डॉ. मुरलीधर गोडे यांचा जन्म १८ जून १९३७ रोजी ठाणे येथे झाला.
डॉ. मुरलीधर गोडे हे मूळचे ठाण्याचे. पाचवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत आणि नंतर मो.ह. विद्यालयात झाले. पुढे वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना महाड येथे जावे लागले. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. ठाण्यात परतल्यावर पुढचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुईया आणि सिद्धार्थ कॉलेजमधून पूर्ण केले. संस्कृत विषय घेऊन एम.ए, बी.एड करून प्रौढ शिक्षण यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली होती. ‘टीच वन टीच वन’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. मुंबई विद्यापीठात त्यांनी प्रौढ शिक्षण कार्यक्रम म्हणून २० वर्षे प्राध्यापकाची नोकरी केली. त्याच वेळी ते पत्रकारिता, साहित्य क्षेत्र, सिनेसृष्टी, नाटक, रंगभूमी, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ते मुशाफिरी करू लागले.
डॉ. गोडे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ५५ वर्षांहून अधिक काळ घट्ट मैत्री होती. १९९६ ते १९९९ या कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा लाभलेले गोडे हे महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष होते. याच काळात साक्षरतेसाठी अनेक पुस्तकांचे लिखाण, अभ्यासपूर्ण लेख, मार्गदर्शिका, पथनाट्ये त्यांच्याकडून साकारली गेली. त्यातील दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. पुढे मुंबई आकाशवाणीसाठी शंभरहून अधिक रचना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रसारित झाल्या आणि दूरदर्शनसाठी जवळजवळ १०० उत्तमोत्तम संहिता, तर काही शीर्षकगीतेही लिहिली.
त्यांनी १५ अनुबोधपटांचे लेखन केले आणि सुमारे २० लघुपटांचे लेखन राज्य शासनाकरिता केले होते. टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने. त्यांनी आजवर एकूण १४ चित्रपटांसाठी गाणी लिहिली.
किरण नाकती दिग्दर्शित सिंड्रेला आणि आगामी ढोलताशा चित्रपटासाठी मुरलीधर गोडे यांनी गाणी लिहिली होती.
त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.ठाणे महानगरपालिकेचा ठाणे नगररत्न पुरस्कार, जागतिक वृद्ध दिन पुरस्कार, स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर पुरस्कार, कऱ्हाडे समाजभूषण पुरस्कारासह युनिसेफच्या स्पर्धेत उत्कृष्ट पथनाट्याचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच आकाशवाणीच्या राष्ट्रीय स्पर्धेत गुणवत्ता प्रमाणपत्रानं गोडे यांचा गौरव करण्यात आला होता. याखेरीज अनेक स्थानिक संस्थांनी गोडे यांचा वेळोवेळी नागरी सत्कारदेखील केला होता.
व्यास क्रिएशन्सने २०१० साली प्रकाशित केलेल्या १०० पुस्तकांच्या बालखजिना संचासाठी त्यांनी शीर्षकगीत लिहून दिले होते. व्यास क्रिएशन्सने प्रकाशित केलेली काही पुस्तके त्यांनी संपादित केली होती.
डॉ. मुरलीधर गोडे यांचे १९ मार्च २०२० रोजी निधन झाले.
डॉ.मुरलीधर गोडे यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=esESragrFqQ
https://www.youtube.com/watch?v=CF7W2ZJjmL0
https://www.youtube.com/watch?v=ZRzENCH5cxg
https://www.youtube.com/watch?v=zHyzbh4cu0s
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply