ज्येष्ठ गझल गायिका मलिका पुखराज यांचा जन्म १९१२ साली झाला.
भारताची फाळणी झाल्यावर ज्या पाकिस्तानात राहिलेल्या कलावंतांच्या नावाने त्या काळी भारतातील श्रोत्यांच्या हृदयांची स्पंदने वेग घेत असत त्यात चार महिला होत्या. चित्रपट संगीतातील नूरजहान, रागदारी संगीतातील रोशनआरा बेगम, लोकसंगीतातील रेश्मा आणि गझलमधील मलिका पुखराज. ‘अभी तो मैं जवान हूँ’ या एका गझलने प्रसिद्धी मिळालेल्या गायिका मलिका पुखराज यांचा जन्म जम्मू येथे झाला, तेथेच त्यांनी उस्ताद अल्लाह बख्श यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. मलिका पुखराज यांनी जम्मू-काश्मीरचे महाराज हरि सिंह यांच्या दरबारात वयाच्या ८ व्या वर्षी गायन सादर केले होते. संगीताचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या जम्मू-काश्मीरचे महाराज हरि सिंह यांच्या दरबारात रुजू झाल्या. काही काळा नंतर त्या दिल्लीला आल्या व रेडियोवर गाऊ लागल्या.
मलिका पुखराज यांचे डोगरी व पहाडी संगीतामध्ये विशेष प्राविण्य होते. मलिका पुखराज या आपला जीव गाण्यात ओतून गाणारी मनस्वी गायिका म्हणून मलिका अवघ्या उपखंडात लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांच्या मखमली ओठातून अलगतपणे बाहेर पडणाऱ्या मधाळ सुरांवर आणि प्रसिद्ध गझलेच्या शब्दांवर हजारो रसिक कुर्बान होत.
मराठी भावगीत गायनाचे जनक जी. एन. जोशी यांनी तिच्या आवाजाचे ‘सिल्वरी’(रुपेरी) असे वर्णन केले होते. मलिका पुखराज यांची ‘जाहिद न कह बुरी के ये मस्ताने आदमी है, तुमने हमारा दिल में घर कर लिया तो क्या है, आबाद करके आखिर वीराने आदमी है’, जुबाँ न हो जाए, राज-ए-उल्फत अयाँ न हो जाए’ गाणी गाजली. ‘अभी तो मै जवान हूँ’ हे गीत तर अजरामर झाले.
१९४७ ला फाळणीच्या वेळेस त्या पाकिस्तानला गेल्या व शेवटपर्यत त्या पाकिस्तानातच राहिल्या,त्यांनी पाकिस्तानी टीवी सीरियल निर्माते शब्बीर हुसैन शाह यांच्या बरोबर लग्न केले होते. त्यांची मुलगी ताहिरा सैयद या पण एक उत्तम गायिका आहेत. मलिका पुखराज व ताहिरा सैयद यांच्या जुगलबंदी खूप गाजल्या आहेत.
मलिका पुखराज यांचे ०४ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.
आपल्या समुहा तर्फे मलिका पुखराज यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply