एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. आपला हा विचार त्याने धनीरामलाही बोलून दाखविला. धनीराम सरळ स्वभावाचा व प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्याला विरोध केला; परंतु एक दिवस धनीराम पहाऱ्यावर असतानाच मस्तीरामने संधी साधली व खजिन्यावर डल्ला मारला.
राजवाड्यात चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सेनापतीने पहाऱ्यावरील सेवकाला पकडून आणण्याचे आदेश दिले व सैनिकांनी धनीरामलाच पकडले. मात्र धनीरामने चोरीचा इन्कार करताना मस्तीरामचे नाव सांगितले. त्यामुळे मस्तीरामलाही पकडण्यात आले. त्याने धनीरामनेच चोरी केल्याचे सांगितले. दोघेही एकमेकांचे नाव घेत होते. त्यामुळे खरा चोर कोण, असा सेनापतीला प्रश्र पडला. सेनापती हुशार होता. त्याने त्या दोघांनाही सोडून दिले, मात्र जाताना त्यांच्याजवळ राजवाड्यातील बागेतील दोन-दोन हिरवे आंबे दिले व त्यांना सांगितले की, ज्याने चोरी केली नाही त्याच्याजवळील एका आंब्याचा रंग रात्रीतून पिवळा होईल.
धनीराम व मस्तीराम दोघेही आपल्या घरी गेले. धनीरामने चोरी केलीच नव्हती, त्यामुळे तो घरी निवांत झोपला. मात्र मस्तीरामला झोप येईना. आंब्याचा रंग पिवळा (म्हणजे पिकलेला) झाला नाही तर आपली चोरी उघडकीस येईल या भीतीने त्याने मध्यरात्री दोनपैकी एका आंब्याला पिवळा रंग लावला व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सैनिक त्या दोघांच्या घरी गेले व त्यांच्याजवळील आंब्यासह त्या दोघांना सेनापतीपुढे उभे केले.
धनीरामजवळील दोन्ही आंबे हिरवे होते, मात्र मस्तीरामजवळील एक आंबा हिरवा तर दुसरा पिवळा दिसत होता. सेनापतीने सैनिकांना मस्तीरामच्या मुसक्या बांधण्यास सांगितले. शेवटी मस्तीरामने चोरी केल्याची कबुली दिली.
सेनापतीच्या धूर्तपणामुळे धनीरामसारख्या प्रामाणिक सेवकावरील चोरीचा आळ दूर झाला होता. त्यामुळे धनीरामने सेनापतीचे आभार मानले.
Leave a Reply