पहात असलेले तिचे यजमान खाली आले. गेले काही दिवस झालेल्या दगदगीमुळे त्यांनी त्या रात्री जरासा. ” श्रमपरिहार ” केला होता. त्यामुळे ते पोलिसांच्या समोर यायला धजत नव्हते. त्याना अभय देत त्यांच्याकडे विविध उडिया मंडळातून आलेली
निमंत्रणे वेळ न दवडता दाखवायला सांगितली. त्यांनी कॉटवरील गादीच्या कोपऱ्याखालून एक छोटा गठ्ठाच काढला . मी तो पंडीतजींच्या हातात देऊन त्यांना तपासायला सांगितले.
साकीनाका आणि मरोळच्या मधे एका उडिया वस्तीत रामायणावरील नाटक त्या रात्री प्रायोजित असलेले आढळले. पंडितजी आणि इथला मुखिया यांना बरोबर घेऊन आम्ही तातडीने त्या ठिकाणी निघालो. मुखियाला ती वस्ती बरोबर माहीत असल्याने आमची भरधाव जीप त्या गल्लीत वीस मिनटात पोचली. गल्लीत शिरताच लाऊड स्पीकरच्या आवाजावरून रामायणाचा खेळ रंगात आल्याचे कळले.इतकेच नव्हे तर लांबून कानावर पडणारे संवाद ऐकून तो आवाज अपहृत सीतेचाच असल्याचा पंडितजींनी निर्वाळा दिला. तिथे जीप पोचली . इथे अनेक दिव्यांची रोषणाई केलेली होती .
मात्र आमची जीप थांबल्यावर इथल्या नाटकाच्या कथानकाला भलतीच अनपेक्षित कलाटणी मिळाली.
पोलिस जीपमधून पंडीतजीना उतरताना पाहून नाटकातील सीतेने भर खेळातून स्टेजवरून विंगेच्या बाजूला उडी मारली आणि ती समोर दिसणाऱ्या गल्लीतून सुसाट पळत सुटली. क्षणभर रंगमंचावरील इतर नटांना आणि प्रेक्षकांना काही समजेना. वास्तविक सीतेच्या पार्टीला पोलिस जीप पाहून घाबरण्याचे काही कारण नव्हते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री बंदोबस्त तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याची पोलिस जीप येणे हे रोजचे असते. पंडितजी त्यांच्या भाषेत ओरडत स्टेजकडे धावले . बहुदा ” अरे ,तिला अडवा कोणीतरी ” असे त्यांनी सांगीतले असावे. कारण त्यानंतर नाटकातील श्रीरामही स्टेजवरून उडी मारून सीतेच्या मागे धावला. तेवढ्यात विंगेचा पडदा बाजुला करून लांबलचक आडवा मुखवटा धारण केलेला रावण अवतरला आणि त्यानेही मुखवट्या सकट त्या दिशेला धाव घेतली . त्यातच त्या गल्लीतील कुत्र्यांचे सामुदायिक भुंकणे सुरु झाले. सीतेचं काम करणारा तिथे नवखा असल्यामुळे लांब जाऊ शकणार नाही हा अंदाज होताच. मात्र अंगाने शिडशिडीत असलेला तो वेगाने पळून बरच अंतर कापू शकेल याची कल्पना होती. इथल्या नाटकातील रावणाची पार्टी स्थानिकच होती. गल्लीबोळ ठाऊक असलेल्या त्याला पळणाऱ्या सीतेला पकडायला वेळ लागला नाही. परतीच्या वाटेवर त्यांना धाऊन दमलेला रामही भेटला. राम आणि रावणाने सीतेला दोन्ही दंडाना धरून पंडितजींसमोर हजर केले. सीतेचा टोप धावताना मधेच कुठेतरी पडला होता . डोक्यावर शेंडी खेरिज केस नव्हते आणि मानेखाली पूर्ण सीतेचा पेहेराव. आल्या आल्या सीतेने पंडीतजींच्या पायावर लोळण घेतली . आणि त्यांच्या भाषेत ती क्षमायाचना करू लागली. संतापलेले पंडितजीं हाताची घडी घालून तिच्याकडे न पाहता तिला मोठयामोठ्याने दूषणे देत दूर होण्याबद्दल सांगत होते. अनपेक्षित घटनांनी भरलेल्या त्या प्रसंगाचे तेथील प्रेक्षक साक्षीदार आता आमच्या भोवती जमू लागले. त्यातील बरेच जण पंडीतजीना आदराने ओळखत होते. मी प्रथम सीतेला उठवून जीपमध्ये बसवले. तेथील बाकीची नट मंडळी भांबावून गेली होती. प्रेक्षक तर पुढे येऊन अर्ध्यावर थांबलेल्या खेळाचं काय याबद्दल विचारू लागले. तोपर्यंत सीता ज्या रस्त्यावरून धावत गेली होती त्या रस्त्यावर तिचा टोप शोधायला रावणाने पिटाळलेली दोन स्थानिक मुलं टोप घेऊन आली आणि त्यांनी तो जीपमध्ये बसून रडत असलेल्या सीतेच्या स्वाधीन केला. तेथील आयोजक मंडळाचे सदस्य आणि जमलेले तिथलेच प्रेक्षक यांचा वाद होण्याची चिन्हे दिसताच सीतेच्या पार्टीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करत असल्याचा मी बनाव केला. अपेक्षेप्रमाणे तसे न करण्याविषयी आर्जवं मला सर्वजण लगेचच करू लागले. पंडितजींच्या हयातीत असा प्रसंग पूर्वी कधी न घडल्याने ते हबकले होते. मला सीतेच्या पार्टीला माफ करण्या विषयी तेही विनंती करू लागले.
सीतेला जिथून आणली होती तिथला खेळ एका तासात पूर्ण करून नंतर इथला खेळ पूर्ण करून देण्यासाठी ती पुन्हा इथे येण्याला जर सर्वांची संमति असेल तर मी विचार करीन असे मी सर्वाँना बजावले. मधल्या वेळात त्या स्टेजवरून स्थानिक भजन मंडळाने भजने म्हणावीत असेही त्यांना सुचवले . सर्वांनी तो तोडगा एकमुखाने मान्य केला . सीतेचा विचार नंतर बदलू नये म्हणून पहाऱ्यासाठी तिथली दोन माणसे तिला परत नेण्यासाठी मी जीपमध्ये घेतली आणि लगेच निघालो.
सीतेला आमच्या हद्दीत मूळ ठिकाणी आणले. पंडितजींना ताबडतोब नाटकाचा खेळ सुरू करायला सांगितला.त्यांनी तो चालू केलाही.
दहा पंधरा मिनिटे मी तिथे काढली आणि बंदोबस्तावरील हवालदारांना योग्य त्या सूचना देऊन पोलिस ठाण्यामधे परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पंडितजी आणि झब्बा पायजमा घातलेली सीतेची पार्टी मला भेटायला हसतमुखाने पोलिस ठाण्यात हजर झाले . दोन दिवसांनी पश्चिम उपनगरात एका ठिकाणी त्यांचा रामायणाचा मोठा कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. त्याचं खास मला निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. अर्थात ड्युटीमुळे मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य होणार नव्हते.
रात्रीच्या रामायणात घडलेले उपकथानक सकाळी पोलिस ठाण्यात माझ्या सीनिअर इन्स्पेक्टर साहेबांना आणि इतर अधिकाऱ्यांना मी सांगितले होतेच . खूप हसलो होतो आम्ही सगळे. त्यातील पंडितजी पोलिस ठाण्यात आल्याचे कळताच सगळ्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. त्यांच्या नाट्यकलेतील तपश्चर्ये बाबत त्यांना बोलते केले. सर्वांनी त्यांच्या अत्यंत शुद्ध हिंदीतील मधाळ बोलीचा आगळा श्रवणानंद घेतला. पोलिस ठाण्यात लाभलेल्या आदरपूर्वक अनुभवाने तेही भारावून गेले.
आपल्यामुळेच रात्री रामायणाचे महाभारत घडले हे सर्वांना माहीत असल्याची पुरेपूर कल्पना आल्याने सीतेचे पात्र मात्र थोडे खजील होऊन बसले होते. मी जवळच्याच दुकानातून एक उपरणे आणि श्रीफळ मागवले.सामान्य व्यक्ती असूनही नाट्यकलेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या त्या पंडितजींना , आमच्या सीनिअर साहेबांच्या हस्ते ती भेट म्हणून अर्पण करून सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा छोटेखानी सत्कार मी तेवढ्यात घडवून आणला . त्यांना जीपने इच्छित स्थळी सोडले. आणि कधीही विसरता न येण्याजोगा त्या रात्रीच्या रामलीलेचा शेवटचा अंक संपला.
-अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply