ज्येष्ठ रंगकर्मी रामनाथ थरवळ यांचा जन्म २० नोव्हेंबरला कोकणातील गुहागर तालुक्यातील आबलोली गावी येथे झाला.
रामनाथ थरवळ यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण आबलोली गावातच झाले. आठवीपासून ते पुढील शिक्षणासाठी जरी मुंबईला आले असले तरी नाटकाचे बालधडे त्यांनी गावातच गिरवले होते. त्यांचे वडील गावी हौशी नाटकांतून काम करायचे. इथून त्यांना नाटकाशी परीचय झाला. या प्राथमिक परिचयातून त्यांनी शाळेत असताना शालेय उपक्रम म्हणून नाटकांत कामे केली. पण ते सारे हौसेखातर होते. पुढे जाऊन या वयातील मुलांना आपण शिकवणार आहोत, याची त्यांना तेव्हा सूतराम कल्पना नव्हती. हा, पण त्यामुळे त्यांना पाठांतराची आवड लागली. सातवीपुढील शिक्षणासाठी मुंबईला आल्यावर त्यांना नाटकाचेही धडे मिळाले. इथेही शाळेपासून गल्लीपर्यंत त्यांनी नाटकांत सहभाग घेतला. पण त्यांना खरे मार्गदर्शन लाभले ते आविष्कार, अभिजात, रुपवेध, अभिव्यक्ती, थिएटर इन नेट, पृथ्वी थिएटर, बालभवन अशा संस्थांतून विजया मेहता, सुलभा व अरविंद देशपांडे, दामू केंकरे, पंडित सत्यदेव दुबे, रेखा सबनीस अशा मान्यवरांशी संबंध आला; त्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. रामनाथ थरवळ यांची कलाजडणघडण होत गेली. त्यांना जे हवे होते ते इथे मुंबईत मिळत गेले. त्यांनी जे मिळवले तेच पुढच्या आयुष्यात त्यांनी मुलांना वाटले. अजूनही वाटत आहेत.
रामनाथ थरवळ यांनी १९७३ साली पहिले नाटय़शिबिर घेतले. रत्ना पाठक-शहा यांच्या मामांच्या बालोद्यानात ते झाले. सुलभा देशपांडे यांच्या आग्रहास्तव ते सुरू झाले होते.१९७४ साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर झाले.
हा प्रवास सुरू झाला तेव्हा रामनाथ छबिलदासपर्यंत येऊन पोहोचले. तिथे ते मोठय़ांच्या नाटकात काम करू लागले. हा प्रवास सुरू असतानाच सुलभा देशपांडे यांनी त्यांच्यावर वर्षभरासाठी बालनाटय़ कार्यशाळा सुरू करण्याची जबाबदारी टाकली. या कार्यशाळेसाठी त्यांनी मुलांची नाटके लिहिली, ती दिग्दर्शित केली. आला अडाण्याचा गाडा’ हे त्यांचे पहिले बालनाटय़. नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि रामनाथ थरवळ असे त्या पहिल्या बालनाटय़ातील मोठे कलाकार. पुढे बालनाटय़ शिबिरांसाठी रामनाथ थरवळ महाराष्ट्रभर फिरले. गोवा, फैजपूर असाही त्यांचा प्रवास झाला. पण ते खऱ्या अर्थाने रमले ते जवाहर बालभवनात.१९८१ ते १९९० हा दहा वर्षांचा कालावधी त्यांनी बालभवनात घालवला. बालकांसमवेत घालवला. तिथे मुलांना शिकवता शिकवता तेही शिकत गेले. त्यांनी तिथे दहा वर्षे आंतर शालेय नाटय़वाचन स्पर्धा’ चालवली. बालभवनात त्यांनी मुलांसाठी विविध विषयांवर नाटके लिहिली. त्यात दाढीवाला बाबा’, चोराच्या मनात चार आणे’, अक्षरांची शाळा’, श्यामची आई’, बालपणीचे बाबासाहेब आंबेडकर’, कहाणी एका गुलाबाची’, दोन मित्र’ अशी तब्बल ५० नाटके केली. यातील दोन मित्र’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग १९८४ साली साहित्य संघ मंदिरात होता. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत थरवळ यांच्या कलाघर’ या संस्थेची पायाभरणी झाली.
एकीकडे बालनाटय़प्रशिक्षणाची घोडदौड सुरू असताना थरवळ यांनी राज्य नाटय़स्पर्धांतही स्वतःच सहभाग नोंदवला. त्यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय यांची पारितोषिके मिळविली. मधल्या काळात त्यांची पं. सत्यदेव दुबे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी त्यांच्या और तोता बोला’ या हिंदी नाटकातही काम केले. हे पृथ्वी थिएटरचे नाटक होते. याच पृथ्वी थिएटरमध्ये १९९० पासून अभिनय कार्यशाळा सुरू झाल्या. त्या १८ वर्षे म्हणजे १९९० पर्यंत अव्याहत सुरू होत्या. या पृथ्वी थिएटरमध्ये रामनाथ थरवळ यांच्यातील कलागुणाला बहर आला. पृथ्वी थिएटर हे शिस्तीसाठी विशेष प्रसिद्ध होते, पण तिथून शिकलेले बरेच कलाकार पुढे नावारूपाला आले. अनेक मोठय़ा व्यक्तींशी थरवळ यांची तिथेच पहिली भेट झाली होती. एम.एफ.हुसेन, शबाना आझमी, प्रकाश झा, दिप्ती नवल ही त्यातली काही नावे.
पृथ्वी थिएटरमधील १७ वर्षांच्या कालावधीनंतर १९९३ साली रामनाथ थरवळ यांनी ठाण्यात स्वतःची कार्यशाळा सुरू केली. ती कार्यशाळा आजही सुरू आहे. तिथे ते अजूनही छोटीमोठी नाटके सादर करतात. त्यांच्या या कार्यशाळेतून शिकून गेलेल्या कलाकारांची यादी तशी मोठी आहे. विद्या बालन, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, सुमित राघवन, पंकज विष्णू, रसिक ओक जोशी, विशाखा सुभेदार, अतुल काळे, तारका पेडणेकर, दिपक वीज, बॉबी वीज ही त्यातली काही नावे. या शिबिरार्थीं पैकी अनेकजण डॉक्टर, वकील, इंजिनिअर या पेशांतही स्थीरावले आहेत.
रामनाथ थरवळ यांचे १९९५ साली अमेरिकेतील शिकागो येथेही नाटय़शिबिर झाले होते. त्यालाही उदंड प्रतिसाद लाभला होता. रामनाथ थरवळ यांनी बालकांसाठी केवळ कार्यशाळा घेतल्या, त्यांच्यासाठी नाटके लिहिली, ती बसवली एवढेच केले नाही. चांगले काम करण्यासाठी चांगले वाचन हवे, या मताचे थरवळ आहेत. म्हणून त्यांनी मुलांसाठी ढिशाँव ढिशाँव’ हे अर्धवार्षिक चालवले. प्रत्येक अंका एक नवा विषय असायचा. जवळपास १० वर्षे त्यांनी हे अर्धवार्षिक चालवले. अनेक पुरस्कार या नियमकालिकाने मिळवले. पण कोणताही उपक्रम करायचा तर त्यासाठी पैसा हवाच. त्याच्या अभावी हा अंक थांबवावा लागला.
रामनाथ थरवळ यांनी नागपाडा नेबरहूड हाऊससाठीही काम केले. कामाठीपुऱ्यातील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसाठी ही संस्था काम करायची. दिपा लागू यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे काम स्विकारले आणि तीन वर्षे त्या मुलांसाठी कामही केले. यातूनही त्यांना बरेच काही शिकता आले.
— शरद विचारे.
संकलन:
Leave a Reply