नवीन लेखन...

ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे

ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म १० ऑक्टोबर १८९९ रोजी नाशिक येथे झाला.

कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणत असत. श्रीपाद अमृत डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. त्यांचे शालेय शिक्षण नासिक येथे झाले. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते. या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले; पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत. त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून १९५७ आणि १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. ‘गांधी व्हर्सस लेनिन’, ‘गुरुदेवाची हाक’ , ‘भारत’, ‘शिवाजी : त्यांचा आणि आमचा’ , ‘इतिहास कोण घडवतो?’, ‘नरकपुरी गवसली’ ही पुस्तके यांनी लिहिली होती. ‘इंदुप्रकाश’मध्ये उपसंपादक असलेल्या कॉ. डांगे यांनी पुढे ‘क्रांती’ हे साप्ताहिक सुरू केले होते. डॉ. अशोक चौसाळकरांनी त्यांचे अभ्यासू चरित्र लिहिले आहे.

श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.

श्रीपाद अमृत डांगे यांचे २२ मे १९९१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..