ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा जन्म ५ एप्रिल १९६३ रोजी बेळगांव येथे झाला.
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘सख्या रे घायाळ मी हरणी’ हे या चित्रपटातले गीत त्यांच्यावरच चित्रित झाले होते. उषा नाईक यांनी लहान वयापासून शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर नृत्यांगना म्हणूनही त्यांची ओळख तयार झाली. ‘जोतिबाचा नवस’ व ‘करावं तसं भरावं’ या चित्रपटातून त्यांनी छोट्या भूमिका केल्या. अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगाची पाच पाखरं’ या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून प्रथम काम केले. त्यानंतर ‘सुशीला’, ‘बन्याबापू’, ‘अनोळखी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘हळदीकुंकू’, ‘देवाशपथ खरं सांगेन’, त्याचबरोबर ‘आई’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘संसार पाखरांचा’, ‘पायगुण’, ‘जगावेगळी प्रेमकहाणी’ अशा जवळपास १२५ मराठी चित्रपटांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या.
नृत्यप्रधान चित्रपटाबरोबरच गंभीर आणि विनोदी भूमिकाही त्यांनी समरसून साकारल्या. ‘हळदीकुंकू’ या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘देवाशपथ खरं सांगेन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उषा नाईक यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. २०१९ मध्ये उषा नाईक यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये उषा नाईक यांना ‘लपाछपी’तल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला होता.
हिंदी, भोजपुरी, ओरिया, कन्नड अशा विविध भाषिक चित्रपटांतही त्यांनी काम केले. शिवाय काही चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘काल रात्री बारा वाजता’ या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. दूरदर्शनवरील स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘स्वप्नांच्या पलीकडले’ अशा मालिकांतून आजही उषा नाईक यांचा अभिनयप्रवास सुरूच आहे.
महेश टिळेकर.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply