ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांचा जन्म ५ जून १९६७ रोजी झाला.
गेल्या दोन दशकात मराठी पत्रकारीतेला नवीन दिशा देणारा आणि सतत नाविन्याचा शोध घेणारा तरुण संपादक अशी महेश म्हात्रे यांची ओळख आहे. महेश म्हात्रे हे एक बहुआयामी संपादक असून ते प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व वेब मीडियामध्ये, तसेच हिंदी आणि इंग्रजी माध्यमातही सहज आणि उत्तमपणे काम करू शकतात हे नजिकच्या काळातील त्यांच्या कामगिरीतून सिद्ध झाले आहे.
महेश म्हात्रे यांनी आपले महविद्यालयीन शिक्षण मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या वाडा गावात पूर्ण केले. तिस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या म्हात्रे यांचे शिक्षण एम ए (इतिहास) पर्यंत झाले असून, आज ते भारतातील ज्येष्ठ पत्रकार मानले जातात. महेश म्हात्रे यांचा पत्रकारितेचा प्रवास दैनिक मुंबई सकाळ मधुन सुरु झाला. तिथे त्यांनी केेलेल्या शोधपत्रकारितेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आदिवासीबहुल जव्हार-मोखाडा परिसरातील कुपोषण, गुजरात मधील अटक वॉरंट रॅकेट आदी बातम्यांमधून त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले. त्यानंतर म्हात्रे यांना राज्यातील राजकीय घडामोडींवर लिहिण्याची संधी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून मिळाली. इंटरनेट युगाच्या आरंभाच्या त्याच काळात त्यांनी मराठीतील पहिले वेबझिन “प्रतिबिंब डाॅट काॅम” ची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली होती. संपादक म्हणून तरुण वयात मिळालेल्या अनुभवातून त्यांचे पुढील करियर आकारास येत गेले. पुढे २००१, मध्ये मुंबई तरुण भारत, २००२ मध्ये नागपूर तरुण भारतचे मुख्य संपादक आणि पुढे ‘नागपूर सकाळचे’ संपादक म्हणून काम केले. लोकमत ‘इंडियन एक्स्प्रेस’, नवशक्ति, ‘प्रहार’ आदी वृत्तपत्रातही त्यांनी संपादक काम केले आहे. दूरदर्शनमध्येही महाचर्चा , विविध फोन इन प्रोग्राम मध्ये सूत्रसंचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. मुंबई, नागपूर या दोन्ही शहरांमध्ये त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक अभिसरणाच्या कार्यात हिरिरीने भाग घेतला. राजकीय पत्रकारिता, शोध पत्रकारिता, ग्रामीण भागातील समस्या, वारकरी परंपरा आणि साहित्य क्षेत्र हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. वृत्तपत्रांबरोबरच टेलिव्हिजन आणि इंटरनेट या माध्यमांमध्येही महेश म्हात्रे यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. २०१४ पासून महेश म्हात्रे हे न्यूज १८ लोकमत चॅनलच्या संपादक म्हणून काम केलंय. या आधी ते न्यूज १८ इंडिया (हिंदी) चे राजकीय संपादक म्हणून काम करत होते. आपल्या संपादक पदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी बेल्जियम, द. कोरिया, इस्त्रायल या देशांना खास निमंत्रणावरून भेटी दिल्या आहेत. तसेच, प्रहार मध्ये संपादक असताना ‘बराक ओबामा’ अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुस-यांदा निवडून आले, त्या ऐतिहासिक निवडणुकीचे वार्ताकन खास इस्ट वेस्ट सेंटर च्या निमंत्रणावरून महेश म्हात्रे यांनी अमेरिकेत जाऊन केले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील बारकावे, अमेरिकेतील राजकीय पक्ष आणि त्यांचा इतिहास, मतदारांची पार्श्वभूमी, निवडणुकीतील मुद्दे, उद्योग जगताची स्थिती अशा अनेक विषयांचा जवळून परामर्श घेण्याची संधी म्हात्रे यांना यानिमित्ताने मिळाली होती. वर्ल्ड एडिटर्स काॅन्फरंस साठी बेल्जियम आणि फ्रान्सला ते जाऊन आले आहेत.
महेश म्हात्रे यांना सर्वोत्कृष्ट पत्रकारिते करिता अनेक पुरस्कार मिळाले आहे. तसेच शोध पत्रकारिता आणि संपादनाशी संबंधित अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळाले आहेत.
म्हात्रे यांचा मनमोगरा हा ललितलेख संग्रह प्रकाशित झाला आहे.
Leave a Reply