महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४६ रोजी इंदूर येथे झाला.
राजकारणात असूनही स्वच्छ प्रतिमा असलेले ‘बाबा’ उर्फ पृथ्वीराज चव्हाण यांचे आईवडीलही राजकारणात होते. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. आनंदराव चव्हाण १९५७ पासून १९७३ पर्यंत कराडचे खासदार होते. जवाहरलाल नेहरु, लाल बहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. १९७३ मध्ये त्यांच्या निधनानंतर कराडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या आईला प्रेमलाताई चव्हाण यांना उमेदवारी दिली. विजयानंतर प्रेमलाताई चव्हाण संसदेत पोहोचल्या. यानंतर १९७७, १९८४ आणि १९८९ निवडणुकीत त्यांनी खासदारकी भूषवली. १९९१ मध्ये त्यांचं निधन झालं. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यांचे वडील दिल्लीत आल्यानंतर चव्हाण यांनी नूतन मराठी शाळेत प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी राजस्थान बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळाली. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.
विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन , इटली, नेदरलँण्ड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे दौरे केले आहेत.
१० नोव्हेंबर २०१० रोजी काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती. तेव्हा ते महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री झाले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply