नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचा जन्म २ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे झाला.

चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, व्यवस्थापक, फिल्म इन्स्टिट्यूटचे प्राचार्य व शालेय शिक्षक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे गजानन जनार्दन जागीरदार!

वडील जनार्दन जागीरदार शिक्षक असल्याने गजानन यांनाही शिक्षणाची मुळातच आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती, कानपूर व नंतर बनारस येथे पुढील शालेय शिक्षण झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिकत असतानाच जागीरदार लेखन, नाटकात काम करीत असत. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी १९३० मध्ये कोल्हापूर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. नोकरीत असतानाच नटवर्य बाबूराव पेंढारकर यांनी त्यांच्याकडे प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटांची उपशीर्षके लिहिण्याचे काम सोपवले व तेव्हापासून जागीरदार यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर १९३० मध्येच बाबूराव पेंढारकर यांच्या कंपनीमध्ये भालजी पेंढारकर ‘राणी रूपमती’ या मूकपटाचे दिग्दर्शन करत होते. त्या वेळी जागीरदार यांना पेंढारकरांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नेमण्यात आले. पुढे इंग्रजीमधून पत्रव्यवहार करणे, वृत्तपत्रांना पाठवण्यासाठी वार्तापत्र करणे व शांतारामबापूंना दिग्दर्शनात साहाय्य करणे या कामासाठी प्रभात फिल्म कंपनीमध्ये चाळीस रुपये पगारावर त्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. याच काळात त्यांनी ‘प्रभात’च्या ‘अग्निकंकण’ (मराठी) व ‘जलती निशानी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका केल्या. १९३३-३४ च्या दरम्यान कोल्हापूर येथे ‘श्याम सिनेटोन’ नावाची चित्रसंस्था स्थापन झाली. त्यांच्यातर्फे ‘पार्थकुमार’ या हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत तयार होणार्यार चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर करत होते. परंतु काही कारणांमुळे भालजींनी हा चित्रपट सोडला. त्यामुळे ‘श्याम सिनेटोन’च्या निर्मात्यांनी गजानन जागीरदार यांच्याकडे दिग्दर्शन सोपवल्यामुळे त्यांचे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल पडले. त्यानंतर त्यांनी ‘सिंहासन’ (१९३४) व ‘होनहार’ (१९३६) हे चित्रपट दिग्दर्शित केले व त्यात भूमिकाही केल्या.

अभिनय व दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर जागीरदार यांचे नाव सर्वतोमुखी झाले. यानंतर ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’च्या सोहराब मोदी यांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. या कंपनीत ते तीन वर्षे होते. येथे त्यांनी ‘मैं हारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून अभिनयही केला. १९४० च्या सुमारास प्रभात फिल्म कंपनीने जागीरदार यांना पुन्हा बोलावून घेतले व त्यांना ‘शेजारी’ (मराठी) व ‘पडोसी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका दिल्या. या दोन्ही चित्रपटांत जागीरदार यांनी ‘मिर्झा’ या मुस्लीम शेजार्यारची भूमिका उत्कृष्टपणे अभिनित केली. या भूमिकेची व चित्रपटाची सर्व हिंदुस्थानभर खूप चर्चा झाली. याच भूमिकेसाठी जागीरदारांना बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे १९४१ मध्ये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर अत्रे पिक्चर्ससाठी ‘पायाची दासी’ व ‘वसंतसेना’ हे दोन चित्रपट करून ते पुन्हा प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाले. येथे त्यांनी ‘रामशास्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व त्यातील भूमिका अशा दोन्ही आघाड्या सांभाळल्या. या चित्रपटासाठी जागीरदार यांना बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून गौरवले. यानंतरच्या काळात गजानन जागीरदार यांनी ‘बेहराम खान’, ‘उमाजी नाईक’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले व त्याच बरोबर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून भूमिकाही केल्या. त्यातील अनेक भूमिका गाजल्याही.

१९६० मध्ये पुणे येथे फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि या संस्थेचे पहिले प्राचार्य म्हणून गजानन जागीरदार यांची नेमणूक झाली. काही वर्षे प्राचार्यपद सांभाळल्यावर पुन्हा चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी ही संस्था सोडली. पण ते मानद प्राध्यापक म्हणून तेथे अधूनमधून काम करत असत. यानंतर त्यांनी ‘जागीरदार प्रॉडक्शन’ या नावाने स्वत:ची संस्था सुरू केली. ‘उमाजी नाईक’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय ही तिन्ही सूत्रे त्यांनी सांभाळली. वास्तविक १९३८ मध्ये याच नावाचा मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर ‘वैजयंता’ हा मराठी चित्रपट त्यांनी सादर केला. यातही भूमिका, निर्मिती व दिग्दर्शन या तिन्ही आघाड्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले. त्यानंतर त्यांना ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिके मिळाले. त्यानंतर ‘छोटा जवान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्ङ्गे ‘विशेष अभिनेता’ म्हणून गौरवण्यात आले. नंतर ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा बहुमान पुन्हा मिळाला.

“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते.

१९८१ मध्ये भारतीय बोलपटांच्या सुवर्णजयंती महोत्सवात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गजानन जागीरदार यांना सुवर्णपदक देऊन गौरवले.

गजानन जागीरदार यांनी ‘संध्याकाळ’ व ‘पाऊलखुणा’ ही दोन आत्मचरित्रे व ‘अभिनय कसा करावा’ व ‘दि मॅजिक सर्कल’ अशी एकूण चार पुस्तके लिहिली आहेत. गजानन जागीरदार यांचे १३ ऑगस्ट १९८८ रोजी निधन झाले.

गजानन जहागीरदार यांचे मराठी चित्रपट. रामशास्त्री,सिंहासन, पायाची दासी,वसंतसेना, वैजयंता, उमाजी नाईक,सुखाची सावली, दोन्ही घरचा पाहुणा.

गजानन जहागीरदार यांचे हिंदी चित्रपट. होनहार,बेगुनाह,जेल यात्रा, चरणों की दासी, किरण, बेहराम खान, महात्मा कबीर, ट्रॉली ड्रायव्हर, बंदर मेरा साथी,टॅक्सी स्टॅंड,विरहा की रात,धन्यवाद.

— शशिकांत किणीकर

— संजीव_वेलणकर.

९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक गजानन जागीरदार

  1. गजानन जहागीरदार यांचा परिचय करून दिल्याबद्दल लेखकद्वयीस धन्यवाद. जहागीरदार यांचे कर्तृत्व अधिक चांगल्या प्रकारे कळले. एखादे छायाचित्र दिले असते तर आवडले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..