४४ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ चरित्र अभिनेते जगदीश राज यांचा जन्म १७ मार्च १९२८ रोजी पाकिस्तानातील सरगोधा येथे झाला.
जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव. जगदीश राज यांचे नाव त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत सिनेसृष्टीतील पडद्यावर इतके गाजले होते की, चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिताना केवळ जगदीश राजच पोलिसाची भूमिका साकारणार असे लिहिले जायचे. देव आनंद यांचा ‘सीआयडी’ असो की ‘जॉनी मेरा नाम’, अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ असो की ‘दीवार’ जगदीश राज सगळीकडे पोलिसांच्या गणवेशात दिसले.जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले.
तब्बल १४४ चित्रपटांमधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची ‘गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद घेण्यात आली होती. बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली ‘पोलीस अधिकारी’ ही भूमिका गाजली. असे म्हणले जाते पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या जगदीश राज यांनी स्वतः पोलिसांचा गणवेश शिवून घेतला होता. जेव्हा त्यांना चित्रपटाच्या शुटींगला बोलावले जायचे तेव्हा तिथे थेट गणवेश घालूनच पोहोचत असत
.‘मजदूर’, ‘इनाम धरम’, ‘गोपीचंद जासूस’, सिलसिला’, ‘बेशरम’, तुम्हारी कसम’, सुहाग’, ‘ड्रीम गर्ल’, ‘गुलामी’, ‘असली नकली’, ‘विरोधी’, ‘चार दिन की चांदनी’ आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
जगदीश राज यांनी १९९२ मध्ये चित्रपटातून निवृत्ती घेतली.अभिनेत्री अनीता राज ही जगदीश राज यांची मुलगी आहे. अनीता राजने मोहब्बत की कसम, जरा सी जिंदगी, सत्यमेव जयते, घर घर की कहानी, शिव शक्ति व ज़ुर्रत अशा चित्रपटात अभिनय केला आहे. तिने १९९२ मध्ये फिल्म निर्देशक सुनील हिंगोरानीशी लग्न केले. रूपा मल्होत्रा हे त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव आहे.
जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.
Leave a Reply