ज्येष्ठ नाट्यनिर्माते उत्तम भदू उर्फ मामा पेडणेकर यांचा जन्म १९२३ साली सिंधुदुर्गातील मसुरे कावावाडी येथे झाला.
नाट्यसृष्टीत बुकिंग क्लार्क, नाट्य व्यवस्थापक ते नाट्यनिर्माते अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द होती. त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती.
१९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले.
शिवाजी मंदिरात शिरताना उजव्या बाजूला तिकीट खिडक्यांच्या पलिकडे बसलेले मामा दिसले की कलाकारांनाची पावले थांबायची. मामांसोबत दोन मिनिटे बोलले तरी बरे वाटायचे. नव्या कलाकारांनाही मामा घरचे वाटायचे. नवीन नाटक किती आणि कसे चालेल, हे मामा परखडपणे सांगायचे. कारण बुकिंग खिडकीचा त्यांचा अनुभव दांडगा होता. खुर्चीवर बसलेले मामा, नाकावर किंचित घरंगळलेला चष्मा तसाच ठेवून मालवणी ढंगात तिकीट काढायला आलेल्या अनोळखी प्रेक्षकाशी संवाद साधायचे आणि तो अनोळखी प्रेक्षक तिकीट घेऊन निघताना मामांना मनापासून धन्यवाद द्यायचा. मामांनी या व्यवसायात अनके माणसे मिळवली. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. नाट्य निर्माते दिनू पेडणेकर व परमानंद पेडणेकर हे त्यांचे चिरंजीव होत, ते दोघेही नाट्य व्यवसाय सांभाळत आहे.
मामा पेडणेकर यांचे ९ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply