ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापक सुरेंद्र दातार यांचा जन्म २२ जून १९५७ रोजी म्हसळा (जिल्हा रायगड) येथे झाला.
रंगमंचावर दिसणाऱ्या नाटकामागे जी भलीमोठी यंत्रणा राबत असते त्याचा सूत्रधार फार कमी वेळा समोर येतो. गेली ४५ हुन अधिक वर्ष असंख्य नाटकांच्या, संगीत कार्यक्रमांच्या मागे असणारा चेहरा म्हणजे व्यवस्थापक आणि नाट्यनिर्माता सुरेंद्र दातार. नाटकावरच्या प्रेमापोटी आयुष्यभर नाटक हा एकच ध्यास घेऊन आपली कारकीर्द जोपासणारा हा एक गुणी रंगकर्मी. नाटकाच्या वेडापायी कॉलेज शिक्षण सोडून ओळख काढत थेट गावाहून मुंबईला श्रीकांत मोघे यांचे कडे. श्रीकांत मोघे यांचे कडे उमेदवारी करत या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या मार्फतच मग पुढे गजानन जहागीरदार, जितेंद्र अभिषेकी, डॉ. काशिनाथ घाणेकर, सुधीर मोघे यांच्याशी ओळख झाली त्यातून मग पुढे या व्यवसायात कॉन्ट्रॅक्ट वर नाट्यप्रयोग करणे त्यांनी सुरू केले.पुढे वपु काळ्यांबरोबरच्या वपु कथाकथन चे कार्यक्रम तिकीट लावून सुरू केले. मंगेशकरांच्या भाव सरगम, अरुण दाते यांच्या शुक्रतारा अशा अनेक कार्यक्रमांचा निर्माता, व्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरेंद्र दातार यांनी काम केले. सुरेंद्र दातार यांनी लेकुरे उदंड झाली (४३ प्रयोग), पार्टनर, आईचे पत्र हरवले अशा नाटकांचे निर्माते म्हणून काम केले. या सगळ्या निर्मितीमध्ये प्रचंड आर्थिक नुकसान सोसूनही केवळ नाटकवरील प्रेमामुळेच आजही फक्त नाटकच डोक्यात त्यांच्या असते.
मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली नाट्यसंस्थेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केले रातराणी, पांडगो इलो रे ब इलो, आई रिटायर होतेय अशा अनेक नाट्यप्रयोगांचे त्यांनी व्यवस्थापन केले नंतर १९९२ मध्ये चंद्रलेखा या मान्यवर संस्थेत त्यांना मोहन वाघांनी बोलावून घेतले आणि २०१० पर्यंत(चंद्रलेखा संस्था बंद होई पर्यंत) ते चंद्रलेखामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या प्रदीर्घ काळात संस्थेच्या सर्व नाटकांचे नियोजन, व्यवस्थापन त्यांनी चोख सांभाळले. विश्वविक्रमी ऑल दि बेस्ट नाटकाचे ४००० हुन अधिक प्रयोग झाले त्यात त्यांचे योगदान मोठे आहे.
सुरेंद्र दातार यांनी काही काळ घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोगही त्यानी आयोजित केले. स्पष्टवक्तेपणा, सचोटी, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे या सर्व नाट्यप्रयोगांचा गाडा सुरेंद्र दातार यांनी यशस्वीपणे हाकला. अनेक प्रासंगिक अडचणींवर मात करत असंख्य नाटकांचे असंख्य दौरे महाराष्ट्रभर आणि बाहेरही केले.तैल बुद्धी, प्रचंड स्मरणशक्ती, उत्तम वाचन , सहज संवाद साधण्याची हातोटी, सुंदर हस्ताक्षर याच्या जोरावर रंगभूमीवरचे प्रथितयश कलाकार ते अगदी सर्व बॅक स्टेज कलाकार सगळ्यांशी उत्तम संबंध झाले. अनेक माणसे जोडली. अनेकांशी ऋणानुबंध जुळले. ४५ हुन अधिक वर्षाचा प्रचंड अनुभव असलेल्या सुरेंद्र दातार यांनी नाट्य व्यवासायतील अनेक चढ उतार, खाचखळगे अनुभवले आहेत . पिढ्या बदलल्या.. त्यामुळे त्यांची ओळखही आता “ए दातार” वरून “दातार काका” अशी झाली आहे. आज अंधत्व आल्यामुळे प्रत्यक्ष व्यवसायात थेट कार्यरत नसूनही त्यांच्या अनुभवाचा फायदा, मार्गदर्शन आजही अनेक नाट्यलेखक, कलावंत घेत असतात.
सुरेंद्र दातार यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संपर्क : सुरेंद्र दातार 9320913988
Leave a Reply