महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी पद्माळे, सांगली येथे झाला.
वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व विधानसभेत व लोकसभेत केले. वसंतदादा स्वत: फारसे शिकलेले नव्हते, पण १९८३ साली मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीची आमूलाग्र क्रांती घडवून आणली. महाराष्ट्रातील मुलांना अन्य कोणत्याही राज्यात जाऊन उच्च शिक्षणासाठी हात पसरावे लागू नयेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. आज कर्नाटक, तामिळनाडूपासून पंजाबपर्यंत अनेक राज्यांतील विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकताना पाहिले की वसंतदादा हे नाव अभिमानाने मिरवावे असेच प्रत्येक मराठी माणसाला वाटते.
सहकार क्षेत्रात तर दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. भारतातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना त्यांनी सांगली जिल्ह्य़ात माधवनगर परिसरात उभारला. या कारखान्याच्या उभारणीसाठी या नेत्याने अक्षरश: मैलोन्मैल भटकंती केली.
शेताच्या वावरातील बांधावर उभे राहून उसाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. केवळ साखर कारखाने उभारून थांबू नका तर त्या जोडीने पूरक उद्योगांचीही स्थापना करा हा दादांचा आग्रह असे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आजूबाजूलाच सहकारी बँका, पतसंस्था, छोटे-मोठे दूधसंघ यांची उभारणी झाल्याचे अनेक ठिकाणी हमखास पाहायला मिळायचे. त्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हायचा. या कर्जातून मोठमोठय़ा जर्सी गायी- म्हशी शेतकऱ्यांच्या दारात झुलताना दिसू लागल्या. त्यातून झालेली दूधनिर्मिती सहकारी दूध संघाकडून खरेदी केली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा खेळू लागला आणि ग्रामीण महाराष्ट्रात स्वत:ची अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच निर्माण झाली. दादांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून प्रोत्साहन घेऊन मग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा होता असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे वसंतदादांबद्दल म्हटले जाते.
वसंतराव दादा पाटील यांचे १ मार्च १९८९ निधन झाले. वसंतराव दादा पाटील यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply