ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर,निवेदक, माध्यमधर्मी यांचा जन्म १० जानेवारी १९६४ रोजी पुणे येथे झाला.
पत्रकारिता, वृत्त टेलिव्हिजन , शैक्षणिक टेलिव्हिजन, मनोरंजन टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट, सहायक दिग्दर्शन, कादंबरी लेखन , निवेदन, या सर्व क्षेत्रात समीरण वाळवेकर यांचे भरीव काम आहे. समीरण वाळवेकर हे ज्येष्ठ भावगीत गायक व संगीतकार दत्ता वाळवेकर यांचे चिरंजीव होत. दत्ता वाळवेकर हे फक्त उत्तम संगीतकारच नव्हते, तर उत्तम भावगीत गायक, शिक्षक, संगीत गुरु, समीक्षक, साहित्यिक, छायाचित्रकार, चित्रकार आणि होमिओपॅथीचे अभ्यासकही होते.
समीरण वाळवेकर यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड. पुणे. व महाविद्यालयीन शिक्षण बीएमसीसी येथे झाले. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, आणि तीन भाषांतील नऊ उपग्रह वाहिन्यांच्या वृत्त, मनोरंजन आणि वाहिन्यांच्या अनेक कार्यक्रमांची निर्मिती, सादरीकरण सूत्रसंचालन समीरण वाळवेकर यांनी केले आहे. टीव्ही मीडियाचा दांडगा अनुभव असलेल्या वाळवेकर यांनी अनेक टीव्ही चॅनलवर काम केले आहे. साम टीव्ही , स्टार माझा, मी मराठी, सह्याद्री, दूरदर्शन मुंबई, झी, एन. डी. टीव्ही अशा तीन भाषांतील ९ वाहिन्यांवर दोन हजार पेक्षा जास्त भागांचे सूत्रसंचालन समीरण वाळवेकर यांनी केले आहे. देशातील पहिली उपग्रह शिक्षण वाहिनी डीडी व्यासच्या कार्यक्रम निर्मितीचे महाराष्ट्रातील संचालक ते राहिले आहेत.
“स्वयम्” राष्ट्रीय शैक्षणिक उपग्रह वाहिनी स्थापनेत समीरण वाळवेकर यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. देशातील व परदेशातील अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना, स्थित्यंतरे आणि निवडणुकांचे थेट प्रसारण,वार्तांकन समीरण वाळवेकर यांनी केले आहे. त्यांनी अनेक नेते,कलाकार यांच्याटीव्ही वाहिन्यांवर मुलाखती घेतल्या आहेत. समीरण वाळवेकर यांनी ‘आजच्या ठळक बातम्या’ (टेलिव्हिजन पत्रकारितेवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ), चॅनल ४ लाईव्ह’ (मराठी लोकप्रिय काल्पनिक कादंबरी), चरित्रात्मक ग्रंथ : ‘फिनोलेक्स पर्व’ (प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या वरील) ही तीन पुस्तके लिहिली आहेत.
समीरण वाळवेकर यांचा “समीरण स्ट्युडिओज” या नावाने स्टुडियो असून तेथे कार्यक्रम निर्मिती व माध्यम सल्लागाराचे काम केले जाते. समीरण वाळवेकर यांच्या पत्नी डॉ.वर्षा वाळवेकर या नेत्रतज्ञ आहेत.
समीरण वाळवेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply