ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचा जन्म १४ मार्च १९४२ रोजी कोल्हापूर येथे झाला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांनी देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.
नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल ॲसेसमेंट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कन्सिलचे ते संस्थापक -संचालक होते. पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व मटेरियल सायन्सचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. तसेच पुण्यात सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज फिजिक्सची स्थापना केले. यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन ऑंटॅरिओ आदी ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम पाहिले.
निगवेकर यांना विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. विद्यापीठ कायद्यातील बदलासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. एक उत्तम शिक्षक प्रशासक आणि शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. सात वर्षापूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता.सुमारे वर्षभरापासून ते घरीच होते.
डॉ.अरुण निगवेकर यांचे २३ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply