ज्येष्ठ जादूगार विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर यांचा जन्म ९ मार्च १९५० रोजी झाला.
जादूच्या प्रयोगात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर करणारे जादूगार विजय रघुवीर यांचा जन्म पुणे येथे झाला. ते ज्येष्ठ जादूगार रघुवीर यांचे जेष्ठ सुपुत्र. विजय रघुवीर यांचे शालेय शिक्षण नूमवि प्रशालेत तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे इंजिनिअरींग कॉलेज मधून झाले.त्यांनी BE इलेट्रॉनिक्स पदवी घेतली आहे. BE इलेट्रॉनिक्स पदवी मिळवूनही गेली अनेक वर्षे ते जादूचे प्रयोग करीत आहेत. आपले शिक्षण पूर्ण करतानाच आपल्या वडिलांच्या कडून जादूचे प्रशिक्षण घेतले.
आपले शिक्षण पूर्ण झालेवर काही काळ खाजगी कंपनीमधे व्यवस्थापक म्हणूनही काम केले, व सोबत आपल्या वडिलांचे बरोबर प्रयोग करीत असत. तसेच ते रघुवीरांचे अनुपस्थितीत जादूची शाळा ही सांभाळत असत. त्यांचा विवाह पुण्यातील प्रसिद्ध मांडववाले रहातेकर यांची कन्या ज्योती यांचे बरोबर झाला. त्यांचे वडील जादूगार रघुवीर यांनी वर्ष १९७७ निवृत्ती घ्यायचे ठरविले तेंव्हा आपले चिरंजीवांना विचारले कि हा व्याप सांभाळणार का ? नाहीतर मला हे सर्व विकावे लागेल. वडिलांनी दिलेल्या अल्टिमेटमवर त्यांनी विचार करून जादूचे प्रयोग करायचे ठरविले. दरम्यान जादूगार रघुवीर यांचा गोवा दौरा ठरला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सादर प्रयोग त्यांनी विजय यांना करण्यास सांगितले. संयोजकांनी रघूवीर याच नावेच प्रयोग करविला. प्रयोग यशस्वी झाला. रघुवीरांची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवली नाही. त्यामुळे जादूगार विजय यांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी त्यानंतर मात्र मागे वळून पहिले नाही. अमेरिका, सिंगापुर, मलेशिया, हाँगकाँग, युरोप, थायलंड, जपान इ. देशांतील दौरे त्यातून उभी केलेली नावीन्यता, सुमधुर संगीत, १५ सहकाऱ्यांचा ताफा, आकर्षक लाईटस व सेटस्, विविध पोशाख, यातून विजय रघुवीर यांचा प्रयोग आजही आपल्यास जादूच्या वेगळ्या दुनियेत नेतो.
त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘विजय रघुवीर’ आणि त्यांचा ‘मायाजाल.’ आता पर्यंत त्यांनी २७ देशांचे दौरे केले. तसेच सुमारे ७५०० हजार हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ नावावर प्रयोग करू नयेत, यात अपार मेहनत व उत्तम दर्जा असलाच पाहिजे, हा त्यांचा बाणा त्यांना संमेलनात, मुंबई येथे सर्वोत्कृष्ट जादूगाराचे पारितोषिक देऊन गेला. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. जादूगार रघुवीर यांच्या तालमीत तयार झालेल्या विजय रघुवीर यांना जादूतील सफाई, भावमुद्रा, अभिनय, अचूक टायमिंग आणि वक्तशीरपणा हे अगदी भिनलेले आहे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती. या मराठी जादूगाराने सर्व सोयींनी युक्त अशी बस (व्हॅनीटी व्हॅन) १९८४ मध्ये घेतली. त्यामध्ये स्वतंत्र खोली कलाकारांचे साठी झोपण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह अश्या सर्व सोयी त्या मध्ये अंतर्भूत होत्या. अनेक नाटक कंपन्या त्याची ही बस घेऊन जात असत.
आता विजय रघुवीर यांनी अंशतःनिवृत्ती घेतली असून आता त्यांचे चिरंजीव जितेंद्र रघुवीर जादुचा वारसा पुढे सक्षमपणे चालवीत आहे. विजय रघुवीर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply