ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील यांचा जन्म ५ एप्रिल १९५२ रोजी पहूर, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा येथे झाला.
मराठी साहित्यकार अनुराधा पाटील यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता प्रकाशित झाल्या. त्यांनी कविता लिहिण्याची सुरवात शाळेत असल्यापासूनच केली. गेल्या ४५ वर्षांपासून अनुराधा पाटील निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा पाटील यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पहूर (ता. जामनेर) येथे झाले. त्यांच्या कवितेने स्वतःची स्वतंत्र वाट शोधलीच पण त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून स्थान निर्माण केले आहे.
अनुराधा पाटील यांना लेखन, कविता लिहिण्याची सुरुवात शाळेत असल्यापासूनच झाली. त्यांनी शाळेत असताना कविता, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायच्या. अनुराधा पाटील यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचे लग्न झाले. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना कविता करायला त्यांच्या पतीपासूनच प्रोत्साहन मिळाले. त्यांनी लग्नानंतरही कविता लेखन सुरूच ठेवले. त्यांच्या कवितांचा वेगळा ‘पिंड’ असून, त्या कवितांवर त्यांचीच छाप दिसून येते.
वीस समीक्षकांनी त्यांच्या कवितांचे दर्शन दादा गोरे संपादित अनुराधा पाटील यांची कविता’ या पुस्तकात केले आहे. अनुराधा पाटील यांचे काव्यलेखन १९७० च्या आसपास सुरू झाले. त्यांची पहिली कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये १९७२ मध्ये छापून आली.
गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.
वेगवेगळ्या पिढ्यांतील समीक्षकांना दखल घ्यायला लावणारी ही कविता अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांत समाविष्ट झालेली आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, गुजराती, राजस्थानी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
१९८० मध्ये त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी “नवसाला पावली डॉक्टरीण’ ही दीर्घ कथा लिहिली.
२०१९ मध्ये अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply