मामा पेंडसे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला.
मामा पेंडसे हे गाजलेले नट होते. ‘पंडितराज जगन्नाथ’,‘वहिनी’,‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मामा पेंडसे यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. मामांचा दुधाचा व्यवसाय होता. केवळ नाटकातून मिळणा-या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती.
वास्तविक नट होण्याच्या इच्छेने त्यांनी नाटक मंडळीत प्रवेश केला नव्हता. घरची गरिबी, वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने ते पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर संगीत मंडळीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासून पेंटिंगची फार आवड. नाटकांतील पडदे रंगवणा-या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा या उद्देश्यने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली.
१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली. लोकांनी मामांना नटवर्य ही उपाधी दिली. विष्णुदास भावे सुवर्णपदक, मराठी नाट्य परिषदेचे सुवर्णपदक महाराष्ट्र सरकारने रोख ९५ हजार रुपयांचा पुरस्कार आणि मानपत्र दिले. मुंबईत साहित्य संघात मामांचा भव्य नागरी सत्कार झाला होता. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. १९७२ साली ठाणे शहरात झालेल्या ५३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मामा पेंडसे यांनी भूषविले होते. मामा पेंडसे यांचे ‘केशराचे शेत’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर हे मामा पेंडसे यांचे जावई.
मामा पेंडसे यांचे १२ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.
मामा पेंडसे यांची भूमिका असलेली नाटके.
आंधळ्यांची शाळा, खडाष्टक, दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नालथ, संन्यस्त खड्ग.
Leave a Reply