लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत. यापैकीच एक उदगाव, ता. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील श्रमांजली महिला बचत गट. या गटाने सावंतवाडी येथील लाकडी खेळणी तयार करण्याची परंपरा काहीशा प्रमाणात खंडित केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काही तरी वेगळेच करुन दाखवावे या उद्देशाने बचत गट स्थापन करतानाच या बचत गटातील महिलांनी ठरवले आणि या नंतर मग विविध ठिकाणी पाहणी करत असताना लाकडी खेळणी पाहण्यात आली. मग श्रमांजली बचत गट स्थापन होताच या महिलांनी सुरुवातीला एक दोन लाकडी खेळणी बनवून पाहिली. ग्राहकांच्या पसंतीला ही खेळणी येताच, मग गटातील १०-१५ महिलांना ही खेळणी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या लाकडी खेळण्यांचे स्टॉल मग राज्यासह, इतर राज्यातही लावले आणि मग ही खेळणी संपूर्ण देशात पोचली.
बचत गटाची चळवळ राज्यात चांगलीच मूळ धरु लागली आहे. आता याचा जणू वटवृक्षच झाला आहे. या वटवृक्षाच्या छायेखाली ग्रामीण भागातील बहुजन तसेच वंचित समाजातील महिलांचे संसार बहरु लागले आहेत. शासनाच्या धोरणाने, प्रयत्नाने महिलावर्गात जागृती निर्माण झाली असून चूल आणि मूल यातच गुरफटलेल्या या महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. बँकांच्या कर्जाचा आणि शासनाच्या अनुदानाचा त्यांना फायदा होऊ लागला आहे. यामधूनच कोणी खाद्यपदार्थ तर कोणी भेटवस्तू तयार करु लागल्या आहेत. या बचत गटाच्या विक्री केंद्रातून या वस्तूंनाही मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
उदगावच्या (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) श्रमांजली महिला बचत गटाने मात्र लाकडी खेळणी तयार करण्याचे ठरवून तशा वस्तू तयार करुन प्रदर्शनात मांडल्या. प्रदर्शनास भेट देणार्या
महिलांच्या पसंतीस या वस्तू पडल्याने खेळण्यांची मागणी वाढली. खेळण्यातील विविधता त्यांना आवडली. ग्राहकांना नेमके काय हवे आहे, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे खेळणी आणि वस्तू साकारल्याचे या बचतगटाच्या श्रीमती गायकवाड यांनी सांगितले. ग्राहकांच्या पसंतीला अग्रक्रम दिल्याने श्रमांजलीच्या स्टॉलवर हमखास गर्दी होत गेली आणि आपसूकच विक्रीही वाढली. या लाकडी वस्तुमुळे पर्यावरणाबाबतचा संदेशही लोकांपर्यंत पोहोचला आणि मग मागणीत सातत्याने वाढ होत गेल्याचेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
बचत गटांच्या या खेळण्यांमध्ये ट्रक, रेल्वे, ट्रक्टर, चेंडू, विविध पक्षी, अगरबत्ती स्टँड, टेबल लॅम्प, मराठी-इंग्रजी अक्षरे, मसाजर, झुंबर, लोकडी झाड, भोवरे, फळांचा संच, पोळपाट, पशु-पक्षी तसेच लहान मुलांना भावणारी व मुख्य म्हणजे इजा न करणारी खेळणी आहेत. आतापर्यंत या बचत गटाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मराठवाडा, विदर्भ यासह राज्यभर आपल्या लाकडी खेळण्याचे प्रदर्शने भरवली आहेत. तसेच केरळ, हरियाना, बंगलूर, दिल्ली, जयपूर, हैद्राबाद आणि मुंबई येथेही प्रदर्शनाच्या माध्यमाद्वारे या गटाची खेळणी पोहोचली आहेत.
श्रमांजलीच्या महिला याशिवाय मेणबत्ती, खडू, लेदर बॅग, अगरबत्ती तयार करुन विक्री करत आहेत. गेल्या वर्षभरात दोन लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल आपल्या गटाने केल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले. बाजारात जाऊन मागणी नोंदवणे, त्याचा पुरवठा करणे, कच्चा माल उपलब्ध करुन महिलांना देणे या सर्व बाबी महिलाच हाताळत आहेत. त्यामुळे या महिलांचा आत्मविश्वासही दुणावला आहे, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply