ज्येष्ठ पत्रकार, जागतिक ख्याती प्राप्त चित्रकार जन्म १६ ऑगस्टला झाला.
प्रकाश जोशी यांची पत्रकारितेतील कारकीर्द म्हणजे केवळ अजातशत्रू अशीच राहिली आहे. केसरी या प्रख्यात वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात करून पत्रकारितेची अखेर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियातून केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात रुजू होणा-या नवख्या पत्रकारांसाठी जोशी हे कायम मार्गदर्शक ठरले. प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे. त्याची अनेक सोलो व ग्रुप शो आतापर्यंत आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यांच्या ऑईल ऑन कॅनव्हास या प्रदर्शनाला केवळ भारतातच नव्हे तर परदेशातूनही मोठी प्रशंसा मिळालेली आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आतापर्यंत लास वेगास, अमेरिकेतल्या मिनीएपोलिस, स्वित्झर्लंडलडच्या बेसेल्स, लिस्बन, पोर्तुगाल, नॉर्वे, ओसिजेक, क्रोएशिया त्याचप्रमाणे इतर अनेक युरोपियन देशांत भरलेली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कलादालनांमध्येही तसेच इस्तंबूलच्या इझमीर, भुतान यासारख्या अनेक कलेची शहरं म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणी त्यांची प्रदर्शनं भरलेली आहेत. लंडनमधील वर्ल्ड सिटिझन आर्टिस्ट या संस्थेतर्फे एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यासाठी त्यांना परीक्षक म्हणूनही पाचारण करण्यात आले होते.
प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा’ हे लघुकथांचे व मुंबईच्या जीवनावरील ‘गेटवे’ अशी दोन पुस्तकंही प्रदर्शित झालेली असून त्यात त्यांच्या सुरेख अशा रेखाचित्रांचाही समावेश आहे. टाइम्समध्ये कार्यरत असतांना शोध पत्रकारितेत बातमीसाठी खोलवर पोहोचण्यासाठी मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून सरकारी आणि सामाजिक स्तरावरील दुर्गुणांवर लेखणीद्वारे कोरडे ओढले. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट या नामवंत पत्रकार संघटनेत कायम सक्रीय राहून त्यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी सोडवल्या आहेत. प्रकाश बाळ जोशी यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारासाठी मिळाला आहे. ‘प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा’ या राज्य पुरस्कार प्राप्त मराठी कथासंग्रहाचे इंग्रजीत भाषांतर केलेले ‘मिरर इन द हॉल’ (Mirror in the Hall) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हा कथासंग्रह स्मिता करंदीकर यांनी भाषांतरित केला आहे. नुकताच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने २०२० सालचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बाळ जोशी यांना प्रदान करण्यात आला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply