१९१३ सालातील गोष्ट आहे. साथीच्या आजारामध्ये दोन लहान मुलांचे आई-वडील स्वर्गवासी झाले. दोन वर्षांचा मुलगा व त्याची थोडीशी मोठी बहीण, अशा दोघांना त्यांच्या काका, रामकृष्ण देऊसकरांनी वाढवलं. मुलगा दहा वर्षांचा झाल्यावर काकांनी त्याला हैदराबादला नेलं. तिथं मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण पूर्ण केलं. तो मुलगा म्हणजेच सुप्रसिद्ध व्यक्तिचित्रकार, गोपाळ देऊसकर!!
गोपाळचे आजोबा शिल्पकार होते. वडील मिशन स्कूलमध्ये कलाशिक्षक होते. त्यामुळे तीच कलेची अनुवंशिकता, गोपाळमध्येही आली. त्यांनी १९२७ ते १९३६ दरम्यान जे.जे. मध्ये शिक्षण घेतलं. त्याच वर्षांमध्ये लंडनच्या जागतिक चित्रप्रदर्शनात, तीन वेळा त्यांनी काढलेली चित्रे प्रदर्शित झाली. नंतर ‘जे.जे.’ चे ते डेप्युटी डायरेक्टर झाले. बाॅम्बे आर्ट सोसायटीने त्यांना त्यांच्या चित्रकौशल्याबद्दल सुवर्णपदक देऊन गौरविले.
राजा रविवर्मा यांच्यानंतर संस्थानिकांची व राजघराण्यांतील व्यक्तींची व्यक्तिचित्रे काढणारे गोपाळ देऊसकर हे एकमेव चित्रकार होते. बडोदा, जयपूर, कूच बिहार, पोरबंदर, जुनागड, हैदराबाद, धार, इत्यादी संस्थानांतील अनेक नामवंतांची त्यांनी पूर्णाकृती चित्रे काढलेली आहेत. अशाच एका जयपूर संस्थानच्या महाराणी, गायत्रीदेवी यांना समोर बसवून त्यांचे व्यक्तिचित्र काढताना गोपाळ देऊसकरांनी दोन दिवसांचे काम झाल्यावर पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला. राणीने त्याचे कारण विचारल्यावर, गोपाळ देऊसकरांनी स्पष्टीकरण दिले की, ‘आपल्या रिवाजानुसार आपण आपले अंगरक्षक, नंग्या तलवारीनिशी आपल्या दोन्ही बाजूला उभे केलेले असल्याने, मला माझे काम एकाग्रतेने करता येत नाही. अशावेळी त्यांचे आपल्यासोबत असे रक्षणासाठी उभे राहणे, मला तरी गरजेचे वाटत नाही.’ राणीला ते पटलं व त्यानंतर त्या रक्षकांशिवाय ते अप्रतिम व्यक्तिचित्र अल्पावधीतच पूर्ण झालं.
गोपाळ देऊसकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासाठी, बालगंधर्वांची दोन रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी माॅडेल म्हणून ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते, विवेक यांची निवड केली होती. स्त्री रुपातील रुक्मिणीचा हात चितारताना मऊसुत, गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री, गोपाळ देऊसकरांना हवी होती. हृदयनाथ मंगेशकरच्या लग्न समारंभात, कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी, रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊसकरांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी, पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट, अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आला.
जयंतराव टिळक यांनी टिळक स्मारक मंदिरातील, ७x५० फूट अशा भव्य भिंतीवर गोपाळ देऊसकरांना टिळकांच्या जीवनातील प्रसंगावरून चित्र साकारण्यास सांगितले. हे चित्र पूर्ण होण्यास बरेच दिवस लागले. हे काम चालू असताना, ‘अभिनव कला’ मधील रमेशचा वर्गमित्र, विजय कदम हा गोपाळ देऊसकर सरांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करीत असे. सर काम करताना, कुणालाही जवळ उभे करायचे नाहीत. त्यांची पॅलेट स्वच्छ करण्याचे काम, विजय करीत असे. सरांच्या फक्त एवढ्याच सहवासाने तो अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाला.
टिळक स्मारक मंदिरातील अनेक नामवंतांची व्यक्तिचित्रे गोपाळ देऊसकरांनी साकारलेली आहेत. तसेच काम त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयासाठी केलेले आहे. लोकमान्य टिळक, ना. म. जोशी, रॅंग्लर परांजपे, पु. ल. देशपांडे, डाॅ. श्रीराम लागू , इ. ची व्यक्तिचित्रे त्यांनी फर्ग्युसनला, विनामूल्य देणगी स्वरुपात तयार करुन दिली.
गोपाळ देऊसकर हे कलेला वाहून घेतलेले मनस्वी चित्रकार होते. त्यांच्या चित्रांमध्ये त्या व्यक्तीचं ‘व्यक्तिमत्त्व’ दिसतं, ही त्यांची खासियत होती. सरांचं खाजगी जीवन, कलाकारांप्रमाणे थोडं वेगळं होतं. त्यांच्या जीवनात तीन सहचारिणी आलेल्या. पहिली, कमलिनी. दुसरी उषा मोने म्हणजेच जुईली देऊसकर. तिसरी माधवी.
गोपाळ देऊसकरांना सिगारेटचे व्यसन होते, मात्र ते मर्यादेपर्यंतच. म्हणजे सिगारेटचे चार झुरके घेतल्यानंतर ते जवळच्या ‘भारत ब्लेड’ने जळती सिगारेट कट करायचे. पुन्हा तलफ आल्यावर, तीच पेटवून पुन्हा ओढायचे.
ज्येष्ठ व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर सरांचा सहवास, माझे परममित्र ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांना लाभला. त्यांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या आठवणी ऐकून हा लेख लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली.
वयाच्या त्र्यांशीव्या वर्षी, गोपाळ देऊसकर, इहलोक सोडून गेले. आयुष्यभरातील सुमारे साठ वर्षं ते कॅनव्हासशी एकनिष्ठ राहिले. या पाच तपांमधील त्यांची अजरामर व्यक्तिचित्रे, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. आत्ताच्या डिजिटल युगात, कॅनव्हासवरील हाताने काढलेली व्यक्तिचित्रे कालबाह्य ठरु लागली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने फोटोला, पेंटिंगचा इफेक्ट देऊन कितीही मोठ्या आकारात प्रिंट काढता येते. त्यामध्ये सुबकता असली तरी जिवंतपणाचा लवलेशही नसतो. या डिजिटलायझेशनमुळे, खऱ्या कलाकारांवर, नामशेष होण्याची वेळ आलेली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात गेलेली कोणतीही व्यक्ती, बालगंधर्वांच्या चित्रासमोर काही क्षण तरी रेंगाळतेच. कारण गोपाळ देऊसकरांनी त्या दोन्ही चित्रांत आपला ‘प्राण’ ओतलेला आहे. चित्रांतील बालगंधर्व आपल्याकडेच पहात आहेत, असा भास, ती चित्र पहाताना होतो व आपण नकळत, त्या सुवर्णकाळात जातो.
त्यांच्या अतुलनीय कलाजीवनाला, विनम्र अभिवादन!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-२-२२.
Leave a Reply