अनिल अवचट यांचा अल्पपरिचय.
वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला.
डॉ.अनिल अवचट यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले होते. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली.
महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. डॉ.अनिल अवचट यांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी होते. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटत असे. डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला होता. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२ व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला होता. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.
अनिल अवचट यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
अवचटांची ग्रंथ संपदा
अमेरिका
अक्षरांशी गप्पा
आपले‘से’
आप्त
कार्यमग्न
कार्यरत
कुतूहलापोटी
कोंडमारा
गर्द
छंदांविषयी
छेद
जगण्यातले काही
जिवाभावाचे
दिसले ते
धागे आडवे उभे
धार्मिक
People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर]] (सहलेखक- विश्राम गुप्ते)
पुण्याची अपूर्वाई
पूर्णिया
प्रश्न आणि प्रश्न
बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन
Beyond Work- Visionaries From Another India : ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर)
मजेदार ओरिगामी
मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह)
माझी चित्तरकथा
माणसं!
मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : (इंग्रजीत Learning to Live Again)
मोर
रिपोर्टिंगचे दिवस
Learning to live again, “मुक्तांगण” पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर.
लाकूड कोरताना
वनात..जनात
वाघ्या मुरळी
वेध
शिकविले ज्यांनी
संभ्रम
सरल तरल
सुनंदाला आठवताना
स्वतःविषयी
सृष्टीत…गोष्टीत
सृष्टी-दृष्टी, वनात-जनात
हमीद
हवेसे
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply