ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ रोजी मध्यप्रदेशातील बारावनी येथे झाला.
भारतातील अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. अनिल काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या मातोश्री कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले. डॉ. काकोडकर यांनी मुंबईत यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिॲक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या “ध्रुव रिॲक्टर”मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे
१९९६ साली ते बीएआरसीचे संचालक झाले. २००० सालापासून अणुऊर्जा आयोगाची सूत्रे त्यांच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. तसेच भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्यात ते सचिवपदी कामही करतात.
अणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल.
डॉ.काकोडकरांनी २५० पेक्षा अधिक संशोधनपर प्रबंध लिहिलेले आहेत. त्यांनी केलेल्या महान कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तीनही पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
अणुऊर्जेत भारत स्वयंपूर्ण व्हावा हे ध्येय बाळगून डॉ. काकोडकर वाटचाल करीत आहेत.
Leave a Reply