‘दूरदर्शन’मध्ये नेपथ्यकार म्हणून रुजू झालेले आणि नंतर निर्माता म्हणून प्रसिद्ध पावलेले विनायक चासकर हे मुंबई दूरदर्शनचा सुरवातीचा महत्वाचा चेहरा.. दूरदर्शन सारख्या कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय रुचेल, पचेल याचा विचार करून, अनेक कथासंग्रह वाचून, त्यातून निवडलेल्या कथांचं नाटयीकरण, पटकथा-संवादासह स्वत: लिहून काढत बसलेले ते असायचे ते.. दुस-या दिवशी, त्या पटकथेचं कॅमेरा स्क्रिप्ट तयार झालं की मग कथेला साजेशी पात्रयोजना, त्यासाठी संपर्क साधणे वगरे.. तिस-या दिवशी दुपारी वाचन. संध्याकाळी कॅमे-याच्या अंदाजानं हालचालींचं नियोजन.. आणि लगेच पुढल्या दिवशी कलागारांत चित्रीकरण, असा त्यांना घटनाक्रम वर्षानुवर्ष होता.
विनायक चासकर हे दूरदर्शनवर गाजलेल्या ‘गजरा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहचले होते. ‘गजरा’ ही विनायक चासकर यांची ही निर्मिती. त्यांनी ‘गजरा’चे ८० हून अधिक कार्यक्रम केले. पूर्वी दर बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता सादर होणाऱ्या एक तासाच्या या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना टेलिव्हिजनने चेहरा मिळवून दिला. या कार्यक्रमातून मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अनेक कलाकार लोकप्रिय झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, सुरेश खरे हे त्यापैकीच.
सुरेश खरे यांचे ‘परीक्षा’, ‘आनंदयात्रा’ अशासारखे कार्यक्रम, विनय आपटेची अफलातून ‘टेलिमॅच’ आणि दिलीप प्रभावळकरची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्सवर केलेली महामिश्कील पॅरडी- हे सर्व गजरे बहुचर्चित झाले.त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावर मराठी नाट्यविभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन असे विविध विभाग सांभाळले.
दूरदर्शनमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठीच्याच अनेक मालिकांचं दिग्दर्शनही केलं.
नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
१९८४ सालच्या, त्यांची निर्मिती असलेल्या ‘स्मृतीचित्रे’ या त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर विनायक चासकर यांना ‘आश्रित’ या नाटकालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विनायक चासकर यांचे १७ मार्च २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply