नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३३ मुंबई येथे.

चित्रा आणि रेखा सुखटणकर या अभिनेत्री बहिणीं पैकी रेखा यांचे आधीचे नाव कुमुद सुखटणकर. कुमुद सुखटणकर यांचे वडील मुंबईत आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये ‘लिपिक’म्हणून नोकरी करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास मुलींच्या शाळेतून त्यांनी १९४९ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. चार बहिणी अणि दोन भाऊ-आईवडील अशा परिवारातील कुमुद या सर्वात थोरल्या. जात्याच हुशार असलेल्या कुमुद यांनी पुढे एस.एन.डी.टी. महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए.ला प्रवेश घेतला. परंतु घरातील आर्थिक ओढगस्तीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. घरात उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते ते वडिलांची कारकुनीची नोकरी. एरवी कुमुद यांना बालकलाकार म्हणून छोटी-मोठी कामे मराठी, हिंदी चित्रपटांतून मिळत आणि दिवसाकाठी ५ रु. मोबदला त्यातून मिळे. कोकणातून आलेल्या या कुटुंबाने मुंबईतील सांस्कृतिक वातावरणाशी चांगलेच मिळते-जुळते घेतले होते. सुखटणकर कुटुंबातील या चुणचुणीत मुलीने तोवर सचिनशंकर, गौरीशंकर यांच्या बॅले ग्रूपमध्ये नृत्य शिकून भारतभर दौरे केले. गुरू पार्वतीकुमारांकडूनही त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थक, मणीपुरी, या प्रादेशिक नृत्यप्रकारांबरोबर त्यांनी लोकनृत्यांतही कौशल्य मिळवले. गांधर्व महाविद्यालयात त्यांनी घोडके यांच्याकडून गायनाचे धडेही गिरवले होते व ताल, ठेक्याचे ज्ञान मिळवले. या साऱ्या शिक्षणाचा फायदा त्यांना विविध ठिकाणी कला सादर करताना झाला.

सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती. पुढे १९५३ साली ग.रा. कामतांबरोबर रेखा यांचा विवाह झाला. लग्नानंतरही कामतांकडून चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली गेली. सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही. या चित्रपटाच्या यशानंतर रेखा यांना चित्रपट मिळत गेले. ‘कुबेराचं धन’हा प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट त्यांनी लागलीच केला. त्यानंतर ‘कोणं कुणाचं’,‘गंगेत घोडं न्हालं’,‘दिसतं तसं नसतं’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गृहदेवता’, ‘धाकटी सून’, ‘बाळ माझा नवसाचा’ असे तीसहून अधिक चित्रपट केले. ‘गृहदेवता’ या चित्रपटात त्यांची दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट रशियन फिल्म फेस्टिवलमध्ये गाजला होता. रेखा यांनी विवेक, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत या अभिनेत्यांसह नायिकेच्या भूमिका निभावल्या आहेत. ‘हर हर महादेव’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. एकीकडे चित्रपटक्षेत्र गाजवत असतानाच रेखा कामत यांनी नाटकांमधूनही आपल्या अभिनयाची प्रासादिकता रसिकांपुढे पेश केली आहे. ‘बेबंदशाही’, ‘आग्य्राहून सुटका’, ‘देवमाणूस’, ‘एखाद्याचं नशीब’,‘विषवृक्षाची छाया’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘मला काही सांगायचंय’ अशा २० हून अधिक नाटकांतून भूमिका निभावल्या आहेत.

सहज अभिनय आणि रंगमंचावरील त्यांचा वावर वैशिष्ट्यपूर्ण असे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा पुरेपुर वापर करून न्याय दिला. ‘संगीत सौभद्र’, ‘पुण्यप्रभाव’सारख्या संगीत नाटकात त्या गायल्यादेखील आहेत. त्यांची सराहना (कौतुक) हिराबाई बडोदेकर, मा. दत्ताराम आदींनी केली आहे. मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या नाट्यसंस्थेतून त्यांनी बहुतांश नाटके केली आहेत. संगीत नाटकातील त्यांच्या रुक्मिणी, किंकिणी या भूमिका विशेष गाजल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, यशवंत दत्त, मा.दत्ताराम, प्रसाद सावकार, रामदास कामत, रघुवीर नेवरेकर आदी अभिनेत्यांबरोबर त्यांनी भूमिका रंगवल्या आहेत. १९४४ साली त्यांनी नाटकातील भूमिका करणे थांबवले, परंतु त्यांना दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासाठी मागणी येतच होती. १९७८ मध्ये त्यांनी ‘प्रपंच’ ही पहिली दूरदर्शन मालिका केली. त्यानंतर ‘सांजसावल्या’, ‘साता जन्माच्या गाठी’ अशा लोकप्रिय मालिकांबरोबर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका वयाच्या ८० व्या वर्षी केली आणि त्या महाराष्ट्राच्या घराघरात आज्जी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जाहिरातीमधील आजी व वयस्कर स्त्री रेखा यांनी चपखलपणे वठवली आहे. त्यामुळे त्यांनी जाहिरात क्षेत्रदेखील तितक्याच ताकदीने गाजवले आहे.

सतीश राजवाडे यांच्याबरोबर त्यांनी केलेले जाहिरातपट लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात आहेत. त्यांची जाहिरातीतील मदर तेरेसा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ या वृत्तीनुसार त्या आजही आपल्या आयुष्यातील गतकाळाला स्वत:पासून अलिप्त न ठेवता त्यांना समरसून आठवून आनंद मिळवत असतात. रेखा कामत यांना आजवर चित्रपट, नाटक, मालिकांसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यामध्ये पी. सावळाराम पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, दूरदर्शनवरील ‘क्षण’ या टेलिफिल्मसाठी त्यांना विशेष पुरस्कार मिळाला होता.

रेखा कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संदीप राऊत.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..