ज्येष्ठ निवेदक बाळ कुडतरकर यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२१ रोजी झाला.
आकाशवाणी वरील दमदार आवाज अशी बाळ कुडतरकर यांची ओळख होती. १९५०, ६० व ७०ची दशके त्यांचा आवाज आकाशवाणीचा अविभाज्य घटक होता. मुंबई आकाशवाणीवरील ‘प्रपंच’ व ‘पुन्हा प्रपंच’मधील त्यांचे टेकाडे भावोजी घराघरातले लाडके भावोजी बनले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खारेपाटणजवळील सोनाळे हे कुडतरकर यांचे मूळ गाव. कोकणात त्या वेळी शिक्षणाची चांगली सोय नसल्याने कुडतरकर यांची आई कृष्णाबाई त्यांना व आपल्या इतर दोन भावांना अशा तीन मुलांना घेऊन मुंबईत आली. कुडतरकर यांचे वडील मुंबईतच नोकरी करत होते. नाना शंकरशेट चौकातील इराणी इमारतीत कुडतरकर कुटुंबीय राहायला लागले. गिरगावातील राममोहन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९३९ मध्ये तेव्हाच्या ‘बॉम्बे युनिव्हर्सटिी’ची मॅट्रिकची परीक्षा दिली. शाळेत असताना कुडतरकर यांची चित्रकला चांगली होती. शाळेतील शिक्षकांनी मॅट्रिकनंतर ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी ‘जेजे’त प्रवेश घेतला.
एक दिवस ते ‘ऑल इंडिया रेडिओ’वर त्यांच्या ओळखीचे मोहन नगरकर यांना भेटायला मरिन लाइन्स येथे ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कार्यालय व स्टुडिओत गेले. ते सर्व पाहून कुडतरकर थक्क झाले. योगायोगाने तेव्हा कुडतरकर यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. रेडिओचे तेव्हाचे संचालक झेड. ए. बुखारी यांनी कुडतरकर यांचे काम पाहून ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये नोकरी करणार का? अशी विचारणा केली. महिन्याला ४५ रुपये वेतन ठरले आणि कुडतरकर ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सेवेत ७ जून १९३९ मध्ये दाखल झाले.
पार्श्वनाथ आळतेकर हे आवाजाच्या क्षेत्रातील कुडतरकर यांचे गुरू व मार्गदर्शक. त्यांच्या तसेच नानासाहेब फाटक यांच्याही नावाने अनेक वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘अभिनय’ या नावाची नाटय़संस्थाही त्यांनी काही काळ चालविली. ‘संगीत अमृतमोहिनी’ हे नाटय़संस्थेतर्फे सादर झालेले शेवटचे नाटक. शब्दोच्चार आणि शुद्ध व प्रमाणित भाषा कशी बोलायची याबाबतीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्यावर मोठे ऋण असल्याचे ते सांगतात.
‘ऑल इंडिया रेडिओ’चे तेव्हाचे संचालक झेड. ए. बुखारी यांचे रेडिओला लोकप्रिय करण्यात आणि सर्वसामान्य जनमानसात त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. बुखारी यांच्यामुळेच त्यांना रेडिओत नोकरी सांभाळून माहितीपट आणि जाहिरातींना आवाज देण्याचे काम करू शकले.
रेडिओच्या सेवेत असताना जी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली ती ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. नोकरीच्या काळात त्यांना मोठय़ा पगाराच्या काही संधी चालून आल्या.
पूर्वीच्या काळी विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे डबिंग असो. या सर्व ठिकाणी बाळ कुडतरकर यांनी आपल्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर जगावर राज्य निर्माण केले.
आकाशवाणीवर ‘आर्टिस्ट’ म्हणून लागलेले बाळ कुडतरकर ‘कार्यक्रम निर्माता’ म्हणून निवृत्त झाले. बाळ कुडतरकर म्हणजे आकाशवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय करणारा हुकमी एक्का असे समीकरण त्या काळात तयार झाले होते. ‘गंमत जंमत’, ‘कामगार सभा’, ‘वनिता मंडळ’ हे कार्यक्रम लोकप्रिय करण्यात बाळ कुडतरकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘पुन्हा प्रपंच’ या कार्यक्रमाने तर इतिहास घडविला. ते स्वत:, नीलम प्रभू व प्रभाकर जोशी यांचा या कार्यक्रमात सहभाग असे. हे तिघेही त्या काळातील ‘रेडिओ स्टार’ होते.
‘वनिता मंडळ’, ‘कामगार सभा’, ‘गंमत जंमत’ या लोकप्रिय कार्यक्रमांची जबाबदारीही कुडतरकर यांनी अनेक वर्षे सांभाळली. ‘वनिता मंडळ’चे नाव सुरुवातीला ‘महिला मंडळ’ असे द्यायचे ठरले. तेव्हा या नावाला बाळ कुडतरकर यांनी विरोध केला. आकाशवाणी हे शब्द आणि उच्चाराचे माध्यम आहे. केवळ शब्द आणि आवाजाच्या सामर्थ्यांवर श्रोत्यांपर्यंत कार्यक्रम पोहोचविण्याचे आव्हान असते. अशा वेळी काही शब्दोच्चार चुकीचे उच्चारले गेले तर ते योग्य नाही, असे त्यांचे मत होते. ‘महिला’ हा शब्द स्पष्ट आणि योग्य प्रकारे उच्चारला गेला नाही तर तो ‘मैला’ असा चुकीच्या पद्धतीने श्रोत्यांपर्यंत जाऊ शकतो असा युक्तिवाद केला होता. त्यामुळे कार्यक्रमाचे नाव ‘वनिता मंडळ’ असे दिले गेले. मुंबईत ‘वनिता आश्रम’ या नावाची एक संस्था काम करत होती. त्यावरून त्यांना हे नाव देण्याची कल्पना सुचली.
‘कामगार सभा’ या कार्यक्रमासाठी मुंबईतील २८ कामगार कल्याण केंद्रांत त्यांनी गाठीभेटी घेतल्या. कामगार आणि संबंधितांशी बोलून कामगारांशी निगडित असे अनेक विषय त्यांनी या कार्यक्रमात हाताळले. प्रत्यक्ष कामगारांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. तेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची संख्या खूप मोठी होती. कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यात मांडले गेल्याने कामगारांमध्ये हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. लहान मुलांसाठी असलेल्या ‘गंमत जंमत’ या कार्यक्रमाचे प्रसारण त्यांनी राणीची बाग, गिरगाव चौपाटी येथून करून त्यांनी एक नवीन प्रयोग केला.
जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्या काळात ‘युद्धवार्ता’ कार्यक्रम करायची कल्पना ब्रिटिश सरकारने मांडली. मुंबईतील माहिती केंद्राचे संचालक म्हणून क्लॉड स्कॉट्स हे तेव्हा काम पाहात होते. क्लॉड यांनी त्यांना इंग्रजी संहिता दिली आणि मराठी भाषांतर करून आण म्हणून सांगितले. बाळ कुडतरकर यांनी ते आव्हानही स्वीकारले. दहा मिनिटांच्या या माहितीपटाचे भाषांतर आणि आवाज देण्याचे मानधन म्हणून कुडतरकर यांना त्या काळात ३०० रुपये मिळाले होते. पुढे अनेक ‘युद्धवार्ता’सह फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितपटांना मराठीत कुडतरकर यांचाच ‘आवाज’ असे.
बाळ कुडतरकर यांचे ७ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले.
— शेखर जोशी.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply