ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म ८ जुलै १९२२ रोजी झाला.
अहिल्या रांगणेकर या माहेरच्या अहिल्या रणदिवे होत. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते. अहिल्याबाईंचा विवाह १९४५ साली साम्यवादी चळवळीतले त्यांचे सहयोगी पी.बी. रांगणेकरांशी झाला होता. अहिल्या रांगणेकर यांनी १९४२ आणि त्यानंतरच्या कम्युनिस्ट पक्षाची सर्व आंदोलने, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि महागाई प्रतिकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. १९४२ साली ‘चले जाव’ची चळवळ सुरू झाली, तेव्हा अहिल्याताई फर्गुसन महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षांत होत्या. कॉलेजमधील १५ मुलींसह त्यांनी जनजागृतीसाठी मोर्चा काढला. मोर्चा काढल्याच्या गुन्ह्यामुळे अहिल्याताईंना तीन महिन्यांची शिक्षा झाली. माफी मागून शिक्षेपासून सुटका करून घेणे, हे अहिल्याताईंच्या तत्त्वात बसणारे नव्हते. त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले व वसतीगृहातील त्यांचे सामान बाहेर फेकण्यात आले. अहिल्याताईंना तुरुंगाचे भय नव्हतेच. पुढे आयुष्यभर त्यांनी ज्या अनेक शिक्षा भोगल्या, त्याचीच जणू ही नांदीच होती! या तीन महिन्यांच्या काळात अहिल्याताईंचा दिग्गज महिला नेत्यांशी संपर्क आला. त्यांचा स्वार्थत्याग, साधेपणा या सर्व गोष्टी पाहून अहिल्याताई भारावून गेल्या. प्रेमा कंटक यांच्याकडून त्यांनी गांधीवाद समजावून घेतला, तर डॉ. कमला अष्टपुत्रे यांच्याकडून मार्क्सलवादाचे धडे घेतले. बी. टी. रणदिवे या आपल्या वडील भावाकडून साम्यवादाबद्दल त्या बरेच काही शिकत होत्याच. मुंबईच्या रुईया कॉलेजमधून त्या बी.एस्सी. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. १९४६ पासून त्या पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाकडे वळल्या. ‘चले जाव’ आंदोलनाबाबत कम्युनिस्ट पक्षाचे धोरण जनतेला पसंत नव्हते आणि ही नापसंती व्यक्त करताना लोकांनी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर हल्लेही चढवले होते. तरीही जिद्दीने पक्षाचे कार्य करणारे जे कार्यकर्ते टिकून राहिले, त्यात अहिल्याताई होत्या. १९४८ साली कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली, त्यावेळी इतर अनेक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही अटक करून स्थानबद्ध केले होते. रांगणेकर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी तुरुंगात होते. घरात तान्हा मुलगा होता. त्यांच्या बाळलीला पाहण्याचे भाग्य आई-बापांच्या नशिबी नव्हते.
१९४७-४८ मध्ये त्या मुंबई शहर पक्षाच्या कार्यकारिणीवर, १९५०-५१ साली राज्य शाखेच्या कार्यकारिणीवर व १९५७ पासून मृत्यूपर्यंत पक्षाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीवर काम करीत होत्या. जनवादी महिला संघटना ही मार्क्सषवादी विचारसरणीचे समर्थन करणारी संघटना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मार्क्समवादी कम्युनिस्ट पक्ष हाही पुरुषप्रधान विचारसरणीला जवळचा आहे, असे त्या स्पष्टपणे म्हणत. आमच्या पक्षात अद्याप महिला अध्यक्ष झाली नाही, याचा दुसरा अर्थ काय, अशीही विचारणा ते करीत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील त्यांच्या कामगिरीमुळे उभा महाराष्ट्र अहिल्याताईंना ओळखू लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महिलांच्या सभा तर त्या आयोजित करीतच, पण महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी महिलांचे संघटन केले. मुंबईच्या महिलांनी अहिल्याताई व तारा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या हुतात्मा चौकात मोठा सत्याग्रह करण्याचे जाहीर केले. पोलिसांनी हा सत्याग्रह हाणून पाडण्यासाठी जोरदार तयारी करून सत्याग्रही महिलांसमोर पोलिसांचे कडे केले. या कडय़ावर अचानक महिला सत्याग्रहींनी जी धडक मारली, त्यात पोलिसांचे कडे तुटले. कडे तोडून घोषणा देत बायका पळाल्या. पोलीस बायकांचा असहाय्यपणे पाठलाग करू लागले. भोवतालचा पुरुष जमाव अहिल्याताई, ताराताई व संयुक्त महाराष्ट्राचा जयजयकार करू लागला. आचार्य अत्रेंनी या स्फूर्तिदायी प्रसंगातील अहिल्याताईंच्या सहभागावर ‘रणरागिणी अहिल्या सत्याग्रहा निघाली। डोळ्यांत क्रांति ज्वाला। अन् वीरहास्य गाली’ ही कविता लिहिली आणि ‘नवयुग’च्या पहिल्या पानावर छापली.
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
अहिल्याताईंची लोकप्रतिनिधी म्हणून कारकीर्द मुंबई महानगरपालिकेतील कामापासून सुरू होते. १९५७ ते १९७८ पर्यंत त्या नगरसेविका होत्या. १९६८ साली शिवसेनेची लाट आली होती. त्यावेळी अनेक ज्येष्ठ वजनदार लोकांना शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभूत केले. झंझावातात जे मूठभर टिकून राहिले, त्यात अहिल्याबाई होत्या. अहिल्याताईंचा हा विजय चर्चेचा व कौतुकाचा होता. झोपडपट्टीसाठी नळपाणी योजना जाहीर करावी, नगरसेवकांच्या लाचलुचपतीला अटकाव व्हावा, यासाठी निवडणुकीपूर्वी व नंतर मालमत्तेचे खरे निवेदन लिहून घ्यावे, नगरसेवकांना नगरपालिकेच्या इस्पितळात अर्ध दराने राहण्याची सोय करावी, गलिच्छ वस्ती सुधारणा योजनेखाली घरे बांधणे, मुंबई शहरातील रिकामे भूखंड सार्वजनिक उपयोगासाठी राखले असतील तर त्याचा विकास करण्याच्या कामाचा ठेका खासगी व्यक्तीकडे देऊ नये, वगैरे समाजातील तळागाळातील लोकांच्या सोयी-सुविधाविषयक प्रश्न व ठराव त्यांनी मांडले होते. आणीबाणीनंतर अहिल्याबाई लोकसभेवर निवडून गेल्या. लोकसभेतही त्यांनी श्रमिकांच्या प्रश्नावर अधिक लक्ष दिले. ग्रामीण स्त्रियांचे खालावत चाललेले स्थान व त्याबाबत सरकारने उचललेली पावले, महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात स्त्रियांच्याबाबत भेदभावी वागणूक, शेतमजूर स्त्रियांच्या मुलांकरिता पाळणाघरांची सोय करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेली पावले याबद्दल परखड प्रश्न मांडले. त्यांनी अनेक संसदीय समित्यांवरही काम केले. अहिल्याताई कायम चितरुणच राहिल्या. आपल्या ध्येयासाठी, कम्युनिस्ट विचारसरणीसाठी त्या अविरत कार्यरत राहिल्या. कुणाचेही कितीही लहान काम असले तरी ते स्वत: करून देण्यातच त्यांना आनंद होता.
अहिल्या रांगणेकर यांचे १९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply