ज्येष्ठ अभिनेत्री आशा पोतदार यांचा जन्म २१ ऑगस्ट १९३९ रोजी बंगलोर येथे झाला.
बंगलोर येथील कानडी कुटुंबात आशा पोतदार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बंगलोर येथेच चित्रपट वितरक होते. मावशीच्या संगोपनात वाढलेल्या आशा पोतदार शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला आल्या. शिक्षणाबरोबरच नृत्याकडे आकर्षित झालेल्या आशा यांनी पार्वतीकुमार आणि चंद्रशेखर पिल्ले यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. नृत्यात पारंगत झाल्यावर त्यांनी देश-विदेशात नृत्याचे कार्यक्रम केले.
महाविद्यालयात शिकत असतानाच्या काळातच आशा यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. पु.ल. देशपांडे यांचे बंधू रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘अंमलदार’ या नाटकात त्यांनी अभिनय केला. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा विचारही न केलेल्या आशा यांना अभिनयातही रस वाटू लागला.
आशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली. रमेश देव यांच्याबरोबर त्यांनी साकारलेली नायिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पटकावून गेली.
१९६२ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवल्यानंतर आशा पोतदार यांनी ‘वावटळ’ (१९६५), ‘स्वप्न तेच लोचनी’ (१९६७), ‘प्रीत शिकवा मला’ (१९६८), ‘रात्र वादळी काळोखाची’ (१९६९), ‘अधिकार’ (१९७१), ‘बहकलेला ब्रह्मचारी’ (१९७१), ‘दोन्ही घरचा पाहुणा’ (१९७१), ‘तिथे नांदते लक्ष्मी’ (१९७१), ‘मला देव भेटला’ (१९७१), ‘देवकीनंदन गोपाळा’ (१९७७), ‘तुमची खुशी हाच माझा सौदा’ (१९७७), ‘मामा भाचे’ (१९७९), ‘बिजली’ (१९८६) अशा चित्रपटातून भूमिका साकारल्या. त्यांची भूमिका असलेल्या ‘वावटळ’, ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘स्वप्न तेच लोचनी’, ‘देवकीनंदन गोपाळा’ या चित्रपटांनाही पुरस्कार मिळाले.
मराठीमध्ये नाव मिळवलेल्या आशा पोतदार यांनी ‘मनचली’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केली. पुढल्या काळात दूरदर्शन मालिकांमधूनही त्यांनी काम केले.
आशा पोतदार यांचे ६ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.
महेश टिळेकर.
Leave a Reply