ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचा जन्म ५ जुलैला झाला.
प्रामुख्याने मराठी भाषेत टीव्ही आणि चित्रपटासाठी लेखक / दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून काम करत असलेल्या प्रतिमा कुलकर्णी, भविष्यात, मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी देखील सिनेमात अर्थपूर्ण काम करण्याची इच्छा बाळगतात. मालिकांच्या लेखन आणि संवादातून निखळ, निर्मळ आनंद देणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी यांचा विजया मेहता यांच्या सहाय्यक आणि पुढे दिग्दर्शक म्हणूनची कारकीर्द हा प्रवास आनंददायी आहे.
इंग्रजी साहित्य आणि सौंदर्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या प्रतिमा कुलकर्णी यांनी अगदी लहान वयातच प्रथम भरत नाट्यम नर्तिका म्हणून आणि नंतर मराठीत प्रयोगात्मक रंगमंचावर अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. १९७४ च्या सुमारास जेव्हा मराठी व हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील प्रायोगिक रंगभूमीचे कार्यक्षेत्र मुंबईच्या आसपास होते.त्यांना अभिनयाबरोबरच थिएटरच्या इतर बाबींमध्येही त्यांना रस होता. यामुळे त्या दिग्गज रंगकर्मी विजया मेहता यांच्या संपर्कात आल्या आणि तेथे सुरवातीला प्रतिमा यांनी स्टेज मॅनेजर आणि सहायक संचालक म्हणून त्यांच्या अंतर्गत काम केले.
नंतर जेव्हा विजया बाई मेहता सिनेमाकडे वळल्या, तेव्हा प्रतिमा यांनी तेथेही त्यांना सहाय्यक म्हणून काम केले. प्रतिमा यांनी नंतर थिएटरबरोबर टीव्ही आणि सिनेमातही काम केले.
१९८८ मध्ये त्यांनी ‘आत्मकथा’ या नाटकातून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्या नंतर ‘प्रपंच’ही मालिका त्या वेळच्या अल्फा मराठीवर नोव्हेंबर १९९९ मध्ये सुरु झाली होती. ‘प्रपंच’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती तिच्या मांडणीमुळे. ‘प्रपंच’चे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती अशा तिहेरी भूमिकेत प्रतिमा कुलकर्णी वावरलेल्या होत्या.
स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट २००३ साली आलेला ‘स्कूल’ होता जो हिंदीत बनवला गेला होता. हा मुलांचा चित्रपट होता. या आधी त्यांनी गोविंद निहलानी, डॉ. जब्बार पटेल इत्यादी चित्रपट निर्मात्यां बरोबर सहायक दिग्दर्शिका, उप-शीर्षक लेखीका म्हणून काम केले होते. कोंकणी भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट ‘ओह! मारिया’ जो गोव्यात २५ आठवडे चालला याचे पटकथा आणि संवाद लेखन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले होते तसेच डिसेंबर २००६ मध्ये आलेल्या मराठी आणि कोंकणीतील द्विभाषिक चित्रपट ‘सावली’ साठी पटकथा व संवाद लेखक त्यांनी केले होते. या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक राज्य पुरस्कार प्राप्त झाले. प्रतिमा यांना सर्वोत्कृष्ट संवादाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता.
२०१९ मध्ये वसंत कानेटकर यांचं ‘अश्रुंची झाली फुले’ हे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सादर झालेलं नाटक मराठी रंगभूमीवर एक दंतकथा ठरलेलं नाटक परत रंगमंचावर आले व याचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले होते. यात सुबोध भावे, शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप असे कसलेले कलाकार होते. सध्या शुभा गोडबोले लिखित ‘ट्रान्स affair’ या नाटकात त्या अभिनय करताना दिसत आहेत. ‘ट्रान्स affair’मध्ये प्रतिमा कुलकर्णी यांनी बायकोची भूमिका अत्यंत उत्तम रीतीने साकारली आहे.
प्रतिमा कुलकर्णी यांना २००५ मध्ये कैरो चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. प्रतिमा कुलकर्णी यांना त्यांच्या थिएटर आणि टेलिव्हिजन मधील कामासाठी कित्येक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रतिमा कुलकर्णी यांची मुलाखत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply