नवीन लेखन...

ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर

ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर यांचा जन्म १० फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.

शंकर घाणेकर यांचे जन्मगाव कोकणातील सडये-पिंरदवणे. शंकर घाणेकरांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. शाळेतही मन रमेना, तेव्हा वडिलांशी भांडण्याचं निमित्त होऊन शंकरनं शाळेसहित घर सोडलं आणि गुहागर तालुक्यातील पालशेत या गावी एका नातेवाईकाकडे राहू लागले. सुरूवातीला पोटा-पाण्याची सोय होण्याकरिता त्यांनी हॉटेलात काम केलं. मोकळ्या वेळात वाचनाकडे लक्ष दिलं, आणि वाचनासहित संस्कृत सोप्पं करून घेतलं. जीवन जगण्याचा त्यांचा मार्गच इतरांपेक्षा वेगळा असल्याने १९४२ साली त्यांनी प्रतिभा संगीत नाटक कंपनीत प्रवेश केला. या कंपनीत घाणेकरांच्या नशिबी फक्त ‘प्रॉम्टिंग’ करण्याचं काम आलं. प्रॉम्टिंग करता करता ते ‘मेकअप्’ करू लागले. तेही त्यांनी तन्मयतेने केले. नाटकासाठी चालू असलेले त्यांचे प्रयत्न अखेर फळाला आले, आणि त्यांना ‘संत तुकाराम’ या नाटकात ‘शिवरायाची दासी’ ही स्त्री भूमिका मिळाली. या भूमिकेनंतर त्यांचा नाटकात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. त्यानंतर मात्र त्यांना ‘हॅम्लेट’ मध्ये ‘जुंग’, ‘राणा भीमदेव’ मध्ये ‘गुलाब’अशा भूमिका मिळाल्या.

उपजतच नाटकाची आवड असल्याने घाणेकरांना अमुक काम अमुक पध्दतीने कर, असे सांगण्याची वेळ आली नाही. यामुळेच ‘माईसाहेब’ नाटकात त्यांना ‘उत्तम’ची भूमिका मिळाली. तीही त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. यानंतर त्यांचे ‘राक्षसी माया’तील काम लोकांना फारच भावले. मग मिळेल त्या संधीचे सोने त्यांनी केले. मात्र लवकरच ते प्रतिभा नाटक कंपनीतील वैमनस्यामुळे ‘महेश नाटक कंपनी’त दाखल झाले. प्रतिभात ते बिनपगारी होते, तर महेश नाटक कंपनीत त्यांना दरमहा ४५रूपये पगार मिळू लागला. मात्र ही कंपनी लवकरच बंद पडली, आणि घाणेकरांना नाटकाच्या दृष्टीने बर्यापच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र घाणेकर डगमगणारे कलाकार नव्हते.

घाणेकरांच्या मेकअप् कलेचा खरा विकास प्रतिभामध्येच झाला. यामुळे नटवर्य शंकर घाणेकरांचे भाग्यच उजळले. मेकअप् करण्याच्या कलेमुळे आचार्य अत्रेंच्या ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रम्हघोटाळा’ यामध्ये त्यांच्यावर मेकअप् करण्याची जबाबदारी आली. कोणत्याही कामाकडे त्यांनी कमी दर्जाचे काम म्हणून कधीच पाहिले नाही. याच बाण्याने ते आपली भूमिका रंगवू लागले.

घाणेकरांच्या स्वभावात फिरकी घेणारा कोकणी स्वभाव मुळातच होता. नाटकात या स्वभावाचा विकास झाला, आणि ते रंगभूमीवर हास्याची खदखद निर्माण करू लागले. येथूनच विनोदी नट म्हणून त्यांची ओळख आपोआपच सर्वत्र निर्माण होऊ लागली. साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’ त घाणेकरांनी केलेली ‘भिकंभटा’ची भूमिका सर्वांच्या नजरेत भरणारी ठरली. तेव्हापासून त्यांचे रंगभूमीवरील स्थान निर्धोक झाले. याशिवाय खळाखळा हसविणाऱ्या भुमिकांपासून डोळ्यात अश्रु उभे करणाऱ्या भूमिकेपर्यंत अनेक भूमिका त्यांनी केल्या. ‘बिबी करी सलाम’, ‘सासरेबुवा जरा जपून’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ ‘सौभद्र’मधील ‘भादव्या’, ‘कट्यार काळजात घुसली’ ‘मदनाची मंजिरी’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका घाणेकराचं नाव मोठं करून गेल्या.

कोकणातल्या खेडेगावातून आलेल्या शंकरनं रंगभूमीवर अढळपद प्राप्त केलं. ते आपल्या कलागुणांच्या जोरावर. चोख पाठांतर, हजरजबाबीपणा, नित्य सावधान, प्रसंगावधान वृत्ती आणि नाटकातील प्रसंग जिवंत करण्याची जिद्द घाणेकरांजवळ होती. यामुळेच ते ‘नटवर्य’ होऊ शकले. ज्या तन्मयतेनं त्यांनी रंगभुमीवर प्रेम केलं, त्याच आस्थेनं त्यांनी आपल्या जन्मभूमीशी निष्ठा राखली. घाणेकर केवळ नटच नव्हते, विनोदाच्या सामर्थ्यांवर त्यांनी ‘वक्ता’ म्हणून व्यासपीठावरही हशा पिकवला. यामुळेच प्रख्यात विनोदी लेखक वसंत सबनीस थट्टेने घाणेकरांना म्हणायचे, ‘‘बाबा रे, तू फक्त चांगले विनोदी बोलतोस, म्हणजे आमचे नशीब थोर! तुला लिहायला जमते तर आमच्यासारख्या लेखकांच्या पोटावर करकचून पाय दिला असतास..!!’’ इतका प्रभाव घाणेकरांच्या विनोदाच्या टायमिंगचा लोकांवर होता.

शारदा, सौभद्र, मृच्छकटिक, एकच प्याला, प्रेमसंन्यास, बेबंदशाही, गारंबीचा बापू, लग्नाची बेडी, वेड्यांचा बाजार, रुक्मिणीहरण अशा अनेक एकूण १०० नाटकात घाणेकरांनी भूमिका केल्या आहेत. आचार्य अत्रेंचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘श्यामची आई’ या चित्रपटात मध्येही शंकर घाणेकरांनी काम केले आहे. याशिवाय दहा मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अशा या नटवर्यला जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी ‘विनोदवीर’ म्हणून गौरविले होते.

दादु इंदूरीकरांपासून ते आज मोहन जोशींपर्यंत ‘गाढवाचं लग्न’ हे लोकनाट्य तुफान चाललं. त्याचे खरे निर्माते आहेत ते शंकर घाणेकरचं. त्याचं असं झालं, जेव्हा हे लोकनाट्य सुरू झालं, तेव्हा ते ‘वगनाट्य’या प्रकारातील होतं. व त्याला हवी तशी लोकप्रियताही मिळत नव्हती. घाणेकरांच्या जन्म ज्या सडये-पिरंदवणेत झाला, त्या गावाला नमन-खेळ्यांची मोठी परंपरा आहे. नमन खेळ्यातील ‘बतावणी’ घाणेकरांना चांगलीच मुखोद्गत होती. हीच ‘बतावणी’त्यांनी त्या वगनाट्यात टाकली, व त्याचे लोकनाट्यात रुपातंर केले. नाटकाचे नाव बदलूनही ‘गाढवाचं लग्न’ असे केले. त्यानंतर त्याचे तुफान प्रयोग होऊ लागले ते काल परवापर्यंत होतच होते.

प्रसिध्द नट झाल्यानंतरही शंकर घाणेकर आपल्या जन्मभूमी असलेल्या सडये-पिरंदवणे गावाला कधीच विसरले नाहीत. दरवर्षी सण-उत्सवाला आपल्या गावी नाटके झालीच पाहिजेत, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. आपली कला गाववाल्यांना दाखविण्यासाठी ते सारी मुंबईची टिम घेऊन गावात दाखल होत. एवढं प्रेम घाणेकराचं गाववाल्यांवर होतं. याच प्रेमापोटी आपल्या गाववाल्यांना दाखविण्यासाठी ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ हे नाटक गावात आणलं होतं. ग्रामदेव श्री सोमेश्वराच्या अंगणात होणाऱ्या या मुंबईच्या नाट्याप्रयोगाला तुडुंब गर्दी झालेली. लोक दीपमाळेवर, आंब्याच्या झाडावर, बांधावर चढून नाटक पाहत होती. ‘नमन नटवरा..’ या नांदीने नाटकाला सुरूवात झाली. नाटकाचा पहिला अंक रंगू लागला. स्वत: नटवर्य घाणेकर या नाटकात ‘कोतवालाची’ भूमिका करत होते. कोतवाल भूमिकेत झोपला होता.

नाटकातील अन्य पात्रांचे संवाद संपले. कोतवालाची उठण्याची वेळ झाली, तरी घाणेकर काही उठेचनात.. अखेर पडदा पाडण्यात आला. मात्र काही उपयोग झाला नाही, कारण थेट रंगभूमीवर.. तेही आपल्या जन्मभूमीत… आणि श्री सोमेश्वर अर्थात नटराजाच्या दरबारात शंकर घाणेकरांनी अखेरची निद्रा केव्हाच घेतली होती.

२० मार्च १९७३ या दिवशी ‘रंगभूमीवरच आणि तेसुध्दा माझ्या जन्मगावी मला मरणं यावं.’ या दोन्ही इच्छा नटेश्वराने पुर्ण केल्या, खर्या अर्थाने हा नटवर्य नटेश्वरचरणी लीन झाला.

२०११ साली झालेल्या रत्नागिरी येथे झालेल्या नाट्य संमेलनातील नाट्यनगरीला कै. शंकर घाणेकर रंगमंच नाव देण्यात आले होते.

रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे हे शंकर घाणेकरांचे जन्मगाव. रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गणपतीपुळयाकडे आरे-वारे मार्गाने वळण्याआधी समोर एक रस्ता लागतो. निर्जन आणि घनदाट झाडीतला हा ‘तांबड’ रस्ता थेट शंकर घाणेकरांच्या सडये-पिरंदवणे गावात घेऊन जातो. ग्रामदैवत श्री सोमेश्वीर-सुकांईची भव्य देवराई, आणि त्या देवराईतून प्रसवलेल्या कुंवार तळ्याचे पाणी श्री सोमेश्व्राच्या चरणाशी जेथे बागडत येते, तेथे शंकर घाणेकरांचे टुमदार कौलारू घर नारळ-पोफळीच्या गर्दीत लपलेलं आहे. समस्त घाणेकर परिवाराने आजही त्या स्मृती जपून ठेवल्या आहेत.

— अमोल पालये.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..