ज्येष्ठ उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म ६ एप्रिल १९२७ रोजी वाई येथे झाला.
वाई गावातील द्रविड हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले. १९४९ साली ते पुणे इंजिनिअरिंग कॉलेज मधून सिव्हिल इजिनिअरिंगची परीक्षा पास झाले. त्यांनी सुरुवातीला मध्य प्रांतात व नंतर मुंबई इलाख्यात नोकरी केली, पण त्यांचे चित्त नोकरीत लागले नाही. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९५२ साली किरकोळ भांडवलावर स्वत:ची स्थापत्य कंपनी उभारली. दादासाहेब जोग यांची कंपनी ही मुळात इंजिनिअरिंग व्यवसायातली. रस्ते बांधणी, उड्डाण पूल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे यामध्ये त्यांनी मोठे नाव कमावले आहे. आजही त्यांची कंपनी देशात आणि परदेशात जलविद्युत प्रकल्पांसाठी लागणारी बांधकामे करीत आहेत. दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रोप-वे बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी रोप-वे हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे. रोप-वे बरोबरच तिथे आता निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. हा रोप-वे उभारणारी आणि चालविणारी मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा.लि. ही संस्था रूढ अर्थाने पर्यटन संस्था नाही. रोप-वेचा कारभार सांभाळतात राजेंद्र जोग व त्यांच्या पत्नी वैशाली जोग.
२८ जून २००० रोजी दादासाहेब जोग यांचे निधन झाले.
Leave a Reply